‘लग्नासाठी तुम्हाला ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम होऊ घातलाय का घरी?’ हे वाचून खूप ‘ओल्ड फॅशन’ विषय वाटत असेल तर मुलींनो, तसं नाहीये. आपल्या आजूबाजूला, मैत्रिणींमध्ये किंवा इतर शहरांतील नातेवाईक यांच्याकडे लग्नाला अनुरूप मुलगी असेल तर आवर्जून चौकशी करा. लक्षात येईल, की अजूनही मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम खूप जास्त सार्वत्रिक आहे. योग्य स्थळ शोधून झाल्यावर मुलाकडील मंडळींना घरी बोलावून औपचारिक पद्धतीने एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठी पूर्वीपासून हीच पद्धत प्रचलित झालेली आहे. आतापर्यंत याच पद्धतीने लग्नं जुळली आणि ते संसार बऱ्यापैकी यशस्वी झाले. यात मागच्या पिढीला गैर काहीच वाटत नसलं तरी कालानुरूप यात आवश्यक बदल होणे क्रमप्राप्त आहे.

दोन्ही बाजूंची मोठी मंडळी हजर असताना त्यांच्या साक्षीनेच मुलगा-मुलगी भेटतात हे जरी खरं असलं तरी तरुण मुला-मुलींना फार अवघडल्यासारखं होतं हे नक्की. आता काळानुसार बरेच जण त्यात बदल करताना दिसतात. विवाह जुळवणी संस्था किंवा तशा ‘साइट्स’वर नावनोंदणी केल्यावर उपवर मुलगा मुलगी आधी एकमेकांना भेटतात, बोलतात, अनुरूपता तपासतात. मग पुढे जायचं की नाही ते पालकांना कळवतात. यामध्ये खूप वेळ आणि ऊर्जा वाचते.

लीना ही अशीच एक डॉक्टर उपवर मुलगी. क्लिनिकवरून घरी आल्यावर तिची आई म्हणाली, “आला गं मुलाकडचा निरोप. उद्या संध्याकाळी ६ वाजेपर्यत येतो म्हणालेत. तुझ्या डॉक्टर सरांना सांगून ठेव बाई, तुला सुट्टी घ्यावी लागेल.”

“मला हा असा दाखवून घेण्याचा कार्यक्रम अपमानास्पद वाटतो गं. नको वाटतं हे सगळं.”

“पण तुला चहाचा ट्रे घेऊन समोर नाही जायचंय! मी आणेन चहा. मग तर झालं?”

“कुठे बाहेर भेटलो तर? ते लोकही येतील आणि आपणही जाऊ. थोडं फ्री वाटेल गं.”

“त्यांना आपलं घर बघायचं आहे. येऊ देत ना, यात अपमान वाटण्यासारखं काय आहे?”

“आधी एकमेकांना पसंत पडतो का ते तर बघू दे! मग घरबिर बघा म्हणावं. आम्ही तुमच्या घरी येतो म्हण मुलगा बघायला आणि तू काळेकाकूंना काय म्हणालीस की, आज आमच्या लीनाचा दाखवण्याचा कार्यक्रम आहे. शी आई. कसं वाटतं ते? डॉक्टर आहे मी. रोज किती तरी पेशंट बघते, निर्णय घेते, त्यांचे उपचार करते आणि हे असं दाखवून काय घ्यायचं?”

“तू तुझ्या पसंतीनं मुलगा ठरवला असता तर कदाचित ही वेळ नसती आली. आता जी आपली पारंपरिक पद्धत आहे, ती आहे. ती मंडळी जुन्या विचारांची आहेत. त्यांना नाही आवडणार तू मुलाला आधीच बाहेर भेटलेलं.” आई म्हणाली आणि लीनाच्या कपाळावर आठी आली. तिच्या मनात आलं, मी एक डॉक्टर म्हणून अनेक पुरुष रुग्णदेखील तपासते. ते चालतं तर होणारा संभावित जोडीदार कसा आहे हे तपासायला भेटलो तर त्यात काय वाईट? तिनं आईला न जुमानता संपर्क क्रमांक घेऊन सरळ त्या मुलाला फोन केला. त्या मुलाला तिची भावना सांगितली. “तू प्लीज गैरसमज न करून घेता घरच्यांना समजावून सांग. आपण आधी भेटू, बोलू. योग्य वाटलं तर मग तुम्ही जरूर आमच्याकडे या, स्वागतच आहे; पण जर आपण एकमेकांना अजिबातच अनुरूप नाही वाटलो तर मोठ्यांचा वेळ का वाया घालवायचा? नकार देणं आणि तो स्वीकारणं त्यांच्या वाट्याला कशाला येऊ द्यायचं? बघ, तुला पटतंय का. प्लीज विचार कर.”

त्या मुलाला तिचा हा मोकळेपणा भावला. त्यानं घरी बोलून तिला बाहेर भेटण्याचं कबूल केलं. घरचे किंचित नाराज झाले, पण पुढे सगळं छान जुळून आलं. मुलाकडचे सगळे तिच्या घरी आले, पण मुलीची संमती असल्यानं वातावरण एकदम निवांत मोकळं होतं. प्रश्न-उत्तरांचा अवघड तास टाळून मोकळ्या गप्पा झाल्या. हे असं तिला आणि त्यालाही अपेक्षित होतं. लीनाच्या धीट पुढाकाराने आणि मुलाच्या साथीने तिचा हा प्रसंग छान निभावला गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्न हा एकतर्फी कारभार नसतो. त्यात वर आणि वधूकडील दोन्हीही मंडळींचा तितकाच सहभाग असणं अपेक्षित आहे. मुलीदेखील मुलांच्या बरोबरीने शिकतात आणि कमावतात. अशा वेळी तिच्या मनाविरुद्धच्या गोष्टी केवळ परंपरेच्या नावाखाली करणं योग्य नाहीच. लग्नाआधीच जर मुलीचा आत्मसन्मान राखला गेला तर लग्नानंतरही तो टिकायची शक्यता जास्त असते.