जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही आव्हान पार केलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकच्या बंगळुरूमधील अश्विनी गणपती. ३९ वर्षांच्या अश्विनीने जपानमधील सर्वांत कठीण समजली जाणारी ‘डीप जपान अल्ट्रा १०० (Deep Japan Ultra 110)’ ही शर्यत पूर्ण केली आहे. सलग ४५ तास झोप न घेता अखंड धावून तिनं ही स्पर्धा जिंकली आहे. बर्फाने आच्छादलेले डोंगर आणि अत्यंत लहरी, प्रतिकूल हवामानामध्ये तिने ही १७३ किलोमीटरची शर्यत पूर्ण केली आहे. ही शर्यत पूर्ण करून अश्विनीने एक इतिहासही रचला आहे. ही शर्यत पूर्ण करणारी जपानी नसलेली ती एकमेव स्पर्धकही ठरली आहे. जेव्हा महिला एखादं ध्येय गाठायचं ठरवते तेव्हा ती अशक्य गोष्टीही शक्य करू शकते, हे अश्विनीनं दाखवून दिलं आहे.

डीप जपान अल्ट्रा १०० (Deep Japan Ultra 110)’ ही फक्त जगभरातील सर्वात कठीण शर्यतींपैकी एक आहे. डोंगराळ प्रदेशातील चढउतार, जोरदार वादळ वारे आणि सोबतीला कोणीही नाही अशा परिस्थितीत अश्विनी तिच्या ध्येयाच्या दिशेने दिवसरात्र धावत होती. या ४५ तासांत तिने अजिबात झोप घेतली नाही, ताजं अन्नही अगदी जरुरीपुरतंच खाल्लं होतं. अर्थातच तिला प्रचंड थकवाही आला होता. १३० किलोमीटरचा टप्पा पार झाल्यावर तर तिचे पाय थरथरायला लागले होते, एका क्षणी इथंच थांबायचं का असं तिला वाटलंही. पण तिनं तो विचार बाजूला सारला. हा क्षण तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो हे तिला माहिती होतं. तिच्या पाठीवरची ८ किलोची बॅगपॅक तिनं पुन्हा नीट केली आणि पुन्हा नव्या जोमाने तिनं शर्यत सुरू केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १३५ स्पर्धकांपैकी फक्त ६३ स्पर्धकच ही शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरले. खरं तर अश्विनी तुमच्याआमच्यासारखीच एक सर्वसाधारण मुलगी आहे. भरपूर अभ्यास करून, उत्तम करियर करून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचं तिचं स्वप्नं होतं. आयटी क्षेत्रात तिनं ९ वर्षे काम केलं. तिचं लग्नं झालं. सगळं काही सरळ रेषेवरून ठरल्यासारखं सुरू होतं. पण तरीही काहीतरी वेगळं करण्यासाठी तिचा आतला आवाज तिला खुणावत होता. तिनं हा आवाज ऐकला.

शाळेत असताना अश्विनी हॉकी खेळायची. तेव्हाच आपल्याकडे वेगापेक्षा सहनशक्ती जास्त असल्याचं तिला जाणवलं. २०१९ मध्ये अश्विनीनं पहिल्यांदा कर्नाटकातील मालनाड अल्ट्रा शर्यतीत भाग घेतला होता. ११० किलोमीटरच्या या शर्यतीत १०० किलोमीटर पूर्ण केल्यावरही आपण आणखी पुढे जाऊ शकतो हे तिला जाणवलं. तेव्हापासूनच तिनं १०० मैलाचा टप्पा पार करण्याचा स्वप्न पाहायला सुरुवात केली. त्यासाठी आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी तिनं सोडली आणि पूर्णवेळ एंड्युरन्स कोचिंग तसंच अल्ट्रा रनिंगच्या प्रशिक्षणाला सुरूवात केली. हे प्रशिक्षण अत्यंत अवघड होतं. दर आठवड्याला ती ७० ते ९० किलोमीटर धावण्याचा सराव करत होती. यामध्ये शारीरिक सहनशक्ती, ताकद वाढवण्यासाठी तर प्रशिक्षण होतंच. पण मानसिक ताकद वाढवण्यावरही तिनं काम केलं. सरावासाठी मानसिक ताकदीचा कस लागणाऱ्या शर्यतीच तिनं निवडल्या. बॅकयार्ड अल्ट्रा या शर्यतीत तिनं १८७.८ किलोमीटरचं अंतर सलग २८ तास धावून पूर्ण केलं. या प्रशिक्षण आणि सरावामुळे जपानमधली शर्यत पूर्ण करण्यासाठी ती सज्ज होऊ शकली. पण ही शर्यत वाटत होती तेवढी सोपी नव्हती. “एक पर्वत चढून झाला की ते तुम्हाला आणखी एक चढायला सांगतात, मग त्यानंतर पुन्हा एक… पुन्हा एक… तुम्ही जंगलातून धावत असता. शर्यतीच्या मार्गावर मदतकेंद्र अगदी तुरळक असतात. काहीवेळेस तर अगदी २८ किलोमीटरच्या अंतरावर एखादे केंद्र असते. अति उष्ण आणि दमट हवामानात धावणं कित्येक स्पर्धकांना खूप कठीण जातं आणि ते शर्यत सोडून देतात. ७२ स्पर्धकांनी ही शर्यत मध्येच सोडून दिली,यावरून ती किती खडतर असते याचा अंदाज येऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया अश्विनीनं ही स्पर्धा जिंकल्यानंतर दिली होती. शर्यतीत बॅगपॅक पाठीवर घेऊनच स्पर्धकाला धावायचं होतं. त्यामुळे अश्विनीनं पाणी, शाकाहारी खाद्यपदार्थ, सेफ्टी गिअर अशा गरजेच्या वस्तू ठेवल्या होत्या. जवळपास ८ किलोपेक्षाही जास्त वजन या बॅगपॅकमध्ये होतं, तरीही ती धावली आणि तिनं शर्यत पूर्ण केली. ती जेव्हा अंतिम रेषेपर्यंत पोहोचली तेव्हा प्रचंड थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. आपलं स्वप्नं जिद्दीनं पूर्ण केल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. “महिलांमध्ये मुळातच अमर्याद सहनशक्ती असते. स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवून जास्तीत जास्त महिला या स्पर्धांमध्ये येतील अशी मला आशा आहे,”असं अश्विनीचं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनीला ही शर्यत तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी पूर्ण करायची होती. तिचे पती आणि तिच्या सासुबाईंचा तिला या अत्यंत अवघड शर्यतीसाठी पूर्ण पाठिंबा होता. ती सलग प्रशिक्षणात असताना तिच्या सासुबाईंनी पूर्ण घर सांभाळलं. त्यामुळे ती त्या बाजूने तणावमुक्त होती. या स्पर्धेला ऑटोमॅटीव्ह टेक कंपनी Tekion for Good च्या सीएसआर विंगने आर्थिक सहकार्य केले होते. जपानमधल्या स्पर्धेतलं यश इतकीच अश्विनीची यशोगाथा मर्यादित नाही. ती प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा आहे. ‘तुम्ही तुम्हाला हवं ते साध्य करू शकता,’ असं सांगणारा स्वत:चा आतला आवाज ऐका. स्वत:वर विश्वास ठेवा आणि टप्प्याटप्प्याने तुमचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीने चालत राहा, हेच अश्विनीनं दाखवून दिलं आहे.