मुक्ता सिंग यांना सुरुवातीपासूनच स्टायलिश राहण्याची आवड होती. काळानुसार, नवीननवीन ट्रेंडनुसार त्या स्वत:ला अपडेट करत राहिल्या. सोशलमीडियासुद्धा उत्तमप्रकारे हाताळू लागल्या. अशातच एक दिवस एका कौटुंबिक सोहळ्यात जाण्यासाठी त्यांनी अकारो (Akaaro) ब्रँडची साडी नेसली. त्याचे फोटो त्यांनी सोशलमीडियावर अपलोड करत असताना त्या अकारो ब्रँडला देखील टॅग केलं होतं. ब्रँड टीमने त्यांचे फोटो पाहून त्यांना ब्रँडसाठी मॉडेलिंगची ऑफर केली. आणि वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी पहिलं मॉडेलिंग केलं.

आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रतिकूल परिस्थिती म्हणा, कौटुंबिक जबाबदारी किंवा काही ना काही कारणांमुळे ते पूर्ण करायचं राहून जातं. परंतु आज ना उद्या आपलं स्वप्न पूर्ण होईल या आशेवर पूर्ण आयुष्य निघून जातं. वय झाल्यावर काहींच्या बाबतीत मात्र उरात बाळगलेलं स्वप्न हे स्वप्नंच राहून जातं. परंतु मनात जिद्द असलेली माणसं मात्र शेवटपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. असंच काहीसं झालं आहे मुक्ता सिंग यांच्याबाबतीत. ज्या वयात जी स्वप्ने उराशी बाळगली होती ती कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना पार पाडता आली नाहीत. आता साठीत असताना त्यांनी ती त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. या वयात अनेक जण  एकतर नातवंडांसोबत वेळ घालवतात किंवा भक्तीमार्गाला लागतात. पण मुक्ता सिंग यांनी तीही जबाबदारी पार पाडत मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकून मॉडेलिंग क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. त्यांचे फोटो पाहताच उम्र तो एक बहाना है, जज़्बात तो आज भी वैसे ही हैं, न दिल बुढ़ा हुआ है, न ख्वाबों की उड़ान कम हुई है, बस वक्त ने थोड़ी चाल बदल ली है। या ओळी आपसूक मनात येतात.

मुक्ता सिंग या राजस्थानमधील भरतपूरमधल्या रहिवासी. इंग्रजी विषयातील मास्टर डीग्री पूर्ण केल्यावर त्यांचं लग्न भारतीय हवाई दलातील  वैमानिकाशी झालं. हवाई दलात असल्यानं त्यांच्या पतीची बदली अनेक ठिकाणी होत असे. घरची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी एक आवड म्हणून काही मासिक, वर्तमानपत्रांसाठी स्वतंत्र लेखनसुद्धा केलं. तसंच स्वत:ला व्यग्र ठेवण्यासाठी त्या कॅन्व्हास पेंटींगसुद्धा करू लागल्या. पतीच्या निवृत्तीनंतर त्या गुरुग्राम येथे स्थायिक झाल्या.

आयुष्य कितीही सुखकर असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचा काळ हा असतोच. तसंच काहीसं मुक्ता यांच्यासोबत झालं. गुरुग्रामला स्थायिक होताच त्यांच्या आईला कर्करोगाचं निदान झालं. आईची काळजी घेत असताना त्यांनी स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं. अशातच आजीचा सांभाळ करताना आपल्या आईच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्यांची मुलगी थोडी नाराज झाली होती. त्यामुळे त्यांनी मुलीला एक दिवस शब्द दिला की भले माझ्या केसांकडे दुर्लक्ष होईल पण मी तब्येतीची आणि फिटनेसची पूर्णपणे काळजी घेईन.

मुक्ता यांचे केस हे १५ व्या वर्षीच पांढरे होऊ लागले. वयाची तिशीपर्यंत त्यांचे पूर्ण केस पांढरे झाले होते. त्यामुळे ‘मी माझ्या वयापेक्षा मोठी दिसू लागल्याचे’ त्या सांगतात. त्या केसांना रंग लावू लागल्या. त्यांना सुरुवातीपासूनच स्टायलिश राहण्याची आवड होती. काळानुसार, नवीननवीन ट्रेंडनुसार त्या स्वत:ला अपडेट करत राहिल्या. सोशलमीडियासुद्धा उत्तमप्रकारे हाताळू लागल्या. अशातच एक दिवस एका कौटुंबिक सोहळ्यात जाण्यासाठी त्यांनी अकारो (Akaaro) ब्रँडची साडी नेसली. त्याचे फोटो त्यांनी सोशलमीडियावर अपलोड करत असताना त्या अकारो ब्रँडला देखील टॅग केलं होतं. ब्रँड टीमने त्यांचे फोटो पाहून त्यांना ब्रँडसाठी मॉडेलिंगची ऑफर केली. आणि वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी पहिलं मॉडेलिंग केलं.

मुक्ता यांनी ही ऑफर स्वीकारली तरी उतारवयात मॉडेलिंग करण्याचा त्यांचा निर्णय वाटतो तितका सोपा नव्हता. त्यांना कुटुंबातून मुलांचा पतीचादेखील पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले. पण मॉडलेिंगच्या सुरुवातीच्या काळात सोशलमीडियावर त्यांना बॉडी शेमिंगचादेखील सामना करावा लागला. ‘आंटी, बुढिया, बुढापे में ये सब ठीक लगता है क्या? अशा चित्रविचित्र टीकेचा सामना करावा लागला. मुक्ता यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे त्यांनी आपली मॉडेलिंगची वाटचाल पुढे सुरूच ठेवली.

मुक्ता यांचा ठाम विश्वास आहे की, वाढतं वय हे फक्त एक निमित्त आहे. ते तुमची स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा बनता कामा नये. एक महिला आपले संपूर्ण आयुष्य कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात वाहून घेते. याचा अर्थ असा नाही की महिलांनी आपल्या स्वप्नांकडे, ध्येयाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तुमचं दिसणं, शारिरीक बांधा, राहणीमान साधे जरी असले तरी तुमचा आत्मविश्वास भक्कम असला पाहिजे. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही स्वत:ला देखील महत्त्व दिले पाहिजे. स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. स्वत:ची आवड जपली पाहिजे असं त्या ठामपणे सांगतात.

मुक्ता सिंग यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे केस आणि केसांची स्टाईल. भले त्यांचे केस पांढरे असतील, पण हेच पांढरे केस त्यांच्या लोकप्रियतेचे कारण बनले आहे. आतापर्यंत त्यांनी श्वेता कपूर, अमित अग्रवाल यांसारख्या दिग्गज फॅशन डिझायनर तसेच इतर अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. लॅक्मे फॅशन वीक जिथे प्रत्येक तरुण मॉडेलचे स्वप्न असते अशा ब्रँडसाठीदेखील त्यांनी मॉडेलिंग केले आहे. तसेच काही रिॲलीटी शोजमध्येदेखील त्यांनी गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. साठीतही मुक्ता सिंग या मॉडेलिंगच्या दुनियेत तरुण- तरुणींना धोबीपछाड देऊन त्यांनी स्वत:चे असे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rohitpatil.expressindia.com