घटस्फोट हा कुणाच्याही आयुष्यामध्ये येऊ शकणारा एक टप्पा असू शकतो. विवाहित दांपत्यामध्ये मतैक्य नसेल, स्वभाव जुळत नसतील किंवा अन्य कोणतीही कारणे असतील तर विसंवादाची सुरूवात होऊ शकते. बहुतांश जोडपी सामाजिक भयास्तव, कौटुंबिक दडपणाखाली येऊन विसंवादी संसार मनाविरूद्ध रेटत राहतात. विसंवादाची झळ आपल्या मुलांना बसू नये, त्याचा त्यांच्या वाढीवर, भविष्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणूनही अशा कौटुंबिक कुरबुरी, भांडणं वगैरे बाबी सहन करत जगण्याला काही जोडपी नाइलाजास्तव तयार होतात. आणखी वाचा : मासिक पाळी… धर्म काय म्हणतो? (भाग १) याचसंदर्भात अलिकडेच वाचनात आलेल्या काही महिलांच्या प्रतिक्रिया आणि एकूणच समाजात येणारे अनुभव प्रातिनिधिक वाटल्याने इथे मांडले आहेत. विवाह हा जुळवून झालेला असो किंवा प्रेमविवाह असो तो फक्त दोन व्यक्तींचा संबंध नसतो; तर दोन व्यक्ती त्यांच्या कुटुंब कबिल्यासह त्यात परस्परांशी जोडल्या जात असतात. त्यामुळे दांपत्याच्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल जाणून घ्यायला, हेच विस्तारित कुटुंब बरेचदा उत्सुक असते. काही वेळा तर अनाहूत सल्ल्यांचाही भडिमार या मंडळींकडून होत असतो. असं असलं तरीही संसार हा मात्र लग्न झालेल्या त्या दोघांचा असतो. त्यात त्यांनी परस्परांना समजून घेणं, सांभाळून घेणं, एकमेकांचा आदर राखणं, वेळ देणं इत्यादी गोष्टी अपेक्षित असतात. विश्वास, प्रेम यांनी हे नातं फुलतं, पुढे जात राहतं. या सगळ्या प्रवासात दोघांची साथ एकसारखी असणं महत्त्वाचं समजलं जातं. हे असं घडलं नाही, विसंवाद, मतभेद वाढत गेले तर हे नातं दीर्घकाळ टिकणं अवघड होतं. अशावेळी प्रयत्न करूनही आहे त्या वस्तुस्थितीत बदल न घडल्यास घटस्फोटाचा मार्ग निवडला जातो. आणखी वाचा : ‘ती’ने मासिक पाळीलाच पत्र लिहिले! ( भाग २ ) दिया वैशंपायन हिचा अनुभव हेच व्यक्त करतो. अगदी दाखवून पाहून ठरवलेल्या लग्नाला वर्ष सव्वा वर्ष होण्यापूर्वीच दियाला आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणीबरोबरच्या नात्याबद्दल अचानक कळलं. तशाही परिस्थितीत बोलून हा प्रश्न आपल्यापरीने सोडवण्याचा दियाने काही काळ प्रयत्नही करून पाहिला. तिला त्यात यश आलं नाही. अखेरीस ती आईवडीलांकडे येऊन रहायला लागली. कालांतराने तिचा घटस्फोट झाला तेव्हा तिच्या नातेवाईकांपासून आजूबाजूचे लोक हळहळलं. तिचं सांत्वन करायला लागले. तिच्याविषयी सहानुभूती दाखवायला लागले. तेव्हा ती म्हणाली, की मला तुमची दया, सहानुभूती नको आहे. तुम्हाला वाईट वाटतंय ते एकवेळ समजू शकते. परंतु जे नातं निभावणं कठीण होतं त्यातून मी बाहेर पडल्यानंतर आता खूप हलकं वाटतंय. स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी मला प्रोत्साहन द्या, माझी ताकद व्हा. आणखी वाचा : विटाळा वाचूनी उत्पत्तीचे स्थान… (भाग ३ रा) परी धायगुडे हिला सासरी काही काळ कौटुंबिक मतभेदांचा सामना करावा लागला. नवरा उच्चशिक्षित असला तरीदेखील त्याचे विचार अत्यंत पारंपारिक पठडीतले असल्याने त्याचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर, कारकीर्दीवर परिणाम झाला. नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे