केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) ही भारतातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. त्यासाठी कठोर मेहनत आणि सरावाची गरज असते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते. तर, आज आपण अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या मदतीशिवाय यूपीएससी परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर दुसऱ्या प्रयत्नात प्रशंसनीय अशी एअर ७३ (AIR 73) रॅंकदेखील मिळवली आहे. चला तर जाणून घेऊ या महिलेची यशोगाथा.

शैक्षणिक प्रवास

आयएएस पल्लवी मिश्रा भोपाळच्या रहिवासी आहेत. पल्लवी मिश्रा यांनी शालेय शिक्षण भोपाळमध्ये पूर्ण केले आणि दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांना संगीत या विषयात खूप रस होता. त्यामुळे पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीत या विषयात मास्टर्स केले. पल्लवी मिश्रा प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आहेत. खास गोष्ट अशी की, आयएएस अधिकारी पल्लवी यांनी दिवंगत पंडित सिद्धराम कोरवार यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.

कुटुंब

पल्लवी मिश्रा यांचे वडील अजय मिश्रा हे ज्येष्ठ वकील; तर त्यांच्या आई डॉक्टर रेणू मिश्रा या ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. तसेच त्यांचा मोठा भाऊ आयपीएस अधिकारी आदित्य मिश्रा हे इंदूरचे उपायुक्त आहेत. पल्लवी मिश्रा या आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला आणि विशेषतः मोठ्या भावाला देतात.

तर मोठ्या भावाचे पाठिंब्यामुळे त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. पण,पल्लवी मिश्रा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अनुत्तीर्ण झाल्या. पण, त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा मोठ्या जोमाने तयारी केली. पहिल्या प्रयत्नातील मुख्य परीक्षेत त्यांनी निबंधाचा चुकीचा विषय निवडला होता. मग यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी निबंध लेखनाचा सराव केला. पहिल्या प्रयत्नातील मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या चुका लक्षात आल्या आणि पुढच्या प्रयत्नात त्यांनी त्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी मेहनत घेतली. अशा प्रकारे त्यांनी यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नात चांगले यश मिळविले.

हेही वाचा…Forbes India: ‘फोर्ब्स’च्या यादीमध्ये या ‘पाच’ प्रसिद्ध अन् यशस्वी महिलांची वर्णी; जाणून घ्या

आयएएस अधिकारी पल्लवी मिश्रा या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर @ias_pallavimishra सक्रिय आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना हवामान बदलावर काम करायचे आहे. त्याबरोबरच महिलांपर्यंत आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित सरकारी योजना पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येकाला त्यांच्या शहरात सुरक्षित वाटावे, अशी त्यांची इच्छा आहे. तर अशी आहे पल्लवी मिश्रा यांची यशोगाथा.

Story img Loader