सुखदेव थोरात

‘वेदिक ब्राह्मिनिझम’ने यापूर्वी केलेले अन्य परंपरांचे समावेशन आणि आजचा काळ यांबाबत स्पष्टता आवश्यक आहे..

याआधीच्या काही लेखांमध्ये अलीकडेच नव्याने उभारून आलेल्या भारतीय संविधानाशी विसंगत असलेल्या काही सामाजिक प्रवृत्तींबद्दल चिंता व्यक्त केली होती. राज्यव्यवस्थेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचे घटनात्मक मूल्य यांपुढे या प्रवृत्तींमुळे आव्हान उभे राहिले आहे, जातीय हिंसाचारात वाढ होऊन एकात्मता उतरणीला लागली आहे आणि समाजात दुही वाढते आहे, हे याआधीच्या लेखांत म्हटले होते. या नकारात्मक प्रवाहांचा फटका राष्ट्राला बसतोच, पण सर्वाधिक यातना अस्पृश्य मानले गेलेले समाज आणि अल्पसंख्याक यांना सोसाव्या लागतात. याआधीच्या लेखांत असेही मत व्यक्त केले होते की, ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ची सांस्कृतिक परंपरा आणि त्यामुळे धार्मिक प्रभाव हे यामागचे प्रमुख कारण आहे. हे वाचून अनेकांनी विविध मते व्यक्त केली. त्यातले कोणतेही मत बिनमहत्त्वाचे न मानता, याविषयी आणखी स्पष्टता येणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन, त्यासाठी या मुद्दय़ांची काही अंशी पुनरावृत्ती करणे आवश्यक वाटते.

इसवी सनपूर्व सहाव्या शतकाच्या आधी ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ आणि ‘श्रमणिझम’ या दोन समांतर वैचारिक परंपरा होत्या. पण या व्यक्ती आणि समाजाला नियंत्रित करणाऱ्या दोन निरनिराळ्या वैचारिक परंपरा होत्या. ‘वेदिक ब्राह्मिनिझम’ देवांना मानणारा होता. विविध देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करणे आणि यज्ञात पशुबळी देणे ही वेदिक परंपरा होती आणि यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणांना होता. कुटुंबात भरपूर मुलगे असावेत, सर्व कुटुंबांनी आपापली ऐहिक भरभराट साधावी, हा ‘वेदिक ब्राह्मिनिझम’चा आदर्श होता. याउलट, श्रमणिझमच्या विचारपरंपरेत देवांना प्रसन्न करणे, त्यासाठी यज्ञासारखे कर्मकांड करणे तसेच त्यात बळी देणे यांना स्थान नव्हते. उलट, ऐहिक गोष्टींबाबत अनासक्ती असावी, हा श्रमणिझमचा आदर्श होता. संन्यासमार्गाला महत्त्व होते. सामाजिक जीवन ‘सुविहित असावे म्हणून’ वर्ण/जातिव्यवस्था ‘वेदिक ब्राह्मिनिझम’च्या काळात उगम पावली आणि कथित उच्च जातींना जास्त हक्क, खालच्या मानल्या जाणाऱ्या जातींना अधिकार कमी, अशी विषमतावादी उतरंड या परंपरेने रुजवली. याउलट, श्रमणिक परंपरा समता मानणारी होती.

अशा नैतिक मूल्यांनी सामाजिक जीवनाची बांधणी घट्ट झालेली असताना, इसवी सनपूर्व सहाव्या शतकात बुद्धांचे कार्य सुरू झाले. बुद्ध हे श्रमणिक विचारपरंपरेचे प्रतिनिधी होते. कर्मकांडांनी, यज्ञातील पशुबळींनी ‘प्रसन्न’ होऊन मानवांची ऐहिक प्रगती साधून देणारे देव बुद्धांनी नाकारले. पुजारी- पुरोहित यांचेही महत्त्व नाकारले. सर्व व्यक्तींना समान मानून त्यांच्या परस्परसंबंधांसाठी काही नैतिक तत्त्वे मांडणे, ही बुद्धिझमची सकारात्मक बाजू आहे. करुणा, प्रेम, शांती आणि अहिंसा ही नैतिक मूल्ये बुद्धांच्या शिकवणुकीच्या केंद्रस्थानी आहेत.

