कोकणकडा राइडनंतर काही तरी विधायक करण्याच्या उद्देशाने आमच्या ग्रुपचे प्रयत्न सुरू होते. एक दिवस सीएट टायर्सचे विभागीय अधिकारी मोहित कुमार यांचा मुंबई-दिल्ली-आग्रा राइडसाठी फोन आला. रस्ते सुरक्षा विषयक संदेश पोहोचविणे हा विषय होता. त्याचबरोबर एफझेडसाठी सीएटने नवीन टायर्स बनविले होते. त्याचीही चाचणी त्यांना घ्यायची होती. ही संकल्पना आमच्या ग्रुपला आवडली. पहिल्यांदा पाच जणांच्या चमूने जायचे ठरले. नंतर दोघे जण असे सात जण. रॅलीमध्ये संदेश देण्यासाठी पोस्टर्स, सादरीकरणाची पूर्ण तयारी करूनच निघालो.
पाहिला टप्पा सुरत ठरला. नियम पाळत साधारण ८० किमी प्रति तासाच्या वेगाने जात होतो. एनएच८ वरून जात असताना वापीजवळ एका स्थानिकाच्या मोटारसायकलला अपघात झाला. या वेळी आम्ही कर्तव्य समजून त्याला मदत केली. सुदैवाने त्याला जास्त लागले नसल्याने आम्ही सुरतकडे निघालो. रात्रीचा १ वाजला होता. सीएटतर्फे राहण्याची सोय करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरतमधील युवकांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन करून जयपूरला निघालो. बडोद्यामध्ये पोहोचायला साधारण दुपारचे तीन वाजले होते. उष्ण हवामानामुळे त्रास होत होता. त्यामुळे थोडे थांबून पुढे जायचे ठरले. या वेळी टायरमधील हवेचा दाब ३२ वरून ४८ पीएसआयवर पोहोचला होता. यामुळे टायरमधील हवा कमी करावी लागली. अन्यथा टायर फुटून अपघात होण्याची शक्यता होती. जयपूरपासून २५० किमी अंतरावर असताना सायंकाळ झाली होती. या वेळी आमच्या एका सदस्याची मोटारसायकल बिघडली. आजूबाजूला गॅरेज नसल्याने दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात पाच तास गेले. रात्रीचे ११ वाजले होते. पुढच्या मुक्कामावर जाण्यास उशीर होत होता. महामार्गावर सर्व सुनसान. अशातच एका टवेरा वाहनचालकाने मदतीचा हात दिला. एफझेड काही भागांमध्ये वेगळी करून टवेरामध्ये टाकली व पुढे निघालो. वाटेत पोलिसांनी पकडण्याची भीती होती. दुसरा पर्यायही नव्हता. अशातच निसर्गानेही आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. राजस्थानमध्ये प्रवेश करताच जोरदार पावसाने आमचे स्वागत केले. छत्तीस तासांच्या प्रवासामुळे शीण आल्याने दुपारी एकच्या सुमारास उदयपूरजवळ थांबण्याचे ठरविले. बिघडलेली मोटारसायकल घेऊन सर्वत्र फिरणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही मोटारसायकल ट्रान्स्पोर्टने मुंबईला पाठविण्याचा निर्णय घेतला. पुढे जात असताना जयपूर पोलिसांनी टवेराची तपासणी केली. या वेळी मोटारसायकल खोललेल्या अवस्थेत सापडल्याने चोरीची मोटारसाकल असण्याच्या शक्यतेने पोलिसांनी वेळ घेतला. या ‘अर्थ’ दिव्यातून बाहेर पडल्यानंतर मोटारसायकल मुंबईला पाठवत पुढे निघालो.
यानंतर नवे संकट आमची वाट पाहत होते. पेट्रोल पंप २३ किमीवर होता आणि सर्वाच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपत आले होते. दिल्लीला नियोजित वेळेत पोहोचण्यासाठीही बराच उशिर झाला होता. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने रस्त्याची कामे सुरू असल्याने रात्रीचे पुढे न जाण्याचे सुचविले. आम्हाला त्याच रात्री दिल्लीला पोहोचायचे होते. धाबेही बंद होते. शेवटी एके ठिकाणी रात्री दोन वाजता थांबण्यासाठी जागा मिळाली. पहाटे पाच वाजता पुन्हा दिल्लीकडे प्रयाण. पाऊस आणि रस्ता यामुळे वेग मंदावला होता. अखेर दिल्लीला पोहोचलो. मात्र ट्रॅफिकने पुरते बेजार झालो. तेथे सीएटतर्फे सेमिनार ठेवण्यात आले होते. लाल किल्ला, इंडिया गेट, मीना बाजारमध्ये सुरक्षित वाहन चालविण्याविषयी मार्गदर्शन करत आग्य्राकडे निघालो. आग्य््राामध्ये पोहोचल्यावर जरा हायसे वाटले. एका दिवसाचा मुक्काम करत पुन्हा मुंबईकडे प्रयाण केले. एक वेगळा अनुभव आणि काही तरी विधायक काम केल्याचे समाधान घेऊन.

– प्रथमेश साबळे, मुंबई</strong>