डॉ. शारदा महांडुळे

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कायम उपलब्ध असणारी भाजी म्हणजे बटाटा होय. म्हणूनच अचानक पाहुणे आल्यानंतर अनेक वेळा बटाट्याची भाजी करून पाहुणचार केला जातो. संपूर्ण जगातसुद्धा बटाटा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. सर्व देशांमध्ये भाजी म्हणून बटाट्याचा जितका उपयोग केला जातो, तितका दुसऱ्या कुठल्याच भाजीचा उपयोग केला जात नाही. यामुळेच अनेकजण बटाटाला भाज्यांचा राजा म्हणूनही संबोधतात. बटाट्याचा अनेक खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपयोग केला जातो. अशा या स्वयंपाकघरातील उपयुक्त बटाट्याला हिंदीमध्ये ‘आलू’, इंग्रजीमध्ये ‘पोटॅटो’, संस्कृतमध्ये ‘आलुकः’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘सोलॅनम ट्यूबरोसम’ (Solanum Tuberosum) या नावाने ओळखले जात असून त्याचे कूळ ‘सोलॅनसी’ आहे. बटाट्याचे रंगानुसार लाल व पांढरा, तर आकारानुसार लहान व मोठे असे प्रकार पडतात. दक्षिण अमेरिका हे बटाट्याचे मूळ उगम स्थान आहे. तेथून तो युरोप व नंतर युरोपातून भारतात सतराव्या शतकात प्रसिद्ध झाला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
संविधानभान: सकारात्मक भेदभाव म्हणजे काय?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : बटाटा हा वातवर्धक, अग्निप्रदीपक, बलकारक, शीत, मधुर, पचण्यास जड, वीर्यवर्धक व कफकारक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’, ‘क’ व ‘ब’ जीवनसत्त्वे, पिष्टमय पदार्थ व उत्तम प्रथिनेही विपुल प्रमाणात आहेत. त्याचबरोबर अल्कलीयुक्त क्षार, पोटॅशिअम, आर्द्रता व तंतुमय पदार्थ यांचाही साठा भरपूर आहे. या सर्व गुणधर्मांमुळे बटाटा हा शरीरास पोषक ठरतो.

उपयोग :

१) बटाट्यातील औषधी गुणधर्माच्या पोषक घटकामुळे तो कमी पैशांत मिळणारा गरीब-श्रीमंत वर्गाचा आवडता आहारीय पदार्थ म्हणून नावाजलेला आहे.

२) बटाटा हा अल्कलीयुक्त गुणांनी समृद्ध असल्यामुळे जेव्हा शरीराला अतिरिक्त आम्लाचा त्रास होत असेल, तर अशा वेळी आम्लाचे प्रमाण कमी करण्यासाठी बटाट्याचा उपयोग करावा.

३) जुनाट मलावरोध, आम्लपित्त या विकारांवर बटाटा उकडून त्याचे सूप करून प्यावे.

४) शरीरामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढत असेल, तसेच मूतखडा होऊन मूत्रप्रवृत्तीला अडथळा निर्माण झाला असेल, तर अशा वेळी आहारात टोमॅटो, काकडी, पालक, बीटची पाने, कोथिंबीर व बटाटा या सर्व भाज्या एकत्र करून त्याचे सूप प्यावे. हे सूप नियमित काही दिवस घेतल्यास मूत्रप्रवृत्ती साफ होते.

५) सौंदर्यविकारांमध्येही बटाटा गुणकारी आहे. बटाट्यामध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस, क्लोरिन, गंधक हे घटक असल्यामुळे त्याचा रस त्वचेवर लावल्यास काळवंडलेली त्वचा नितळ होते. फक्त हा प्रयोग करताना कच्च्या बटाट्याची पेस्ट किंवा रस वापरावा. बटाटा उकडल्यास वरील घटकद्रव्ये कमी होतात.

