संदीप चव्हाण
बाजारात अनेक प्रकारची पुठ्ठ्यांची खोकी उपलब्ध असतात. किराणा दुकानात बिस्किटांचे खोके मिळतात, तर कधी आपल्या/ मित्रांच्या घरी किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, प्रिंटर्स यांची मोठमोठी खोकी उपलब्ध होतात. अर्थात या खोक्यांच्या जाडीवर त्यांचा टिकाऊपणा अवलंबून असतो, पण या खोक्यांना पातळ प्लास्टिकचे आवरण आतून दिल्यास या खोक्याचे आयुष्यमान वाढते. प्लास्टिकचे आवरण दिल्यास किंवा प्लास्टिक कोटेड असलेल्या खोक्यामधून पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी भोके पाडावीत किंवा आतील पाणी बाहेर निघून जाण्यासाठी प्लास्टिक नळाचे आऊटलेट द्यावे. प्लास्टिक कापडाचे आवरण दिलेली खोकी ही वर्ष-दीड वर्षे तरी टिकतात किंवा या खोक्यांवर ॲक्रेलिक रंगांनी बाहेरून रंग दिल्यास तेही दिसायला सुंदर दिसते. म्हणजे आतून प्लास्टिक कापडाचे आवरण आणि बाहेरून रंगाचे आवरण.
खोक्यात वरील पसरट भाग अधिक मिळाल्यामुळे त्यात विविध पालेभाज्या लावता येतात. मोठ्या, रुंद खोक्यांमध्ये फळझाडे चांगली तग धरतात. अर्थात त्यांना कालांतराने स्थलांतरित करणे गरजेचे असते. ही खोकी ऊन व पाण्यामुळे मलूल होतात. या मलूल झालेल्या कागदाचे छान खत तयार होते. गांडुळेही हे छान आवडीने खातात. पावसाळ्यात ही खोकी आडोशाला ठेवावीत म्हणजे त्याखाली गांडुळे निवास करतात. थर्माकोलचीही खोकी ही फुलेझाडे लावण्यासाठी योग्य आहेत. त्यात शक्यतो भाजीपाला लागवड करू नये. या खोक्यातून मोठ्या प्रमाणात रसायने बाहेर टाकली जातात. एरवी ही खोकी हलकी व बराच काळ टिकणारी असतात.
सुपारीची पाने
खोक्यांप्रमाणेच सुपारीच्या झाडांची पानेही झाडे लागवडीसाठी उपयुक्त ठरतात. सुपारीच्या झाडाची पाने खालच्या भागाला रुंद व दणकट असल्याने त्यांच्यापासून सध्या बाजारात इकोफ्रेंडली ताटे, वाट्या, ट्रे तयार केले जातात. या पानांचा खालचा भाग सुपाएवढा असतो. या पानांना छान चारही बाजूंनी बाक देऊन बांधून घेतल्यास त्याला छान घमेल्याएवढा आकार येतो. त्यात आपण हवा तो भाजीपाला लावू शकतो. त्याची लांबी-रुंदी व खोली जास्त मिळाल्यास त्यात वेलवर्गीय भाज्याही लावता येतात. ही पाने दिसायला अगदी स्वच्छ असतात. शिवाय ऊन, पाऊस, पाण्याच्या संपर्कातही छान तग धरतात. या पानांचे एकाखाली एक असे अस्तर देऊन त्यावर विटांचे वाफे केल्यास प्लास्टिकसारखाही वापर करता येतो. त्याला छान चौकोनी आकारात कापून त्याचे पाच इंच खोलीचे छान पसरट ट्रेसुद्धा तयार करता येतात.
sandeepkchavan79@gmail.com