युसूफ हमीद हे भारतीय वैज्ञानिक (आता अनिवासी भारतीय) आहेत व सिप्ला या भारतीय औषध कंपनीचे ते अध्यक्ष. त्यांची नेमणूक नुकतीच संयुक्त राष्ट्रांनी आरोग्य व तंत्रज्ञान मंडळावर केली आहे. युसूफ हमीद यांनी एड्सवर दिवसाला एक डॉलर खर्च असलेले पहिले औषध २००१ मध्ये तयार केले आहे. जगातील सर्व नफेखोर औषध कंपन्या त्यांना शत्रू मानतात, कारण ते त्यांच्या पोटावर पाय देत आहेत आणि गरिबांना मात्र हात देत आहेत.
एड्स, क्षय, अस्थमा व इतर अनेक आजारांवर बहुऔषधांचा संयुक्त वापर करण्यात त्यांनी मोठे काम केले आहे. सध्या आफ्रिकेत इबोलाची साथ आहे. त्यात ११ हजार लोक मरण पावले असताना त्यांची ही नियुक्ती फार महत्त्वाची आहे. हमीद यांचा लंडनमध्ये डुप्लेक्स फ्लॅट आहे, घरात असताना ते बराच वेळ त्यांच्या खोलीतच असतात. सकाळी सात वाजता सुरू झालेले त्यांचे काम १२ तास चालते, त्या वेळी तीन गोष्टी त्यांच्याजवळ असतात. एक म्हणजे दूरचित्रवाणी संच, दुसरे संगीत व तिसरे आयपॅड. आज ७८ वय असलेल्या हमीद यांची फोर्ब्सच्या आकडेवारीनुसारची संपत्ती १.७ अब्ज पौंड आहे. एकीकडे ऐश्वर्य हात जोडून उभे असताना त्यांना खरे तर गरिबांची काळजी करण्याची काय गरज पडावी? पण ती त्यांना आहे.
प्रजातीय म्हणजे जेनेरिक औषधे तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. रसायनशास्त्राच्या अनेक शिक्षकांना, ते शिकले त्या केंब्रिज विद्यापीठाला त्यांनी उदार हाताने मदत दिली आहे. सध्या तरी निवृत्तीचा विचार नाही, जेवढे कामात गुंतवून घ्याल तेवढे चांगले हे त्यांचे गुपित आहे. ते चित्रकलेचे चाहते आहेत. सतीश पांचाळ यांनी काढलेले घोडय़ांच्या मुखवटय़ाचे अमूर्त चित्र त्यांनी प्रथम विकत घेतले. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची ज्युलियन बॅरो यांनी काढलेली चित्रे तसेच परेश मती यांची चित्रे त्यांच्या दिवाणखान्यात शोभत आहेत. हमीद यांचा जन्म लिथुआनियात व्हिलिनस येथे झाला. त्यांची आई ज्यू तर वडील भारतीय मुस्लीम. त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास जर्मनीत केला. पदव्युत्तर शिक्षण केंब्रिज विद्यापीठातून घेतले तर जैवरसायनशास्त्राचे धडे म्युनिकमधील मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट येथे घेतले. १९३० मध्ये त्यांचे कुटुंबीय मुंबईत आले व त्यांच्या वडिलांनी रासायनिक, औद्योगिक व औषध प्रयोगशाळा स्थापन केल्या, तीच सिप्ला कंपनी होती. औषध उद्योगात तरुणांनी पुढे येऊन मानवतेसाठी काम करावे, असा त्यांचा संदेश आहे.