तिला सुस्थितीतली नोकरी सोडावी लागली. साहजिकच, संसाराचा आर्थिक डोलारा सावरणं कठीण झालं. त्याचा राग पुन्हा हिच्यावर निघायला लागला. परोपरीने परीने त्याला आणि घरच्यांना समजावूनही यातून मार्ग न निघाल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तोही मिळेपर्यंत तिला अनेक वाईट अनुभव आले. अशावेळी परी म्हणते, की तिचे आईवडील, मित्रमैत्रिणी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिला त्या काळात त्यांनी सावरलं. तिचा निर्णय योग्य असल्याने तिच्या मनात अपराधीपणाची भावना येऊ दिली नाही. अखेरीस दीड वर्षाच्या न्यायालयीन संघर्षानंतर ती मोकळा श्वास घेऊ शकली. आणखी वाचा : शरीरधर्माचाही सन्मान हवा! (भाग ४ था) श्वेता तिकोने हिची गोष्ट तर आणखीनच वेगळी होती. पाच वर्षांच्या संसारात तिला कधीही आपल्या नवऱ्याविषयी यत्किंचितही शंका, संशय आला नाही. एके दिवशी तिला अचानक कळलं की, तिच्या नवऱ्याचं अफेअर सुरू आहे. तिचा अगोदर विश्वास बसेना. परंतु याची शहानिशा करताना तिला हे अफेअर खूप अगोदरपासून सुरू असल्याचं कळताच मोठा मानसिक धक्का बसला. ती तडक माहेरी निघून आली. आईवडीलांना हे कळलं तर काय होईल, या विचारांनी ती कासावीस झाली. तरीही बाहेरून कळण्यापेक्षा आपण सांगणं केव्हाही चांगलं, असा विचार करून श्वेताने आपल्या आईवडीलांना घडलेली हकिकत सांगितली. जुन्या वळणाच्या तिच्या आईवडीलांनी लेकीला अंतर न देता या फसवणूकीविरूद्ध दाद मागण्यासाठी त्यांनी तिला मानसिक बळ दिलं. या तिघींप्रमाणे आपल्या अवतीभवती अशा अनेकजणींचे असे अनुभव असतील. समाज काय म्हणेल, या भीतीपोटी नको असलेल्या नात्यात कुढत जगण्यापेक्षा यांनी आपापले स्वतंत्र मार्ग निवडून आपला आब राखला. घेतल्या निर्णयावर त्यांना लोकांकडून मिळणाऱ्या दया, सहानुभूतीला स्पष्टपणे नकार दिला. घटस्फोटाच्या निर्णयाच्या दोषारोपांच्या जंजाळात न अडकता व्यक्तीच्या स्वतंत्र जगण्याला, अस्तित्वाला महत्त्व दिलं. कोणत्याही दडपणाखाली, भीतीखाली मन मारून जगण्यापेक्षा त्या नात्यांतून बाहेर पडण्याचं त्यांनी धाडस केलं. घटस्फोटित महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हादेखील अशाप्रकारची तडजोड करण्यासाठी कारणीभूत असतो. विशेषतः घटस्फोटित स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ही आज एकविसाव्या शतकातदेखील तितकीशी निकोप नाही. त्यामुळे अशी स्त्री बहुतांश वेळा बिचारी, एकटी, आधाराची अपेक्षा असणारी, दुबळी समजली जाते. वास्तव नेहमीच तसे असतेच असे नाही. वैवाहिक आयुष्यातील वादळांना तोंड देताना आजही स्त्री शक्यतो संसार टिकवण्याचा प्रयत्न करते. अगदीच गोष्टी विकोपाला गेल्या तरच ती या बंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. आजकाल घटस्फोट घेणाऱ्या स्त्रियांना समाजाची दया, सहानुभूती नको आहे. घटस्फोटिता म्हणून पाहण्यापेक्षा स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलत्या काळानुसार स्वीकारायला हवा, असंही त्यांचं म्हणणं आहे. कारण घटस्फोट हा काही दोष किंवा रोग नाही. त्याबद्दलचे पूर्वग्रह सामाजिक मानसिकतेतून आता पुसले जायला हवेत, असे यांचे स्पष्ट मत आहे.