६) चेहऱ्यावर काळे वांग आले असतील, तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील, तर बटाट्याची पेस्ट व लोणी एकत्र करून चेहऱ्याला हलक्या हाताने १०-१५ मिनिटे चोळावे. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा कांतियुक्त होते.

७) केस रूक्ष व कोरडे होऊन केसांचा रूक्षपणा वाढला असेल, तर तो कमी करण्यासाठी बटाटे उकडलेले पाणी फेकून न देता अंघोळीच्या वेळी केसांवरून घ्यावे. बटाट्याच्या सालीलगत ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यासोबत प्रथिनेही विपुल प्रमाणात असल्याने केसांचा रूक्षपणा कमी होऊन केस मृदू – मुलायम व लांब होतात.

८) त्वचेवर एखादी जुनी जखम असेल, तर ती जखम भरून येण्यासाठी कच्च्या बटाट्याची पेस्ट जखमेवर लावून वरून सुती कापड बांधावे. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व अल्कलीमुळे जखमेतील जंतू नाहीसे होऊन जखम भरून येते. त्याचसोबत व त्यामधील आम्लामुळे त्वचेच्या निर्जीव पेशी निघून जाऊन जखम स्वच्छ होते व तेथील त्वचा कांतियुक्त होते.

९) सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल, तर बटाट्याचा काढा करून तो तीळतेलात उकळावा व याने सिद्ध झालेले तेल सांध्याच्या जागी लावावे. त्यामुळे सांध्याची सूज व सांधेदुखी कमी होते.

१०) चेहऱ्याचा गोरेपणा वाढवायचा असेल, तर बटाट्याची पेस्ट (लगदा ) हलक्या हाताने चेहऱ्याला लावावी. त्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक सोडा, पोटॅशिअम व अल्कलीमुळे बटाटा नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करतो. त्यामुळे आपोआप चेहऱ्याचा गोरेपणा वाढतो.

११) पोटात आग होणे, जळजळ वाटणे, आंबट ढेकर येणे अशा विकारांवर कच्च्या बटाट्याचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ घ्यावा.

१२) उपवासाच्या दिवशी साबुदाण्याऐवजी आहारामध्ये बटाट्याचा वापर करावा. बटाट्याचे वेफर्स, पापड, कीस, भाजी, खीर, पुरी, शिरा असे विविध पदार्थ घरी तयार करून खावेत.

१३) बटाटे वाफवून सुकवून त्याचे पीठ बनवून ठेवावे व उपवासाच्या दिवशी त्या पिठाचे धिरडे, पोळी बनवून खावी.

१४) भाजीमध्ये किंवा सूपमध्ये चुकून मिठाचे प्रमाण जास्त झाले असेल, तर त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी बटाटा उकडून त्याचे बारीक काप त्यात टाकावेत.

१५) चांदीची भांडी काळसर पडली असतील, तर ती स्वच्छ होण्यासाठी बटाटे उकडलेल्या पाण्यामध्ये ती भांडी ठेवावीत. याने भांडी पांढरीशुभ्र होऊन त्यांची चकाकी वाढेल.

१६) शरीराने कृश असणाऱ्या व्यक्तींनी तसेच अति श्रम करणाऱ्या व्यक्तींनी, ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, अशा व्यक्तींनी बटाट्याचा वापर आहारात आवर्जून करावा. याने शरीराचे पोषण होऊन वजन वाढीस लागते.

सावधानता :

ज्यांना मधुमेह झालेला आहे, तसेच ज्यांची भूक मंद स्वरूपाची आहे, त्याचबरोबर कायम आजारी असणाऱ्या लोकांनी बटाट्याचा वापर कमी प्रमाणात करावा किंवा बटाटा खाणे टाळावे. तसेच बैठे काम करणाऱ्या व्यक्तींनी व लठ्ठपणा असणाऱ्यांनीही आहारात बटाट्याचा वापर करणे टाळावे व खाल्लाच तर तो कमी प्रमाणात खावा, कारण बटाट्याने वजन वाढते.

dr.sharda.mahandule@gmail.com