‘वेदिक ब्राह्मिनिझम’ने इसवी सनपूर्व सहाव्या शतकापूर्वी श्रमणिझमच्या आणि पुढे इसवी सनपूर्व सहाव्या शतकानंतर  बुद्धिझमच्या प्रभावामुळे स्वत:मध्ये काही बदल करून घेतले. त्यातून जी परंपरा तयार झाली तिला ‘निओ-ब्राह्मिनिझम’ (म्हणजे सुधारलेला ब्राह्मिनिझम) असे म्हटले जाते. ‘वेदिक ब्राह्मिनिझम’मधील या परिवर्तनशीलतेबद्दल स्वामी विवेकानंद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी सैद्धान्तिक लिखाण केलेले आहे. ‘वेदिक ब्राह्मिनिझम’मधील काही रूढी नक्कीच बदलल्या. काही वैचारिक बदलही घडून, नीतितत्त्वांमध्ये परिवर्तन झाले. उदाहरणार्थ, यज्ञात पशूंचे बळी देण्याऐवजी लाह्य़ा आणि धान्य यांच्या आहुती दिल्या जाऊ लागल्या. अहिंसेचे तत्त्व मान्य झाले आणि गोहत्या तर निषिद्धच मानली जाऊ लागली.

‘वेदिक ब्राह्मिनिझम’मधला बुद्धिझमच्या नंतर झालेला दुसरा मोठा बदल म्हणजे संन्यास घेणे ही सर्वोच्च नैतिक पातळी मानली जाऊ लागली आणि ‘संन्यास’ सामावून घेताना तो मानवी जीवनक्रमातला चौथा ‘आश्रम’ मानला गेला. ‘संन्यास’ ही बुद्धिझमने जगाला दिलेली देणगी आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी मांडले आहे. बौद्ध भिख्खूंसाठी विहार बांधले गेले. एकाग्रतेसाठी बुद्धप्रतिमा आल्या आणि योग, आध्यात्मिक साधना आणि भक्ती या संकल्पना विकसित झाल्या. ‘वेदिक ब्राह्मिनिझम’नेही या सर्व प्रथा अंगीकारल्या, पण मंदिरे उभारून पूजा, प्रार्थना आणि योग तसेच आध्यात्मिक साधनेला, भक्तीला धार्मिक रंग दिला.

हा ‘निओ-ब्राह्मिनिझम’ मध्ययुगीन काळात पुन्हा बदलला आणि आज आपण ज्याला ‘हिंदू धर्म’ म्हणतो, त्या परंपरेला आजचे स्वरूप आले. मध्ययुगात भक्ती-चळवळींनी नैतिक उन्नतीचा नवा मार्ग खुला केला होता. धार्मिक आणि सामाजिक संबंधांत समानता हवी, ही समानता स्त्री-पुरुषांतही हवी, सामाजिक सद्भावना हवी आणि त्यासाठी बंधुभाव हवा, ही भक्ती-चळवळींची मांडणी लोकांना पटली. तोवर ‘खालच्या’ मानल्या गेलेल्या सामाजिक वर्गाना किंवा जातींनाही भक्ती चळवळीने समान स्थान दिले. संपूर्ण भारतभूमीतील शूद्र, अतिशूद्र या समाजांमधून या चळवळी उभ्या राहिल्या. वैष्णव, महानुभाव, वारकरी, सतनामी, आदि-धर्मी, कबीर आदी चळवळींचा वैचारिक पाया बुद्धिझम आणि जैनिझमला जवळचा होता. या चळवळी मुळात अवैदिक होत्या. त्या चळवळींना निओ-ब्राह्मिनिझमने पंथांचे स्थान दिले आणि हिंदू धर्माला आजचे स्वरूप मिळाले. आजच्या हिंदू धर्मात अनेक अवैदिक पंथांनाही स्थान आहे, हे विवेकानंदांनीही स्पष्ट केलेले असून राधाकृष्णन याविषयी म्हणतात, ‘‘आज ज्याला हिंदू धर्म असे म्हटले जाते, तो संपूर्ण भारतभूमीवरील साऱ्या धर्मपरंपरांचा (नैतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विचारधारणांचा) समुच्चय आहे. या अर्थाने, भारतीयांची धार्मिक – नैतिक परंपरा ही अफाट वैविध्याने सिद्ध झालेली आहे.’’

