scorecardresearch

Premium

मेसेजला निळी टिक आली, पण उत्तर नाही?…

समाजमाध्यमांचा खरा उद्देश संपर्क राहणे हा; पण एखाद्याला आपण त्यावर ‘पर्सनल’ मेसेज पाठवूनसुद्धा समोरचा उत्तर देत नाही, असं खूपदा घडतं. अशा वेळी ‘समोरची व्यक्ती का असं वागतेय? का मला उत्तर देत नाही?’ अशा शंका मनात येतात. विशेषतः आपण स्त्रिया तर या गोष्टी जरा अधिकच मनाला लावून घेतो!

What is the reason why people WhatsApp messages are not replied even with blue tick
मेसेजला निळी टिक आली, पण उत्तर नाही?…(फोटो सौजन्य : पिक्साबे)

प्राची पाठक

फेसबुक, व्हॉट्सऍपवर आपला मेसेज गेला, की समोरच्याने तो बघितल्याचे आपल्याला कळते. फेसबुकवर ‘seen’ आणि वेळ कळते, तर व्हॉट्सऍपवर निळे टिकमार्क येतात. समोरची व्यक्ती केव्हा-केव्हा ऑनलाईन होती, ते वेळोवेळी कळत राहते. अगदी सहजच! त्यासाठी कॉम्प्युटर/मोबाईल तज्ज्ञ असायची गरज नाही, की अगदीच कोणावर लक्ष ठेवून कोणी बसले आहे, असेही वाटून घ्यायची गरज नाही. तंत्रज्ञानाने एक सुविधा पुरवली आणि आपल्याला त्यात काही अंदाज येतात, म्हणून आपण ती वापरतो. इतरही जे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यात त्या त्या प्रकारे सोय असते. अगदी एसएमएस डिलिव्हर झाला की नाही, तेदेखील आपल्याला कळतं.

udhayanidhi stalin controversial remark on sanatan dharma
‘भेदाभेद अमंगळ’ हेचि तो अर्थ ‘सनातन’!
CTET Result 2023
प्रतीक्षा संपणार! सीटीईटी निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट; निकाल कधी लागणार? जाणून घ्या
women health, back pain, calcium c pill, diagnosis, treatment
स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ?
Personality Traits
Personality Traits : या राशींचे लोक असतात सर्वात जास्त आनंदी, नेहमी असतात सकारात्मक; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

एकीकडे ही चांगली सोय असताना याने गडबड अशी झालीये, की दुसऱ्याच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवून आपण खूपदा आपल्याच मनात समज- गैरसमज तयार करून घेतो! समोरच्याशी न बोलताच आणि समोरच्याची बाजू माहित नसताना आपल्याच मनात अनेक शंकाकुशंका तयार होतात. खासकरून स्त्रिया तर ते फारच मनाला लावून घेतात! आपला मेसेज वाचला, वाचला नाही, आपल्याला ‘ब्लॉक’ केले का, आपल्याला उत्तर किती वेळाने दिले, कसे दिले, सगळे हिशेब सुरु होतात. आपल्याला उत्तर द्यायच्या आधी कितीवेळा ती व्यक्ती ‘लास्ट सीन’मध्ये येऊन गेली आणि किती वेळाने आपल्याला उत्तर पाठविले, याचे अंदाज आपण बांधत बसतो. पुन्हा काही कॉमन ग्रुप्स असतील, तर ती व्यक्ती आपल्याला वैयक्तिक उत्तर द्यायचं सोडून तिथे येऊन मजा करून गेली, तिथे काहीतरी लिहून गेली, हेही आपल्या लक्षात येतं! किंवा फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकायला त्या व्यक्तीस वेळ आहे, परंतु माझ्या महत्वाच्या वैयक्तिक मेसेजला उत्तर द्यायला वेळ नाही, असले अनेक अंदाज आपण मनातल्या मनातच बांधायला लागतो. समोरची व्यक्ती आपल्याला किती महत्व देते, ते अशा डिजिटल हालचालींवरून आपण जोखायला लागतो. म्हणजे, जी साधन संपर्क साधण्यासाठी निर्माण झालीत, त्यावरून संपर्क होण्याच्या आधीच मनातल्या मनातच समज गैरसमज तयार व्हायला लागतात!

