एखाद्या हिऱ्याला जसे पैलू पाडतात, तसेच पैलू त्यांनी धावपटूंना पाडत देशाला अनेक दर्जेदार खेळाडू मिळवून दिले. डी. वाय बिरादार, पी. सी. पोन्नप्पा, सतीश पिल्ले, उदय प्रभू आणि अश्विनी नाचप्पा या साऱ्यांना कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर त्यांनीच घडविले. आयुष्य खेळासाठी वेचणारे आणि आपल्या कडक शिस्तीने गेल्या ६० वर्षांत अनेक अ‍ॅथलीट घडवणारे ज्येष्ठ अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक एन. लिंगाप्पा मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निवर्तले.

१९५४ साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्यांची निवड त्याच वर्षी मनिला येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी झाली होती. पण त्यांचा क्रीडाप्रकारच रद्द करण्यात आला. मग, १९५६ मध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचा प्रशिक्षण-अभ्यासक्रम पूर्ण करून ते प्रशिक्षणाकडे वळले.  धो-धो पाऊस असो किंवा घरचे कार्य, अगदी आजारपणातही सरावाला सुरुवात होण्याच्या एक तास आधी ते मैदानात हजर राहत. हाच कित्ता खेळाडूंनीही गिरवावा, हा त्यांचा आग्रह असे. प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या लिंगाप्पा यांनी आपल्यातील शिस्त खेळाडूंमध्येही रुजवली. स्वत: राष्ट्रीय विजेते अ‍ॅथलीट असल्याने धावपटूंमधील क्षमता आणि वेग कसा वाढवायचा, याचे उत्तम ज्ञान होते. इतकेच नव्हे, तर १९६० ते ७० च्या दशकातही पोषक आहार आणि खेळाडूंचे वजन नियंत्रित ठेवण्याचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले होते. खेळाडूंसमोर छोटी-छोटी आव्हाने ठेवून दीर्घकालीन फायदे ते मिळवून देत. सलग चार ऑलिम्पिक, तीन आशियाई क्रीडा स्पर्धा आणि असंख्य वेळा राष्ट्रीय स्तरावर त्यांनी देशाच्या अ‍ॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येत नाही, याची शिकवण धावपटूंना देणाऱ्या लिंगाप्पा यांच्या स्वभावातच प्रचंड संयम आणि चिकाटी होती. कर्नाटक सरकारकडे त्यांनी पेन्शनसाठी प्रदीर्घ काळ लढा दिला. तसेच ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी असंख्य वेळा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करूनही, प्रशिक्षकासाठी दिल्या जाणाऱ्या देशातील या  सर्वोच्च पुरस्कारापासून त्यांना वंचित राहावे लागत होते. अखेर वयाच्या ९१ व्या वर्षी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी निवड केली. पण हा पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांच्या प्रशिक्षणामध्ये कधीही खंड पडला नाही. वयाच्या ९५ व्या वर्षीही बेंगळूरुतील कांतीरवा स्टेडियममध्ये खेळाडूंना घडवण्यासाठी ते जीवाचे रान करीत. त्यांच्यासारखा अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक देशात होणे नाही, हे जाणकारांचे मत स्वयंस्पष्ट आहे.