निमा पाटील

सध्या सुरू असलेले इस्रायल-हमास युद्ध असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध; किंवा काही महिन्यांपूर्वी सुदानमध्ये लष्कर व निमलष्कर अशा दोन सशस्त्र गटांमध्ये झालेला अंतर्गत संघर्ष असो; किंवा पाकिस्तानात आश्रयासाठी आलेल्या आणि आता देश सोडून जाण्याचे आदेश मिळालेल्या अफगाण निर्वासितांची अवस्था असो, युद्ध आणि अंतर्गत सशस्त्र संघर्षामध्ये सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात परवड होते.

या लोकांना युद्ध करण्याचा किंवा ते थांबवण्याचा कोणताही अधिकार नसतो, किंवा त्यांच्याकडून तो अधिकार हिरावून घेतलेला असतो, त्यांना युद्धासंबंधीच्या निर्णयप्रक्रियेत दुरूनही स्थान नसते, अशा या सामान्य लोकांनाच युद्धांचा सर्वाधिक फटका बसतो. मृत्यू, अपंगत्व, मालमत्तेचे नुकसान, आर्थिक झळ अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त स्त्रियांना खास ‘बायकांच्या वाट्याला येणारे’ भोग सहन करावे लागतात. युद्धस्थितीत, त्यातल्या त्यात समर्थ देशातील किंवा गटातील स्त्रिया तुलनेने सुरक्षित असतात आणि दुर्बल देश किंवा गटातील स्त्रियांचे अतोनात हाल होतात हे सामान्य निरीक्षण आहे.

आणखी वाचा-चॉइस तर आपलाच: पन्नाशीनंतरच्या फ्रस्टेशनमध्ये अडकला आहात?

संयुक्त राष्ट्रांपासून जगभरातील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांपर्यंत अनेक संस्थांनी ‘युद्धाचा स्त्रियांवर होणारा परिणाम’ यावर संशोधन केले आहे. या संशोधनाचा सारांश असा की, ‘युद्ध आणि सशस्त्र संघर्षांमध्ये लिंगाधारित हिंसा, म्हणजेच ‘जेंडर-बेस्ड व्हायोलन्स’ (जीबीव्ही), विस्थापन, वैधव्य, गरोदरपण व बाळंतपण यासाठी पुरेशा आरोग्य सेवांचा अभाव, शिक्षण खंडित होणे आणि बालविवाह’ अशा विविध प्रकारे महिला व मुलींवर युद्धाचा परिणाम होतो. त्याबरोबरच युद्धामुळे होणाऱ्या स्थलांतरांमध्ये महिला व मुले यांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असते.

यापैकी कोणतेही एक संकट स्त्रियांच्या प्रगतीमध्ये खीळ घालण्यासाठी पुरेसे असते. युद्धामध्ये यातील एकापेक्षा जास्त संकटे एकाच वेळी येण्याची शक्यता असते. लिंगाधारित हिंसेमध्ये (जीबीव्ही) बलात्कार, विनयभंग, मारहाण, शाब्दिक छळ यांचा समावेश होतो. शिक्षण थांबणे किंवा बालविवाह यामुळे पुढील प्रगती कायमची थांबते आणि एक निम्न दर्जाचे आयुष्य जगावे लागते.

आणखी वाचा-नातेसंबंध: नवऱ्याची एक्स अजूनही फोन करते?

युद्धामध्ये स्त्रियांची सुरक्षितता आणि मानवाधिकारांचे पालन या बाबींना सर्वात कमी प्राधान्य दिले जाते. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या महिलांना लैंगिक हिंसा, शारिरीक छळ सहन करावा लागतो. त्याशिवाय शत्रूकडून त्यांचा युद्धामधील किंवा तडजोडीची बोलणी करताना हत्यार म्हणूनही वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या अधिक असुरक्षित असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युद्धकाळात ही सर्व संकटे झेलणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांवर भरपूर संशोधन झाले आहे, उपाययोजना सुचवल्या गेल्या आहेत, संयुक्त राष्ट्रांकडून काही उपक्रमही राबवले जातात. तरीही युद्ध थांबत नाहीत आणि स्त्रियांसमोरील संकटे कमी होत नाहीत.