हेही वाचा >>>आहारवेद: सांधेदुखीसाठी आरामदायी मोहरी

दरम्यान ती व्यक्ती खरेच काही कामात होती, की आपल्याला उत्तर द्यायचे नाही म्हणून असे केले, ते आपल्याला समजलेच पाहिजे, असा हट्ट मनात सुरु होतो. आपल्याला समोरची व्यक्ती किती भाव देतेय त्यावरून आपण ते नाते कसे आणि कितपत जवळ करायचे, याचे आडाखे बांधत बसतो. कधी सहजच फोन करून बघतो. उचलला जातो का? की टाळला जातो? टाळला गेला तर का? परत डोक्यात शंकाच शंका! मेसेज उघडून बघितला आणि तरीही आपल्याला उत्तर नाही, म्हणजे किती ते दुर्लक्ष केले आपल्याकडे! त्यात आपले आणि त्या व्यक्तीचे नाते नेमके कसे आहे, तेही बघावे लागते. समोरची व्यक्ती जुजबी ओळखीची आहे, की ‘ऑफिशिअल’ कामापुरती ‘फॉर्मल’ ओळख आहे? प्रत्यक्ष नात्यात वगैरे आहे की प्रत्यक्ष बघितलेले आहे? अनेक वर्षांची तोंडओळख आहे की घनिष्ठ मैत्री आहे?…

हेही वाचा >>>पॉर्नस्टार मुलगीच का ?

कोणत्याही गटातली व्यक्ती असेल, तरी आपण थोडा धीर धरायला हवाय! मनात शंका येताच लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायची किंवा आपल्याच मनात कुढत बसायची गरज नाही. कदाचित, कोणी ड्राईव्ह करत असताना चुकून मेसेज ओपन झाला असेल, परंतु उत्तर द्यायला ती व्यक्ती फ्री नसेल. घरात कोणी लहान मुलं असतील, तर त्यांनी पालकांच्या मोबाईलमध्ये काहीतरी ‘किडे’ केले असतील, नकळत, बालभावाने, वगैरे. तर, ‘लास्ट सीन आणि तरी आपल्याला उत्तर नाही,’ अशा सगळ्या घटनांमध्ये थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लेखी उत्तर, प्रत्युत्तर करत बसण्यापेक्षा जरा वेळ वाट पाहून प्रत्यक्ष बोलून घेऊनच शंकाकुशंकांच्या मुळाशीच घाव घालणे. म्हणजे, कुठे- कुठे जाऊन आपला मेसेज वाचला का? लास्ट सीनच्या निळ्या टिकमार्क्स दिसल्या तरी उत्तर नाही… असल्या मनातल्या खेळांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. अर्थात हे प्रत्येक वेळी करता येत नाही आणि नेहमीच ते योग्यही ठरणार नाही. व्यक्तीशी घनिष्ट ओळख असेल किंवा जवळची ओळख नसूनही काम खूप महत्त्वाचे असेल, तर थोडा वेळ वाट पाहून फोन करणे योग्य ठरू शकेल. आणखी एक पथ्य आपणदेखील पाळू शकतो. आपल्याकडून उत्तर येण्याची वाट बघत बसलेले लोक असतातच! त्यांनाही उत्तर द्यायला जमत नसेल, तर किमान दोन ओळीत ‘नंतर बोलू,’ असं तरी किमान सांगून ठेवायचं. म्हणजे, त्यांच्याही मनात आपल्याबद्दल तयार होणाऱ्या शंका-कुशंका, टाळलं जाण्याची भावना आटोक्यात राहते. जितकं जमेल तितकं तर हे करूच शकतो.

लोकांच्या डिजिटल वागण्यावरून ते आपल्याला टाळत आहेत की कसं, या विचारांमध्ये किती अडकायचं, हे एकदा ठरवूनच टाका बघू! तुमचं काय मत?…

prachi333@hotmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Communication through whatsapp blue tick and misunderstanding amy

First published on: 28-08-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×