आई-बाबांना घेऊन शाल्मली मावशीकडे आली तेव्हा तिघांचेही चेहरे गंभीर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझं तन्मयशी जमेल असं वाटत नाही मावशी.” शाल्मलीने बॉम्ब टाकला.

“अगं, अजून महिनाही झाला नाही लग्नाला?”

“त्याला त्याच्या आईचंच कौतुक असतं. माझ्या इच्छेचं काहीच नाही.”

“बघ ना, लग्नात तर केवढा तोरा त्यांचा.”

“लग्नात काही मागितलं तर नव्हतं त्यांनी. तुला काही त्रास दिला का शाल्मली?”

“अगं काही मागितलं नसलं तरी ताठा केवढा. मुलीकडचे लोक म्हणजे क्षुद्र.” आई फणकारली.

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

“घरी त्रास नाही मावशी, पण तन्मय श्रावणबाळ आहे. माझ्या स्वयंपाकावरुन मस्करी करतो, सासुबाईंच्या हातचीच चव आवडते. त्याही मला फारसा स्वयंपाक करू देत नाहीत. मधेच काहीतरी खुस्पट काढतात. आम्ही बाहेर निघाल्यावर म्हणाल्या, ‘जाता जाता देवळात पण जाऊन या.’ तन्मयबाळ लगेच देवळात. तिथे रांगेत इतका वेळ गेला, माझा मूडच गेला. त्यांच्याकडे पाहुणे नेमके संध्याकाळी येतात. बोअर होतं. माझ्या मनासारखं काही होतच नाही. मग वाटतं, ‘कशाला हवं असं लग्न?”

“अगं, दाखवून-ठरवून झालेलं लग्न आहे, ओळख व्हायला वेळ लागेल. नव्या जोडप्याला प्रायव्हसी द्यावी हे कौतुकाच्या भरात एकेकांना नाही कळत.”

“मला घरात बसायची सवय नाही, नव्या जॉबला जॉइन व्हायला वेळ आहे. तन्मयची रजा संपली. गुदमरल्यासारखं होतं ग मावशी. कसं जमणार?”

“पंचवीस लाखाचं लग्न केलंय. महिन्याभरात सगळे वाया?” बाबा गुरगुरले.

“यांचं तिसरंच. गप्प बसा हो जरा.”

“शाल्मली, देवदर्शनाचं एकदा उरकून टाकू आणि नंतर निवांत फिरू म्हणून आधी देवळात नेलं असेल तन्मयनं, पण वेळेचा अंदाज चुकला असणार. घरी आलेल्या पाहुण्यांना नको कसं म्हणणार? आणि स्वयंपाक शिकलीस का तू?”

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

“छे गं, पूर्वीसारखीच जेमतेम करते. पण मी म्हणते, नव्या बायकोचं कौतुक करायला नको त्यानं?”

“तुझ्या सासूबाईंच्या हातची चव कशी आहे गं शाल्मली ?”

“खूप छान आणि नीटनेटकं करतात.” शाल्मली प्रांजळपणे म्हणाली तशी आईच्या चेहऱ्यावर नाराजीच आली थोडी.

सवयीचा कम्फर्ट झोन तुटल्याने शाल्मली गोंधळलीय हे मावशीच्या लक्षात आलं. नवीन माणसं, अपरिचित वातावरण, स्वयंपाकाचा कॉन्फिडन्स नाही, त्यात पाहुणे, प्रायव्हसी नसणं आणि ऑफिसचं रुटीन थांबलेलं त्यामुळे शाल्मलीला सुचेनासं झालं होतं. आई एकदम प्रोटेक्टीव्ह झालेली आणि बाबांचा वेगळाच मुद्दा. मावशीनं चतुराईनं विषय वळवत बहिणीला विचारलं,

“ताई, समजा आपल्या शांतनूचं लग्न झालं, आजोबा लग्नाला येऊ शकले नाहीत, तर तू त्याला सांगशीलच ना, की ‘आधी आजोबांच्या पाया पडून या’ म्हणून?

“अर्थात.”

आणखी वाचा : …तर काळजी नसावी!

“तरीही त्यांच्याकडे जाणं पुढे ढकलून तो बायकोसोबत हिंडत बसला, तर तुला आवडेल? बायको तुझ्यासारखी सुगरण नसताना तिच्या कशाबशा स्वयंपाकाला नावाजत राहिला, तर गं?”

“नाही हं, माझा शांतनू असा बाईलवेडेपणा कधीच करणार नाही. तो किती संस्कारी आहे तुला माहितीय. आधी आजोबांकडे जाईल तो. आणि स्वयंपाक तर त्याला माझाच आवडतो.”

“मग ताई, तन्मय पण तसाच संस्कारी वागत नाहीये का? शांतनूचं लग्न होईल तेव्हा तुझा तोरा कमी असणारे का? आणि नवी सून शांतनूला श्रावणबाळ म्हणेलच, काय शाल्मली ?”

“….”

“ शाल्मलीला सासरी त्रास नाहीये, सासू कौतुकानं चांगलं चुंगलं करून वाढतेय. तन्मयही आवडतोय. त्याची रजा आधी संपतेय तर पुढचे दिवस कसे काढायचे हा तिचा खरा प्रॉब्लेम आहे. तन्मयही नवा नवरा आहे, एकमेकांची सवय करून घ्यायला सगळेच शिकतायत गं. थोडा वेळ द्यायला हवा ना?”

“तेच तर म्हणतोय मी, पंचवीस लाख रुपये महिन्याभरात वाया जाऊन कसं चालेल?”

“जिजाजी, वर्षभरानं वाया गेले तरीही चालणार नाहीये आपल्याला.”

“हो, हो, तेही खरंच.” जिजाजी चपापले.

“बघ शाल्मली. नव्या नात्याचा कम्फर्ट झोन तयार होण्यासाठी थोडा वेळ द्यायचा, की माझ्या कल्पनेतल्यासारखं होत नाही म्हणून लगेच घाबरून पळ काढायचा? चॉइस तुझाच आहे.” मावशी म्हणाली.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice is ours new comfort zone relationship adjustment in life after marriage at husbands home vp
First published on: 13-01-2023 at 09:53 IST