22 July 2019

News Flash

वेद राही

काश्मीर हे राज्य तसे कायमच चर्चेत असते.

काश्मीर हे राज्य तसे कायमच चर्चेत असते. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर तर जगभरात काश्मीरविषयी चर्चा सुरू झाली. काही वर्षांपूर्वी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या काश्मीरच्या डॉ. फजल शाह या तरुणाने कठीण परिस्थितीत आपल्या आयुष्याला वळण लावणाऱ्या तीन साहित्यिकांची नावे घेतली होती. डॉ. भुवनेश्वरी तिवारी, सुनीता रैना आणि तिसरे होते वेद राही! याच राही यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

उर्दू, डोगरी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या राही यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी आहे. सुरुवातीची काही वर्षे ते जम्मू आकाशवाणीच्या सेवेत होते. १९५८ मध्ये ते केंद्र सरकारच्या ‘योजना’ मासिकाचे संपादक बनले आणि त्याच वर्षी ‘काले हाथ’ हा डोगरी भाषेतील त्यांचा पहिला लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला. याची त्या काळी समीक्षकांनी दखल घेतली. मग राही यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘सीमा के पत्थर’, ‘काले हत्थे’, ‘क्रॉस फायरिंग’, ‘अंधी सुरंग’, ‘टूटती दीवार’, ‘दरार’, ‘आले’ अशी अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध झाली. ‘आले’ या डोगरी भाषेतील कादंबरीने त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळवून दिला. काश्मिरी संत-कवयित्रीच्या जीवनावर आधारित ‘लाल देड’ ही त्यांची कादंबरीही वाचकप्रिय ठरली. राही यांनी आपल्या अनेक कथा- कादंबऱ्यांमधून काश्मीर खोऱ्यातील निसर्गाचे सुंदर आणि तितकेच रौद्र दोन्ही रूपांचे दर्शन घडवले आहे. माधवी कुंटे यांनी त्यांच्या एका पुस्तकाचा ‘अधुरी एक कहाणी’ या नावाने अनुवाद केला असून एका नव्या जगाचे दालन उघडणारे हे पुस्तक अस्वस्थ करणारे आहे.

रामानंद सागर यांच्यामुळे ते चित्रपटसृष्टीत आले. सागर यांच्यासोबत त्यांनी सुमारे २५ चित्रपटांसाठी कथा, पटकथा वा संवादलेखन केले. त्यांच्या चित्रपटांना व्यावसासिक यश किती मिळाले यापेक्षा त्यांनी त्या त्या काळातील संवेदनशील विषय आपल्या कथांमधून हाताळले, हे महत्त्वाचे. ‘पराया धन’, ‘आप आये बहार आयी’, ‘यह रात फिर न आएगी’, ‘चरस’, ‘संन्यासी’, ‘मोम किी गुडिया’ आदी चित्रपटांचा यात समावेश आहे.

कालांतराने ते दूरदर्शनकडे वळले. ‘कथा सागर’, ‘मीरा बाई’, ‘रिश्ते’, ‘एहसास’, ‘जिंदगी’, ‘गुल गुलशन गुलफाम’ या मालिकांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर’ हा चरित्रपटही त्यांनी काढला. अनेक माहितीपट, लघुपट व मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

‘काली घटा’, ‘दरार’ अशा काही चित्रपटांची निर्मितीही राही यांनी केली आहे. विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या राहीजींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर सरकारने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीची दखल घेतली. महाराष्ट्र शासनानेही १९९० मध्ये त्यांचा गौरव केला होता. काही पटकथांनाही विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांना कुसुमाग्रज पुरस्कार घोषित झाला. एका बहुआयामी आणि प्रतिभावान व्यक्तीला हा पुरस्कार मिळणे उचितच आहे.

First Published on March 16, 2019 12:05 am

Web Title: ved rahi