लेखिका-अभिनेत्री मुग्धा गोडबोले

गेली २५ वर्ष अभिनय आणि लेखन या दोन्ही क्षेत्रांत मी काम करत असल्याने, दोन्ही क्षेत्रांतल्या मेन्टॉर्स विषयी बोलावसं वाटतंय मला! कारण अनेक गैरसमज असलेल्या या क्षेत्रांत, त्या त्या माणसांचे त्या त्या काळांतले अनुभव खरंच चांगले होते. म्हणूनच आमच्यासारखी अनेक नवोदित माणसं या नव्या क्षेत्रांत पाय रोवण्याची हिंमत करू शकली.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

माझा तर मुंबईशी कसलाही संबंध नव्हता आणि माझ्या सात पिढ्यांमध्ये कोणीही कधीही स्टेजवर उभं राहिलेलं नव्हतं. अशा स्थितीत ‘आभाळमाया’ या तेव्हाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत सुकन्या कुलकर्णी हिच्या मुलीची भूमिका करण्यासाठी मी पुण्याहून मुंबईला आले. पुढे अडीच वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्या संपूर्ण काळांत सुकन्याताईने माझं जणू आईपणच निभावलं. तिला ठाऊक होतं मी एकटी राहते. माझी खाण्यापिण्याची थोडी आबाळच होते. म्हणून ती रोज तिच्यासाठी जे जेवण आणायची ते मलाही जमेस धरून आणलेलं असे. पुन्हा त्यावर जाहीर चर्चा नाही, की आपसात कुजबूजसुद्धा नाही. मी तिच्या लेकीला जुलियाला नेहमी म्हणते, की मी आधी आलेय. तू नंतर आलीस. बऱ्याचदा वेळा मी ‘आभाळमाया’चं शूटिंग आटपून ‘भूमिका’ मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्याला जायची. सुकन्याताई रात्रीच्या वेळी न चुकता मला स्टेशनवर किंवा बस स्टॉपवर सोडून घरी जायची. रात्रीच्या वेळी तिने मला कधीच एकटीला जाऊ दिलं नाही.

मी तिच्याकडून कॅमेरा समोरचा अभिनय जितका शिकले तितकंच तिचं वागणंही माझ्यात झिरपलंय. सेटवर आल्यावर ती कधीही असं म्हणत नाही, की ‘आज माझे किती सिन्स आहेत? चला आटपा लवकर. मला उशीर होतोय.’ तिचं म्हणणं असतं, की आपल्याला हे काम करायचंय. तर मग ते आनंदाने करावं. मी‌, ही व्यावसायिकता तिच्याकडून उचलली. कारण मला हे नेहमी जाणवतं, की जी मुख्य व्यक्ती असते, त्या सेटवरची किंवा कलाकारांच्या संचातली. ती जर कुरकुरी, कटकटी, भांडकुदळ असेल, प्रेमाने काम करणारी नसेल, तर ते सगळ्यांवर पसरत जातं. सुकन्याताई सेटवरच्या सगळ्यांशी खूप चांगली वागते. ती खरोखर ‘जगन्माता’ आहे. म्हणजे ती जर बाजारात गेली आणि तिला एखादा छान ‘वस्त्र’ दिसलं, तर ती लगेच ते विकत घेऊन आमच्या मेकअपदादाला देणार आणि सांगणार, “अहो तुमची देवाची मूर्ती या वस्त्रावर ठेवा बरं का!”

सुकन्याताईंची मला जाणवलेली आणखी एक गोष्ट! ती माझ्यासारख्या तरुण मुलीबरोबर काम करताना आमची स्पेस आम्हाला व्यवस्थित द्यायची. ती मला नेहमी सांगायची,“मुग्धा हा तुझा सीन आहे. यात मी काही करणं अपेक्षित नाही.” असं सहसा अनुभवायला येत नाही. पण ती हे करू शकते. कारण तिचा स्वतःच्या अभिनय क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. एखाद्या सीनमध्ये आपण जेव्हा उभे राहतो, तेव्हा केवळ मेकअप किंवा पाठांतरच नव्हे, तर आपली शारीरिक, मानसिक अवस्था, तसंच त्या सीनमध्ये एकीकडे मनाने पूर्ण गुंतणं आणि त्याचवेळी भान न हरवू देता अभिनय करणं हे तंत्र केवळ सुकन्याताईंमुळे मी शिकले. ‘आभाळमाया’त एक सीन होता, अत्यंत संवेदनशील! माझ्या अभिनयाचा कस लागेल असा! तो आम्ही दिवसभर शूट करत होतो. शेवटी दुपारी ती मला म्हणाली, “मुग्धा तू प्रत्येक छोट्या छोट्या शॉटमध्ये ढसाढसा रडतेस, त्याची एवढी गरज नाही. अशाने दिवसाच्या शेवटी नटी म्हणून संपशील तू! त्यापेक्षा कॅमेऱ्याचा अँगल काय आहे, तू त्यांत किती दिसणार आहेस त्याचा विचार कर.” अशा काही तांत्रिक गोष्टी तिने मला थेट सांगितल्या. तर कॅमेरा समोरचा अभिनय मी तिच्या कामातून शिकले. आज तिला कदाचित हे ठाऊकही नसेल, की माझ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यावर तिचा किती प्रचंड प्रभाव आहे ते!

