पूजा सामंत

‘अभिनेत्रीचा सुवर्णकाळ हा वयाची १८ ते २८ वर्षं किंवा फार तर ३५ वर्षांपर्यंत असतो. नंतर त्यांना मैत्रीण, भाभी, बहीणीच्या किंवा चरित्र भूमिका कराव्या लागतात. म्हणूनच अभिनेत्री म्हणून काळानुरूप आपल्यात बदल करणं, सुसंगत राहणं गरजेचं आहे. स्त्रियांनी काळाची पावलं ओळखून स्वतःच्या करिअरबाबत वेगळी वळणं घ्यावीत, स्वतःचा विकास घडवून आणावा…’ हे मत आहे अभिनेत्री रविना टंडन हिचं.

‘स्वतःच्या पायांवर उभं राहणं हे क्रमप्राप्त आहे आणि आजच्या काळात आर्थिक बाबतीत स्वावलंबी होणं हे आपल्या आत्मविश्वासासाठी अत्यंत गरजेचं आहे,’ असंही मत रविनानं मांडलं. नुकत्याच मुंबईत एका कार्यक्रमात भेटलेल्या रविनानं आपल्या कारकीर्दीबद्दल भरभरून गप्पा मारल्या.

आणखी वाचा-मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म ते आज ४१.०७ कोटींच्या कंपनीच्या अध्यक्ष, फोर्ब्सच्या यादीतील सोमा मंडल कोण?

रविना सांगते, “मी माझ्या कारकिर्दीवर संतुष्ट आहे. अलीकडे काही वर्षं चित्रपटसृष्टीत ‘नेपोटिझम’ हा विषय चवीनं चघळला जातो. माझे वडील निर्माता-दिग्दर्शक रवी टंडन असले, तरी त्यांनी मला ‘हिरोईन’ म्हणून ‘लाँच’ केलेलं नाही. संघर्ष आणि मेहनत मला चुकलेली नाही. बालकलाकार म्हणून व नंतरही सुरूवातीच्या काळात मी जाहिरातींत काम केलं. माझा कुणी ‘गॉडफादर’ नव्हता. माझ्या मर्जीप्रमाणे मी चित्रपट केले. माझ्याही करिअरमध्ये चढउतार आलेच. मी लग्नापूर्वी जुहूला राहात असे. असंही माझ्याबरोबर घडलंय, की मी चित्रीकरणाच्या ठिकाणी जायला निघाल्यावर निरोप यायचा, ‘रविना, आपको शूटिंग में आने की जरुरत नहीं। आपकी जगह करिश्माने (कपूर) ली हैं। कधी तिथे मनीषा कोईराला किंवा शिल्पा शेट्टीचं नाव असे! माझा दोष नसतानाही माझ्या बाबतीत अशा ‘रीप्लेसमेंट’ मला विश्वासात न घेता अनेकदा घडल्यात. या अपमानास्पद वागणुकीबद्दल मी कुणाकडे दाद मागणार! त्यामुळे चढउतारांचा स्वीकार करत मी करिअरमध्ये पुढे जात राहिले. ज्या चित्रपटांसाठी मला पुरस्कार मिळेल असं वाटायचं, त्या त्या वेळेस पुरस्कारांनी हुलकावणी दिली. त्यामुळे मी काहीही अपेक्षा ठेवायच्या नाहीत असं ठरवलं. २०२३ मध्ये मला ‘पद्मश्री’ सन्मान मिळाला, तेव्हा मात्र मला आनंद झाला. मी आजवर अनेक व्यावसायिक चित्रपट, ‘अखियों से गोली मारे’, ‘तू चीज बडी हैं मस्त’ अशी अनेक लोकप्रिय गाणी केली, पण अभिनेत्री म्हणून जिथे माझा कस लागेल, असे ‘अक्स’, ‘दमन’, ‘शूल’ असेही चित्रपट केले. ‘दमन’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘ओटीटी’च्या युगात ‘आरण्यक’मध्ये मध्यवर्ती सशक्त भूमिका मिळाली. ३२ वर्षांच्या कारकीर्दीनंतरही आज मी ‘रीलेव्हंट’ आहे, याचा मला आनंद वाटतो.”

आणखी वाचा-१५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी

“आज विवाहित आणि मातृत्व स्वीकारून करिअर करणाऱ्या अभिनेत्रींविषयी खूप बोललं जातं, पण लग्न, मातृत्व आणि करिअर यांचा सुवर्णमध्य शर्मिला टागोर, हेमा मालिनी यांनी त्या काळीच गाठला होता. मीही लग्नांनंतर मुलांच्या जन्मांनंतर मोजके चित्रपट केले. अनेक सामाजिक संस्थांशी मी जोडलेली आहे आणि समाजोपयोगी कामातही व्यग्र असते. यापुढेही मला अभिनेत्री म्हणून मोजक्या भूमिका करायच्या आहेत. लवकरच मी एक नवी वेब मालिका करणार आहे, शिवाय ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचंही चित्रीकरण सुरू आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokwomen.online@gmail.com