scorecardresearch

विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’

लग्नाच्या पहिल्या रात्री लीनाचा नवरा सौरभ ‘क्रॉस ड्रेसिंग’ अर्थात तिचा वनपीस घालून आणि लिपस्टिक लावून आला तेव्हा ती धसकलीच. बँकेत दिवसभर अधिकारी पदावर काम करणारा सौरभ, रात्री वेगळ्याच अवतारात तिच्या समोर येत होता. काय आहे हे ‘क्रॉस ड्रेसिंग’? असं वागणं शारीरिक आहे की मानसिक? यातून बाहेर पडता येतं का? लीना सौरभला सुखाने संसार करता येईल का?

विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’
“ अगं, तो क्रॉस ड्रेसर आहे.”- हे वाक्य ऐकूनच ती हैराण झाली… (प्रातिनिधिक छायाचित्र)

“लीना, ३१ डिसेंबरसाठी सर्व जण गोव्याला जायचं ठरवत आहेत, तू आणि सौरभ येणार आहात ना?”
“नाही गं, यावेळेस जमेल असं वाटत नाही.”
“अगं काय हे, सगळे जण जात आहेत. तूच का नाही म्हणतेस? लीना, लग्न झाल्यावर तू बदललीस, एरव्ही सगळ्यात पुढाकार घेणारी तू. आता सर्वांत मिसळायलाच नको म्हणतेस, असं झालंय तरी काय?”
“वनिता, मला काहीही झालेलं नाही, पण मला यायला जमणार नाही, तुम्ही सगळे जण जा आणि एन्जॉय करा.”
“लीना, अगं तुझ्या लग्नाला सहा महिने झालेत, काही गुड न्यूज आहे का?”
“ वनिता, बास ना आता. मी येणार नाही म्हटलं ना, आता जास्त काही विचारू नकोस.”

वनिता आणि लीना अगदी नर्सरीपासून एकाच शाळेत शिकलेल्या अगदी घट्ट मैत्रिणी. त्यामुळं वनिता लीनाला चांगलीच ओळखत होती. तिचं काही तरी बिनसलंय, हे वनिताच्या लक्षात आलं होतं, पण ती बोलत नव्हती. लग्न या विषयावर अतिशय उत्साही असणारी आणि स्वतःच्या लग्नाचं सगळं नियोजन स्वतः करून प्रत्येक इव्हेंट एन्जॉय करणारी लीना लग्न झाल्यानंतर एकदम कोमेजून गेली होती. आत्ताच तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसायला लागली होती. खरंतर वनिताला तिची काळजी वाटत होती. आज तिला बोलतं करायचंच, असं वनितानं ठरवलंच होतं. ती तिच्या जवळ गेली, तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला, “लीना, तुझ्या मनात काय चाललंय मला सांगशील? आपण दोघी अगदी सख्ख्या मैत्रिणी आहोत. तू मला सांगणार नाहीस? बोल लीना. बोलल्यावर तुला हलकं वाटेल.” आता मात्र लीनाचा बांध फुटला. तिने वनिताला मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली, तिचा आवेग ओसरल्यावर तिनं बोलायला सुरुवात केली.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : भार्गवी चिरमुले – एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असतो तुमचा मेन्टॉर !

