सोनाली या आयपीएसच्या १९९३ च्या बॅचच्या मध्य प्रदेशच्या कॅडर आहेत. सध्या त्या मध्य प्रदेश पोलीसच्या अतिरिक्त महासंचालकपदी (निवड) कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सोनाली यांनी मध्य प्रदेशच्या रायसेनच्या पोलीस अधीक्षक, जबलपूरचे पोलीस उपमहासंचालक (DIG) आणि मध्य प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक या पदांवर काम केले आहे. २०२१ मध्ये त्यांची सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) काश्मीर खोऱ्यातील पोलीस महानिरीक्षक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली

भारतीय पोलीस दलामध्ये महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ही आता नवीन बाब राहिलेली नाही. याच श्रेणीमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे ते आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांचे. त्यांची आरपीएफच्या (रेल्वे पोलीस दल) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुकत होणाऱ्या सोनाली या पहिला महिला अधिकारी आहेत. सोनाली मिश्रा हे नाव महिला आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये आदराने घेतले जाते. आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. आता आरपीएफच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तडफदार पोलीस अधिकारी म्हणून सोनाली मिश्रा यांची ओळख आहे. कॅबिनेटच्या समितीने सोनाली यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. आरपीएफचे सध्याचे संचालक मनोज वर्मा ३१ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्या या पदावर असतील. त्यांच्यावर रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे.

सोनाली या आयपीएसच्या १९९३ च्या बॅचच्या मध्य प्रदेशच्या कॅडर आहेत. सध्या त्या मध्य प्रदेश पोलीसच्या अतिरिक्त महासंचालकपदी (निवड) कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सोनाली यांनी मध्य प्रदेशच्या रायसेनच्या पोलीस अधीक्षक, जबलपूरचे पोलीस उपमहासंचालक (DIG) आणि मध्य प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या गुप्तचर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक या पदांवर काम केले आहे. २०२१ मध्ये त्यांची सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) काश्मीर खोऱ्यातील पोलीस महानिरीक्षक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली. पंजाब फ्रंटियरची कमान सांभाळत असताना त्यांनी ५५३ किमी लांबीच्या भारत-पाक अटारी सीमेची देखरेख करण्याचे कामही केले आहे. तसेच सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर विभागाचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. या पदावर नियुक्त झालेल्याही त्या पहिला महिला पोलीस अधिकारी होत्या. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (PPMDS) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पोलीस पदकही मिळाले आहे.

सोनाली मिश्रांची ओळख अत्यंत निडर पोलीस अधिकारी म्हणून आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राज्यस्तरीय महिला सशक्तीकरणावर महापरिषद झाली होती. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकरांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सोनाली मिश्रा यांच्यावर सोपवण्यात आली होती. ‘ही जबाबदारी म्हणजे आपल्या कामाची पावती आहे,’ अशी प्रतिक्रिया सोनाली यांनी त्यावेळेस दिली होती.

रेल्वे सुरक्षा दलाच्या संचालकपदी नियुक्ती होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर सोनाली मिश्रा यांच्यासमोर अनेक आव्हानेही आहेत. रेल्वे ट्रॅकचे संरक्षण करणे हे मुख्य आव्हान त्यांच्यासमोर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रॅकवर सिलेंडर किंवा लोखंडाचे रॉड्स ठेवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रेन्सची सुरक्षितताही धोक्यात आली होती. वंदे भारतसह अन्य ट्रेन्सवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. रेल्वेगाड्यांचे संरक्षण हेही मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर रेल्वेगाड्यांमधून होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी ही अन्य पदांपेक्षा थोडी वेगळी आहे. आरपीएणची स्थापना १९५७ मध्ये एका अधिनियमाद्वारे करण्यात आली. रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती आहे, तिचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आरपीएफची स्थापना झाली होती. त्यानंतर १९६६ मध्ये आरपीएफला रेल्वेसंबंधी गुन्ह्यांमध्ये त्यांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करण्याचे, अटक करण्याचे आणि खटला चालवण्याचेही अधिकार देण्यात आले. २० सप्टेंबर १९८५ रोजी आरपीएफला ‘देशाचे एक सशस्त्र दल’ असा दर्जा देण्यात आला. आजही आपल्याकडे सर्वसामान्यांच्या प्रवासाचे मुख्य माध्यम रेल्वे हेच आहे. देशातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता सोनाली मिश्रा यांच्यासारख्या निडर आणि धडाकेबाज अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ही महिला सक्षमीकरणाचा आणि महिलांचा सशस्त्र दलातील वाढत्या आणि सक्रिय सहभागाचे प्रतिक मानावे लागेल.