मोटारसायकलला नवीन रूपडे देणे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनविलेली बहुपयोगी इलेक्ट्रिक कार व बी.ए., बी.कॉम. पाश्र्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांनी अवघ्या ४५ दिवसांत बनविलेले कारचे प्रारूप पुणे ऑटो एक्स्पोमध्ये लक्ष वेधून घेत होते. बेनेली, हार्ले डेव्हिडसन वगळता वाहन क्षेत्रातील बहुचर्चित कंपन्यांनी एक्स्पोकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत असतानाच स्टार्टअप कंपन्यांना दिलासा मिळाला आहे..

मोटारसायकलप्रेमींना या ऑटो एक्स्पोने सर्वाधिक प्रभावित केले ते मोटारसायकलला नवीन रूपडे देणाऱ्या अयास कस्टम मोटारसायकल आणि जोट मोटो या दोन स्टार्टअप कंपन्यांनी. जोट मोटो काहीशी जुनी असली तरी त्यांनी बनविलेली मोटारसायकल सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. त्यांनी एफझेड, पल्सरसारख्या मोटारसायकलींचे कस्टमायझेशन केले होते. या मोटारसायकलना मस्क्युलर लुक आणतानाच एलईडी दिवे बसविण्यात आले होते. ग्राहकांनी त्यांच्या जबाबदारीवर मागणी केल्याने आरटीओची परवानगी नसताना एलईडी दिवे लावल्याचे या कंपनीच्या सदस्यांनी सांगितले. तर अयास कंपनीने दसऱ्याच्या मुहूर्तावर मोटारसायकलचे रूपडे बदलण्यास सुरुवात केली. प्रदर्शनात मांडलेली मोटारसायकल सीडी डिलक्स आहे. तिचे मॉडिफिकेशन करून नवे रूप देण्यात आले आहे. या एक्स्पोमुळे कंपनीला नव्या ऑर्डर मिळाल्या आहेत. स्वत:ची मोटारसायकल असल्यास ४५ हजारांत, तर त्यांच्याकडून मोटारसायकल घेतल्यास ७५ हजारपासून पुढे किमतीला मॉडिफिकेशन करून मिळते.
बॅटरी चार्जर
मोटारसायकलपासून ते मोठय़ा ट्रकपर्यंत सर्वानाच कधी ना कधी बॅटरी चार्जिग उतरल्याचा अनुभव येतो. नाना इंडस्ट्रिज ही कंपनी या क्षेत्रात १९५७ पासून काम करत आहे. या कंपनीची घरी बॅटरी चार्ज करण्याची उपकरणे या एक्स्पोमध्ये उपलब्ध होती. या उपकरणांमध्ये बॅटरीचे आरोग्य, व्होल्टेज मीटर, टायमर आदी डिजिटलमध्ये दिसत असल्याने गॅरेज व घरगुती वापरासाठी ही उत्पादने फायदेशीर ठरतील, असा दावा कंपनीच्या प्रतिनिधीने केला.
अॅटोक्लच प्रणाली
नॅनोपासून मर्सिडीजपर्यंत वापरत असलेले अॅटोक्लच तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या अॅटोमेट कंपनीनेही या प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले. या प्रणालीचा फायदा वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्यावेळी होतो. ऑटोमॅटिक तंत्रज्ञानापेक्षा हे तंत्रज्ञान सरस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्वस्त, गाडीमध्ये मोठे बदल न करता वापराता येणारे हे तंत्रज्ञान आहे. ट्रॅफिकमध्ये फसल्यावर सारखे क्लच, गिअर, अॅक्सिलेटरशी खेळावे लागते. यामध्ये चालकाची सत्त्वपरीक्षा असते. त्याचसोबत इंधनही भरपूर लागते. अॅटोक्लच तंत्रज्ञानाने यावर मात केली असून चालकाला आराम मिळण्यासोबतच इंधनाची बचत होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही यंत्रणा एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये बसविता येते. मर्सिडीज, सॅन्टाफी यांसारख्या वाहनांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
वुर्थ इंडिया
वाहनांना लागणाऱ्या विविध टूल्स बनविणारी कंपनी वुर्थने भारतामध्ये आपली उत्पादने उपलब्ध केली आहेत. ही जर्मन कंपनी आहे. गंज काढणारे, ग्रीस, चेन क्लिनर, व्ॉक्स पॉलिश आदींचे उत्पादन ही कंपनी करते. याचसोबत सव्र्हिस सेंटर्स, गॅरेजना लागणारे टूल्सही ही कंपनी बनविते.