“ विनी, माझी फसवणूक झालीय गं. लग्नाच्या जोडीदाराची मी किती स्वप्नं बघितली होती, पण माझी खूप निराशा झालीय.”
“काय झालंय लीना, सौरभ तुला काही त्रास देतो का?”
“नाही गं तो माझ्यावर प्रेमच करतो, पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे.”
“प्रॉब्लेम? कोणता?”
“ अगं, तो क्रॉस ड्रेसर आहे.”
लीनाने पहिल्या रात्रीचा किस्सा सांगितला. अतिशय उत्साहाने लीना पहिल्या रात्री सौरभची वाट बघत होती आणि तो लीनाचा वनपीस घालून लिपस्टिक लावून तिच्या जवळ आला, कदाचित चेष्टा मस्करीत त्यानं असं वर्तन केलं असावं असं तिला वाटलं, पण नंतर हे नित्याचंच झालं. त्याच्या मोबाइलमध्ये स्वतःच्या स्त्री वेशातील फोटो त्याने सेव्ह केले होते. हे सर्व बघून तिला खूप धक्का बसला. या सर्व गोष्टी सौरभने बंद कराव्यात यासाठी तिनं खूप आटापिटा केला, पण व्यर्थ. ‘क्रॉस ड्रेसिंग’शिवाय सेक्समध्ये कोणताही परफॉर्मन्स त्याला शक्य होत नव्हता. दिवसभर ऑफिसमध्ये एका कंपनीचा मॅनेजर म्हणून काम करणारा सौरभ रात्री घरी आला की वेगळ्याच भूमिकेत जायचा. त्याचं हे रूप बघून लीना घाबरून गेली होती, पण सौरभने त्याचा प्रॉब्लेम तिला सांगितला आणि यामध्ये तिनं त्याला सहकार्य करावे, अशी त्याची अपेक्षा होती. आपल्याला एका राजपुत्रासारखा रुबाबदार, उमदा जोडीदार मिळावा, सर्व गोष्टीत त्यानं पुढाकार घ्यावा असं स्वप्न घेऊन नव्यानं संसाराची सुरुवात करणारी लीना आता मनानं कोसळून गेली होती. स्वतःचं दु:ख तिला कोणालाही सांगताच येत नव्हतं.

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

वनिताला आता तिची खरी समस्या कळली होती म्हणूनच लीनाला धीर देणं महत्त्वाचं होतं. “लीना, सौरभनं त्याचा प्रॉब्लेम तुला सांगितला आहे, तुझ्यासाठी हे सगळं नवीन आणि अघटित असलं तरी अशी समस्या अनेक व्यक्तींमध्ये असते, त्याची कारणही अनेक असतात. काही तरी वेगळ्या फँटसीमध्ये या व्यक्ती जगत असतात, गंमत म्हणून करताना कधी कधी त्याची सवय लागून जाते आणि नंतर त्याच्यातून बाहेर पडणं त्यांना अवघड होऊन जातं. तू कोणतीही चिडचिड न करता, न रागावता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कोणताही त्रास करून न घेता त्याला समजून घे. तुम्ही एखाद्या मानसोपचारतज्ञांची मदत घ्या. यासाठी काही उपचार आणि थेरपी असतात, आपल्या जीवनशैलीत काही बदल करून तसेच समुपदेशकांची मदत घेऊन अशा समस्येमधून या व्यक्ती बाहेर येऊ शकतात. तू सकारात्मक राहून या समस्येमधून बाहेर येण्यासाठी सौरभला मदत कर. कोणत्याही समस्येत पती-पत्नीने एकमेकांच्या सोबत राहिलं, एकमेकांना आधार दिला तर समस्येतून मार्ग निघतोच आणि एकमेकांचं घट्ट नातं तयार होतं. आपल्या विवाह संस्कारातही हेच सांगितलं आहे.”.

आणखी वाचा : केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

“थँक्यू विनी. तुझ्याशी बोलून खूपच मोकळं वाटलं. मी सौरभला दोष देण्याऐवजी आता आजच त्याच्याशी बोलून, त्याला विश्वासात घेऊन मानसोपचारतज्ञाची अपॉइंटमेंट घेते. सौरभच्या आणि माझ्या आयुष्याची सुरुवात नव्यानं व्हावी यासाठी प्रयत्न करते.’’
“ दॅट्स लाइक अ गुड गर्ल.” असं म्हणून वनिताने लीनाला पुन्हा हसवलं आणि नंतर दोघीही गप्पात रंगून गेल्या.
smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:05 IST

संबंधित बातम्या