आता लेखिका मुग्धा गोडबोलेच्या बाबतीत बोलायचं, तर मला दोन नावं आवर्जून सांगावीशी वाटतात. पहिल्या प्रतिमा कुलकर्णी! दोन-तीन मालिकांमध्ये त्यांनी लिहिलेल्या संवादांवर मी अभिनय करत होते. तो करताना मला नेहमी जाणवायचं की प्रतिमा ताईंचे संवाद इतरांपेक्षा वेगळे असतात. ते खूप सोपे, पण थेट असतात. त्या संवादांतून त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते प्रेक्षकांना नक्की कळतं. त्यांच्या संवादाला नाद असतो. ताल असतो. तो जर आपण बिघडवला तर संवादाची गंमत जाते. माझ्या संवाद लेखनावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे.

इतका की एखादा सीन लिहिताना माझ्या डोक्यात एक विचार नेहमीच येतो की हा सीन प्रतिमाताईंनी कसा बरं लिहिला असता? त्यांच्या लिखाणात एक बारीकसा ‘surprising element’असतोच! तेव्हा मला पटकन वाटतं, हे नसतं बरं का मला सुचलं! त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये एक्सप्रेशन्स असतात. त्यामुळे त्यांच्या संवादावर अभिनय करणं कलाकाराला सोपं जातं. एक उदाहरण सांगते. त्यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ‘अंकुर’ ही मालिका! त्यात दोन मैत्रिणी गप्पा मारत असतात. त्यातली मी माझ्या मैत्रिणीला विचारते,“तू एका विवाहित माणसाच्या प्रेमात कशी पडलीस?” त्यावरचं उत्तर प्रतिमाताईंनी इतक्या सोप्या भाषेत लिहिलं होतं, की ते वाक्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. ती मुलगी एवढंच म्हणते,“काय सांगू? एका मर्यादेनंतर ‘तो’ सोडून कोणाच्याही बरोबर मला कंटाळाच यायला लागला.” जड जड भावनांनी ओथंबलेले शब्द नाहीत. मेलोड्रामा नाही. फक्त dark reality! अवघ्या अडीच वाक्यांत प्रतिमाताईनी हे स्पष्टपणे सांगितलं की “तो” सोडला तर इतर कोणाही बरोबर रहायला मला आवडतच नाही. रॉकेट सायन्स नाही. पण वाक्यातलं असं टोकदार, थेट पण आशयघन एक्सप्रेशन तोवर मी कुठेही वाचलं नव्हतं की ऐकलं नव्हतं.

आणखी एक प्रसंग. एक बॉस मुलाखतीसाठी आलेल्या मुलीला विचारतो, “what makes you think you are superior?”त्या मुलीचं थेट उत्तर “I don’t think. I know” सगळा मिळून अवघा दीड मिनिटाचा सीन. पण किती खोल, प्रभावी करून टाकला प्रतिमाताईंनी!

