भारतातील एक अग्रगण्य कंपनी HUL मध्ये नुकतीच एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. HUL च्या सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रिया नायर यांची निवड करण्यात आली आहे. प्रिया नायर यांच्या रुपाने कंपनीला ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मिळाल्या आहेत. बुद्धीमत्ता, प्रचंड मेहनत, जिद्द, कामाप्रति निष्ठा आणि नेतृत्वगुणांमुळे प्रिया नायर या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे प्रिया नायर यांचे करियर याच कंपनीत सुरू झाले. १९९५ साली त्या ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) म्हणून रुजू झाल्या होत्या. त्याच कंपनीची कमान आता त्या सांभाळणार आहेत. पुढील पाच वर्षे त्या कंपनीच्या एमडी आणि सीईओ म्हणून काम पाहतील. सध्या त्या युनिलीव्हरच्या ब्युटी अँड वेल बीईंग विभागाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
प्रिया नायर यांची निवड कॉर्पोरेट जगतातील महिलांचा वाढता सक्रिय सहभाग आणि अधिकारपदाचे प्रतिक आहे. हिंदुस्थान युनिलीव्हर लिमिटेड (एचयूएल) ही गेली अनेक वर्षे FMCG (जलदगतीने विक्री होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. सध्याचे एमडी आणि सीईओ रोहित जावा ३१ जुलै २०२५ पर्यंत कार्यरत आहेत. मार्केटमधील अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी कंपनीची चांगली प्रगती केली. त्यांच्यानंतर आता प्रिया नायर कंपनीचा ५९ हजार कोटींचा कारभार सांभाळणार आहेत. त्याचबरोबर त्या Unilever Executive (ULE) च्या सदस्यही असतील. HUL च्या इतिहासातील हा एक महत्वाचा बदल मानला जात आहे. HUL ची २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील उलाढाल ६०, ६८० कोटी रुपयांची होती. HUL कडे सध्या ५० पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत. या ब्रँड्सची उत्पादने भारतातील जवळपास सगळ्या घरांमध्ये रोज वापरली जातात. यामध्ये लक्स, लाईफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील. पॉन्ड्स, व्हॅसलीन, लॅक्मे, डव्ह, क्लिनिक प्लस, ब्रुक बाँड, हॉर्लिक्स, किसान यांचा समावेश आहे.
प्रिया नायर यांची कारकीर्द
प्रिया नायर यांची कारकीर्द ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून सुरू झाली. त्यांनी सेल्स आणि मार्केटिंगशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २०१४ ते २०२० पर्यंत त्या होम केअर विभागाच्या कार्यकारी संचालक होत्या. २०२० ते २०२२ पर्यंत त्यांनी ब्युटी आणि पर्सनल केअर विभागाच्या कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्या युनिलीव्हरमध्ये चीफ मार्केटिंग ऑफिसर झाल्या आणि २०२३ पासून त्या ब्युटी आणि वेलबिईंग विभागाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. प्रिया नायर यांचे महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. त्यांचा जन्म कोल्हापुरात झाला तर बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले आहे.
मूळच्या मल्याळी असलेल्या प्रिया नायर यांनी सिडनेहॅम कॉलेजमधून अकाऊंट्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बी.कॉमची पदवी घेतली. त्यानंतर पुण्याच्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए केले. त्यानंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस संदर्भातील पुढील शिक्षण घेतले. गेली ३० वर्षांपेक्षाही जास्त काळ प्रिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांनी डव्ह, सनसिल्क, रिन आणि व्हॅसलिन अशा लोकप्रिय ब्रँड्सचे नेतृत्व केले आहे. १९९८ मध्ये त्या डव्ह, रिन आणि कम्फर्ट या उत्पादनांच्या ब्रँड मॅनेजर होत्या. त्याशिवाय लाँड्री विभागाच्या मॅनेजर, डिटर्जंट विभागाच्या उपाध्यक्ष, होम केअरच्या दक्षिण आशियाई विभागाच्या कार्यकारी संचालक या पदांवरही काम केले आहे. अत्यंत तीव्र बुध्दीमत्ता असलेल्या प्रिया नायर त्यांच्या नेतृत्व गुणांसाठी ओळखल्या जातात. कामाप्रति निष्ठा, धाडसी निर्णय घेण्याचा स्वभाव यामुळे त्यांनी हा टप्पा गाठला आहे. त्या विवाहित असून सध्या त्यांचे वास्तव्य लंडनमध्ये आहेत. त्यांना एक मुलगी आहे.
“प्रिया यांची HUL आणि युनिलिव्हर या कंपनीतील आतापर्यंतची कामगिरी चमकदार आहे. भारतीय मार्केटबद्दल त्यांना अचूक जाण आहे. ही समज आणि त्यांचा अनुभव यांच्या मदतीने प्रिया HUL कंपनीला आणखी व्यापक स्तरावर घेऊन जाईल.” अशी कौतास्पद प्रतिक्रिया HUL चे अध्यक्ष नितीन परांजपे यांनी दिली आहे. प्रिया नायर या कॉर्पोरेट क्षेत्रातील सध्याच्या आधुनिक महिलेचे प्रतिक आहेत यात शंका नाही. पण त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय उद्योग जगतातील प्रभावशाली महिला म्हणून त्यांची ओळख आहे.