बेनेली, हार्ले डेव्हिडसन

मोटारसायकल निर्मात्या कंपन्या बेनेली आणि हार्ले डेव्हिडसन या कंपन्यांनी एक्स्पोमध्ये सर्वानाच आकर्षित केले. डीएसके बेनेलीने २४९ सीसी आणि ६०० सीसीच्या दोन मोटारसायकल प्रदर्शनात ठेवल्या होत्या. तसेच १९२१ पासून आतापर्यंत मोटारसायकल निर्मितीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यांची छायाचित्रे मांडली होती. त्याचबरोबर हार्ले डेव्हिडसनने आपल्या दोन मोटारसायकल प्रदर्शनात ठेवल्या होत्या.

विद्यार्थ्यांचे स्टार्टअप
बहुपयोगी हायब्रिड कार

dr04r पुणे इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली बहुपयोगी इलेक्ट्रिक कार सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. बॅटरीसोबतच पायाने मारायचे पॅडल हे या वाहनाचे खास वैशिष्टय़ होते. लघुउद्योजकांना, फळ-भाजी विक्रेत्यांना कमी किमतीमध्ये व्यवसाय करण्यासाठी वाहन उपलब्ध व्हावे, असा उद्देश या वाहनाच्या निर्मितीमागे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयीन स्पर्धाबरोबरच उपयोगी वाहन बनविण्याचा विचार करण्यात आला. यातून फक्त २५ पैसे प्रति किलोमीटर खर्च येणाऱ्या या तीनचाकी वाहनाची निर्मिती झाली. या वाहनाचे वजन १०० किलो असून ४२ किमीचा सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला आहे. पुढील काळात यामध्ये सुधारणा करत सौरपॅनलद्वारे बॅटरी चार्जिग, उद्योजकांना वस्तू ठेवण्यासाठी ट्रॉलीचा समावेश करण्यात येणार आहे. अशा प्रयोगांना स्टार्टअपद्वारे आर्थिक साहाय्य मिळण्याची गरज विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

४५ दिवसांतील बग्गी
dr05rया ऑटो एक्स्पोचे आणखी एक आकर्षण म्हणजे बी.ए., बी.कॉम. पाश्र्वभूमीच्या विद्यार्थ्यांनी स्किल इंडियाअंतर्गत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत ४५ दिवसांत बनविलेली बग्गी. मुंबईतील ऑटो इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून फक्त ५० हजारांत साकारलेली ही बग्गी पुढील काळात शेतीसाठी उपयोगी पॉवर ट्रीलर प्रकारात बदलण्याचा विचार या विद्यार्थ्यांचा आहे. या बग्गीला पल्सर १५०सीसीचे इंजिन बसविण्यात आले असून स्ट्रॉ मॉडेलद्वारे याचे प्रारूप तयार करण्यात आले. याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्यातील सायकलही विजेवर चालणारी बनविण्यात आली आहे. ती १०० किलो वजन पेलू शकते. या सायकलचा वापर मोठय़ा कंपन्यांमध्ये होऊ शकतो. विस्तीर्ण परिसरामध्ये येण्या-जाण्यासाठी कंपन्यांतर्गत याचा वापर होऊ शकेल.
– हेमंत बावकर – hemant.bavkar@expressindia.com