लिखाणातील मेंटॉरिंग म्हणताना मला गिरीश जोशीबद्दल सांगायला नक्कीच आवडेल.‍ मी त्याने लिहिलेल्या ‘भूमिका’ या मालिकेत काम करत होते. त्याच्यासोबत ‘पटकथा’ दीर्घांकातही मी काम केलं होतं. त्याचे अमेरिकेंतसुद्धा आम्ही प्रयोग केले. एक-दोन प्रकल्पांमध्ये मी त्याची मदतनीसही होते. या सगळ्या काळांत मला एक अत्यंत गंमतीदार गोष्ट जाणवली. ती म्हणजे गिरीशला माणसाच्या मनाचा तळ गाठता येतो. लेखनातून प्रत्येक भावनेचे पदर त्याला इतक्या सुंदर पद्धतीने उलगडता येतात की ते वाचून मी अचंबित होते. मला नेहमीच कुतूहल वाटतं, की हे इतकं तरल पण टोकदार लिहिणं त्याला कसं सुचत असेल? अनेक नटांची सवय असते की लेखकाने लिहिलेल्या वाक्यांतल्या आशयाची गोळाबेरीज करून स्वतःचे डायलॉग्ज म्हणायचे. पण गिरीशच्या लिखाणातल्या शब्दांची मोडतोडच काय, साधी अदलाबदल केली तरी त्या वाक्याच्या परिणामकारकतेत फरक पडतो. इतकं त्याचं लिखाण बांधेसूद आहे. कारण गिरीश, लेखन हे अत्यंत गांभीर्याने घेणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या संहितेतील प्रत्येक वाक्य जसच्या तसं घ्यावं याबाबत तो कमालीचा आग्रही असतो. दिग्दर्शक म्हणून काम करतानाही त्याची लेखकाविषयी हीच भावना असते. गिरीश बरोबर काम केल्यामुळे माझ्या हे लक्षांत आलंय की आपणही असंच अचूक लिहिलं पाहिजे की नटाला आपली वाक्य बदलण्याची इच्छाच होऊ नये!

गिरीश एखाद्या प्रोजेक्टवर दोन ते तीन वर्षे शांतपणे काम करणारा माणूस आहे. त्यामुळे इच्छा असूनही एकत्र काम करणं आम्हाला शक्य नाही झालं. तरी आम्ही नवं काहीही लिहिलं की एकमेकांना वाचायला देतो. मला बरं वाटतं की त्याचा माझ्या लिखाणाच्या समजशक्तीवर विश्वास आहे. माझ्या लिखाणावर तो चांगल्या सूचना करतो. आमच्यात अशी वैचारिक देवाण-घेवाण चालते. गिरीश लिखाणाकडे ‘तंत्र’ या दृष्टीने पाहतो हे मला फार आवडतं. ललित लिखाणात आपण मनांत आलेले विचार व भावना कागदावर थेट उतरवतो. हे तुलनेने सोपे आहे. पण तेच लिखाण एखाद्या सीनच्या चौकटीत बसवायची वेळ येते, तेव्हा त्याचं तंत्र पूर्ण बदलतं. ते तंत्र अवगत करूनच लिहावं यासाठी तो फार आग्रही असतो. मला गिरीशच्या लिखाणातल्या या सर्व गोष्टींचा फायदा ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या संवाद लेखनात खूप होतोय. शूटिंग दरम्यान आमचे दिग्दर्शक रवी करमरकर सर जेव्हा, “लेखिकेने जे संवाद लिहिलेत ते जसेच्या तसे बोला”, असा आग्रह धरतात असं मला कळतं, तेव्हा आपण जे लिखाणाचे संस्कार गिरीश व प्रतिमाताईंकडून शिकलोय, त्याचा कोणीतरी आदर करतय हे पाहून खूप आनंद वाटतो. अर्थात मी अभिनेत्री असल्यामुळे मला सीन्स डोळ्यांसमोर आणून लिहिणं सोपं पडतं हेही तितकंच खरं आहे!

अर्थात तंत्र कौशल्य बाजूला ठेवलं तरी मुळांत पुण्यात, तेही गोडबोलेंच्या घरात जन्माला आल्यामुळे भाषेचे आणि वाचनाचेही चांगले संस्कार झालेत माझ्यावर! ते लिखाणाला पोषक असतात. तरीही सुरुवातीला अनेक वर्ष लिखाण हा आपला प्रांतच नाही हा माझा ठाम समज होता. कारण मंगला गोडबोले या माझ्या लेखिका आईसारखा माझा व्यासंग नाही. तिच्या इतकी प्रगल्भता आणि शहाणपण माझ्या लिखाणात यायला हवं असं मला नेहमीच वाटतं. कदाचित म्हणूनच माझ्या लिखाणाकडे मी खूप वस्तुनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे, त्रयस्थाच्या नजरेतून पाहू शकते. त्याचं मूल्यमापन परखडपणे करू शकते.

माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com