आसाममधील होजाई जिल्ह्याच्या अजरबारी गावातील रहिवासी असलेल्या संथाल समुदायातील मार्टिना टुडु या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या आहेत. संथाल लोक हे भारतातील आदिवासी समुदायांपैकी एक आहेत. या समाजाला एक ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा आहे. हा समुदाय मुख्यत: पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, बिहार, उडिसा आणि पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात आहे. हा समुदाय त्यांच्या संगीत, नृत्य, उत्साही परंपरेसाठी ओळखला जातो. या समुदायाची निसर्गाप्रती प्रेमाची तीव्र भावना आहे. त्यांची संथाल संस्कृती ही परंपरा आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे- ज्यात संथाल समुदाय, सामाजिक जबाबदारी, आणि निसर्गप्रेम, पर्यावरण रक्षण यावर भर दिला जातो.
तरीही हा समाज आजवर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब, उपेक्षित आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आढळतो. खासकरून महिला. या समुदायातील महिलांनी मोठी स्वप्ने पाहणे दुरापस्तच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे शक्यच नसे. पण याही परिस्थितीत आपल्या बुद्धीकौशल्याने, दृढनिश्चयाने मार्टिना टुडु या संथाल यांनी समुदायातील पहिल्या वाहिल्या डॉक्टर बनण्याचा मान मिळवला आहे. ज्या गावात जन्म झाला त्या गावातील लोक आज मार्टिना यांच्या डॉक्टर बनण्याने कमालीचे खुश आहेत. कारण त्यांच्या मते, ‘डॉक्टर’ ही केवळ एक पदवी नसून गावासमोर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
मार्टिना टुडु यांचा डॉक्टर बनण्याचा प्रवास हा संथाल समुदायातील आणि आदिवासी समाजातील लाखो लोकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. ग्रामीण मागास भागातून असलेल्या टुडु यांना इथपर्यंत पोचण्यासाठी असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यांचा निर्धार जराही डळमळला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या टुडु यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर तेजपूर मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. आपल्या परिस्थितीची जाण ठेवून आणि आपल्या गावासाठी तसेच समुदायासाठी काहीतरी वेगळे करण्याच्या तीव्र इच्छेने टुडु झपाटल्या होत्या. त्यांनी दिवसरात्र स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतलं. यावेळी त्यांना थकवा, आर्थिक ताण या गोष्टींचा देखील सामना करावा लागला. महाविद्यालयाची फी भरणे, घरची जबाबदारी या सगळ्या संकटांचा संयमाने सामना करत राहिल्या. आई-वडील आणि समजुतदार, सहकार्य करणारे शिक्षक यांच्या पाठिंब्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला.
आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यादेखील संथाल समुदायातील आहेत. आता पुन्हा एकदा मार्टिना टुडु यांच्या डॉक्टर बनण्याने संथाल समुदायातील महिलांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. संथाल समुदायात एका नवीन युगाची नवीन पर्वाची सुरुवात आहे असेदेखील आता म्हटले जात आहे. बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य बीटीआर प्रमुख प्रमोद बोरो आणि आसामचे राज्य शिक्षण मंत्री रानोज पेगु यांनीदेखील मार्टिना यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आता डॉक्टर झाल्यावर मार्टिना यांनी इतरांसारखे फक्त शासकीय इस्पितळात नोकरी करणे हा पर्यया न निवडता गावातील आणि आसपास भागातील आरोग्यसेवा सुधारण्याची योजना आखण्याचा पण केला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांचा लाभ जनसामान्यांना मिळावा यासाठी त्या जनजागृती करत आहेत. ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजाला समृद्ध करणे हाच त्यांचा ध्यास आहे.
मार्टिना टुडु म्हणतात की, ‘‘शिक्षणामध्येच आमचे जीवन, समुदाय आणि समाज बदलण्याची शक्ती आहे. शिक्षणाने आपले ज्ञान, कौशल्य अधिकाधिक विकसित होत जाते. आपला आत्मविश्वास समृद्ध, दृढ होत जातो. शिक्षणामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यास आणि स्वत:चे भविष्य उज्वल करण्यास आपण सक्षम होतो. माझे डॉक्टर होणे हे आमच्या समुदायातील असंख्य तरुण मुला- मुलींना, वैद्यकीय तसेच इतर क्षेत्रात आपले करिअर घडवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या मार्गातील अडचणी आणि आव्हानात्मक गोष्टींना, संकटांवर जे मात करतील तिथे तुम्हाल यश नक्कीच मिळेल.
rohit.patil@expressindia.com