या अफाट वैविध्यातून एकात्म राष्ट्र उभारण्याचे मोठे आव्हान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झालेल्या घटना समितीपुढे (संविधान सभेपुढे) उभे ठाकले. याची राज्यघटनेने घातलेली रुजुवात किंवा सांगड म्हणजे ‘विविधतेतून एकता’ हे तत्त्व. घटनादत्त मूलभूत अधिकारांत धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश करून एकीकडे वैविध्य कायम राखले गेले. परंतु त्याच वेळी, देशाच्या सामाजिक आणि राजकीय शासकतेसाठी काही सामाईक तत्त्वेही घटनेने आखून दिली. ही तत्त्वे म्हणजे : सामाजिक न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता तसेच राजकीय लोकशाही. राजकीय लोकशाहीने हे राष्ट्र चालणार, हे राष्ट्र कुठल्याही एकाच धर्माचे नाही, हे स्पष्ट करणारे ‘धर्मनिरपेक्षते’चे तत्त्वही आपल्या घटनेने अंगीकारले. धार्मिक स्वातंत्र्य दिले पण त्याचबरोबर, कोणत्याही धर्माला घटनेतील तत्त्वांच्या विरुद्ध किंवा या तत्त्वांची पायमल्ली करणारा प्रचार करता येऊ नये, अशाही तरतुदी कायद्यांनी झाल्या. पुढे घटनेतच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचाही समावेश करून, देशाची अखंडता व एकात्मता टिकवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे घटनेने स्पष्ट केले.

मात्र अनेकदा, आणि विशेषत: गेल्या चार वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या संमतिदर्शक मौनामुळे, निओ-ब्राह्मिनिझमसदृश प्रवृत्ती आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेला बाधा आणू पाहात आहेत. ‘वेदिक ब्राह्मिनिझम’कडून ‘निओ-ब्राह्मिनिझम’कडे आणि तेथून पुढे आजच्या हिंदू धर्माच्या स्वरूपाकडे परिवर्तन घडून आले, हे अभ्यासक-विद्वानांनाही मान्य आहेच. परंतु चिंतेची बाब ही की, वेदिक ब्राह्मिनिझमच्या काळातील विषमतावादी, हिंसक आणि विघटित करणाऱ्या प्रवृत्ती एकविसाव्या शतकातही, राज्यघटनेच्या पायावर राष्ट्रउभारणी सुरू झाल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही कशा काय डोके वर काढतात? याच्या उत्तरासाठी लालमणी जोशी यांच्या अभ्यासाचा आधार घ्यावा लागेल. ते म्हणतात- ‘‘ ब्राह्मिनिझमची पीछेहाट क्वचितच झाली. जी काही वाढ दिसली त्या दिशेला आपली म्हणत ब्राह्मिनिझम शतकानुशतके वाढतच गेला, आणि नॉन-ब्राह्मिनिकल तत्त्वांच्या संदर्भात स्वत:ची फेररचना करतानाही या परंपरेने आपले मूळ (विषमतामूलक) स्वरूप तसेच राखले. वर्ण आणि त्यावर आधारलेल्या जाती या ‘देवदत्त रचने’चा भाग आहेत, त्यामुळे व्यवहारांत स्पृश्यास्पृश्यता पाळावी लागते, हे वेदिक ब्राह्मिनिकल धर्माचे तत्त्व आजदेखील तसेच राहिलेले आहे.’’ ही धार्मिक परंपरा उच्च मानणाऱ्या समाजात जातिव्यवस्था कायम राहिली नसती आणि स्पृश्यास्पृश्यता या ना त्या स्वरूपात टिकवूनच ठेवणारा सामाजिक व्यवहार आजही दिसत नसता, तर ‘पूर्वास्पृश्य जातीं’ना टीका करण्याचे, निषेध नोंदवीत राहण्याचे काही कारणच उरले नसते. तसे झालेले नाही. शतकानुशतकांपासून ज्यांच्यावर अन्याय होत राहिला असा जगातील एकमेव समाजघटक म्हणून आजही या ‘पूर्वास्पृश्य जातीं’चा (आजच्या ‘अनुसूचित जातीं’चा) उल्लेख अभ्यासक करतात. भारतातील या अन्यायग्रस्त ‘पूर्वास्पृश्य जातीं’पैकी ९४ टक्के व्यक्तींनी २०११च्या जनगणनेमध्ये आपला धर्म ‘हिंदू’ असाच नोंदवलेला आहे, म्हणजे हिंदू धर्म आता तरी बदलेल, अशी आशा त्यांना आहे.

ही आशा हिंदू धर्माला पुढे नेणारी ठरायला हवी असेल, तर आधी जातिप्रथेचे निर्मूलन आणि कोणत्याही स्वरूपातील अस्पृश्यतेचे उच्चाटन करून, साऱ्या समाजाने समान अधिकारांच्या पायावर उभे राहायला हवेच.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुप्रतिष्ठ प्राध्यापक, तसेच ‘असोसिएशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक इक्वालिटी’चे अध्यक्ष आहेत.

thoratsukhadeo@yahoo.co.in