मेंदूचे आजार उपचारास अतिशय अवघड असतात, मेंदूतील चेतापेशींच्या काठिण्याचा रोग तर महादुर्धर, ज्याला मल्टिपल स्क्लेरॉसिस म्हणजे बहुविध चेतादृढन असे संबोधले जाते. त्याविषयी ज्या मोजक्या वैज्ञानिकांनी संशोधन केले त्यात विजय के. कुचरू यांचा समावेश होतो. यंदाचा जॉन डिस्टिल मल्टिपल स्क्लेरॉसिस पुरस्कार त्यामुळेच त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. कुचरू यांनी हरयाणातील पशुवैद्यक महाविद्यालयातून पदवी घेतली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या क्वीन्सलँड विद्यापीठात शिक्षण घेताना रोगनिदानशास्त्रात पीएच.डी. केली. ते सेंटर फॉर इन्फेक्शन अँड इम्युनिटी या संस्थेचे ते सहसंचालक बनले. १९८५ मध्ये अमेरिकेत येऊन, हार्वर्ड  येथे त्यांनी वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले. बोस्टन येथील ब्रिगहॅम इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. ब्रॉड इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी क्लॅरमन पेशी वेधशाळा प्रकल्पात काम केले. त्यात ‘टी पेशीं’वर विशेष संशोधन चालू होते. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूल संचालित ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटल येथे एव्हग्रँड सेंटर फॉर इम्युनॉलॉजिक डिसिजेस हे केंद्र स्थापन केले.

तेथे मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगावर संशोधन करताना त्यांनी पशुवैद्यकशास्त्राचे ज्ञान वापरून, प्राण्यांची प्रारूपे तयार केली व त्याच्या मदतीने अभ्यास केला. नवे काही तरी शोधण्याचा ध्यास घेतलेल्या वैज्ञानिकांपैकी ते एक. त्यामुळे त्यांनी हा विषय संशोधनासाठी निवडला तो दुर्मीळ व अवघड. मल्टिपल स्क्लेरॉसिसमध्ये आपल्याच प्रतिकारशक्ती प्रणालीतील पेशी आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करतात तेव्हा असे नेमके काय बदल रेणवीय व जनुकीय पातळीवर टी पेशींमध्ये होतात याचा अभ्यास त्यांनी केला. ‘टी’ पेशी जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. आपल्या चेतापेशींना  मायलिनचे आवरण असते, त्यातील प्रथिने जो प्रतिसाद देतात त्याच्याशी या रोगाचा संबंध असतो. मग दोषयुक्त पेशी व निरोगी टी पेशी यांच्यातील फरकासाठी त्यांनी ‘टिम ३’ नावाचा रेणू शोधून काढला. या टिम रेणूशी संबंधित जनुके जो प्रतिसाद देतात त्याचाही या रोगाशी संबंध असतो. त्यांच्या या संशोधनातून या रोगावर उपचारासाठी अनेक वाटा दिसू लागल्या. टी पेशी या रोगात कशा कार्यान्वित होतात व विशेष संदेशवाहक प्रथिने यात कशी भूमिका पार पाडतात हे त्यांनी शोधून काढल्याने काही औषधेही तयार करणे शक्य झाले. या रोगामध्ये बी पेशींचाही संबंध असतो. हा रेणू उतींचा क्षोभ नियंत्रित करीत असतो.

कुचरू यांना या संशोधनासाठी अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या वार्षिक सभेत डिस्टिल पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराबरोबरच त्यांनी केलेल्या संशोधनाने मेंदुरोग उपचारांना दिलेली दिशा फार महत्त्वाची आहे यात शंका नाही. ‘एका संस्थेच्या शिष्यवृत्तीतून सुरू केलेल्या संशोधनाचे चीज होणे माझ्यासाठी वेगळी बाब आहे’,  अशी  भावना त्यांनी या पुरस्काराबाबत व्यक्त केली आहे.

फ्रेड झेड इगर संशोधन पुरस्कार, क्वीन्सलँड विद्यापीठाचे सुवर्णपदक, जॅव्हिटस न्यूरोसायन्स पुरस्कार, रॅनबॅक्सी सायन्स फाऊंडेशन पुरस्कार, पीटर डोहर्थी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना यापूर्वी लाभले आहेत.