कार तयार करण्यासाठी आवश्यक अशा वाहन जुळवणी मार्गिकेची सुरुवात करणाऱ्या सर हेन्री फोर्ड यांची कल्पना जिनियस अशीच होती. अत्यंत परिणामकारक आणि उपयोगी अशी ही प्रक्रिया गेली अनेक वर्षांपासून जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांच्या कारखान्यात राबविली जात आहे. कार ही हजारो सुट्टय़ा भागांपासून तयार होत असते. ही एक अत्यंत किचकट अशी प्रक्रिया आहे. पण नव्या निर्मिती प्रक्रियेमुळे खूप बदल झाले. कारनिर्मितीवर भविष्यातील ३डी प्रिंटिंगचा काय परिणाम होऊ शकतो?

निश्चितच. निर्मितीची ही प्रक्रिया म्हणजे अमर्याद आहे आणि जे ते वापरत आहे ते या तंत्रज्ञानाबद्दल भरभरून बोलत आहेत. योग्य संसाधने मिळाली तर कोणीही असे प्रिंट त्यांच्या कारवर करून घेऊ शकतो. या साऱ्या गोष्टी विनासायास घडण्यास काही कालावधीही लागण्याची शक्यता आहे.

वाहन जगतात असे ३डी प्रिंटिंग खूपच उपयोगी ठरत आहे. विंटेज कारसाठी तसेच मोटारसायकलसाठी वेडे असणाऱ्यांना हे माहीतच असेल की २५-३० वर्षे जुना एखादा वाहनाचा भाग पुन्हा सापडणे खूपच कठीण असते. ३डीबाबतही तसेच. या माध्यमात सध्या एबीएस प्लास्टिक आणि कार्बन फायबरच सर्वसाधारपणे वापरले जाते. त्यात आणखी काही अन्य साहित्यही असते.

एखाद्या खास वाहनांसाठी खास वापर करण्याचे तंत्रज्ञानही या पर्यायात उपलब्ध आहे. भारतात हा प्रकार जास्त नाही. मात्र अमेरिका, जपानच्या वाहन बाजारपेठेत अशा कस्टमाईज कारची खूप चलती आहे. वैयक्तिक आवडीपोटी अनेक जण त्यांची वाहने हवी तशी बनवून घेतात. त्यामुळे अशा वाहनांचे वेगळेपण लक्ष वेधते. भारतात हे दुर्मीळ आहे.

वाहन निर्मात्यांनी अधिक खुलेपणाने याबाबतच्या कल्पना लढविल्या तर ग्राहकांनाही त्यांच्या वाहनांमध्ये बदल करून घेता येतील. वाहनाचा अंतर्गत भाग तसेच त्याचे बाह्य़ रूप हे हवे तसे करता येईल. वाहनाची उपयोगिता वाढविण्यासाठी केलेला असा प्रयोग नेमक्या कारणासाठी सार्थ ठरू शकतो. कारचे बॉडी पॅनल जर एखाद्या अपघातात खराब झाले तर अशा माध्यमातून ते बदलता येते. यामुळे वाहनासाठीचा प्रतीक्षा कालावधीही कमी होतो. वाहनाच्या सव्‍‌र्हिस स्टेशनवरही याकरिता अतिरिक्त वस्तू/भाग साठा करण्याची गरज राहणार नाही. कारण ३डी प्रिंटिंग उपलब्ध असेल. त्यासाठी केवळ कॉम्प्युटरवर एक कमांड मारायची गरज असेल की सारे तयार.

असे तंत्रज्ञान एकदा का मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाले की वाहनप्रेमींचा प्रवास अधिक सुखकारक, आनंदमय होईल!

प्रणव सोनोने pranavsonone@gmail.com