‘ती आली, तिनं भाषण केलं आणि सगळ्यांनाच जिंकून घेतलं,’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं. पण नुकतंच खरं असं घडलंय एका २१ वर्षांच्या मुलीबाबत. बघायला गेलं तर फक्त २१ वर्षांची मुलगी. तिच्या भाषणातून काय प्रभाव पाडणार? असं वाटत असेल, तर सध्या तिचे जगभरात व्हायरल झालेला व्हिडीओ पाहा. तिची भाषा कळत नसूनही लाखो लोकांनी तो पाहिला आहे. सध्या सगळीकडे गाजत असलेली ही तरुणी आहे न्यूझीलंडची खासदार हाना-रावती मायपी-क्लार्क (Hana-Rawhiti Maipi-Clarke). हाना ही न्यूझीलंडची वयानं सगळ्यांत लहान असलेली खासदार आहे. पण तिचं लहान वय हा चर्चेचा विषय नाहीच. तर तिचं भाषण, त्यामागचा तिचा हेतू आणि तिच्या भावना या खऱ्या महत्त्वाच्या आहेत.

न्यूझीलंडच्या ओटेरोआमधून हाना निवडून आली. संसदेतलं तिचं पहिलंच भाषण देताना तिनं ‘हाका’ हा पारंपरिक नृत्य-गानप्रकार सादर केला, ज्यानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. तो इतका ‘व्हायरल’ झालाय, की तुम्हीही कदाचित तो समाजमाध्यमांवर पाहिला असेल. केवळ ‘new zealand youngest mp’ हे सर्च वर्डस् टाकूनही तो लगेच सापडावा, इतके व्ह्यूज त्यास मिळताहेत. परंतु तिशी भाषा आपल्याला समजत नसल्यानं तिच्याविषयी थोडी माहिती देण्याचा हा प्रयत्न.

हाका हा न्यूझीलंडमधील मूळ रहिवासी असलेल्या माओरी समुदायाचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे. माओरी भाषेत हाकाचा अर्थ नृत्य. ऑकलँड आणि हॅमिल्टन यांच्यामध्ये असलेलं एक छोटंसं शहर हंटली हे हानाचं मूळ गाव. हानाचे वडील तैतिमू मायपी हे नगा तमातोआ या गटाशी जोडलेले आहेत. ती स्वत: तिच्या भागात माओरी समुदायातील मुलांसाठी एक गार्डन चालवते. तिला राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. १८७२ मध्ये तिचे पूर्वज विरेमू काटेने हे माओरी समाजातील पहिले मंत्री बनले होते. तर तिची आणखी एक नातेवाईक आंटी हाना ते हेमारा हिनं १९७२ मध्ये संसदेत पहिल्यांदा माओरी भाषेत भाषण केलं होतं.

या सगळ्यांत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाना स्वत:ला राजकीय नेता न मानता माओरी भाषेची, संस्कृतीची संरक्षक मानते. आणि त्यामुळेच तिनं संसदेत ज्याप्रकारे भाषण केलं त्याला वेगळं महत्त्व आहे. हाना हिनं संसदेत भाषण करताना सादर केलेलं हाका हे नृत्य पारंपरिक प्राचीन युध्द नृत्य आहे. अत्यंत ताकद आणि भावनापूर्ण रितीने हे नृत्य सादर केलं जातं. माओरी समुदायाच्या गौरव, शक्ती आणि एकतेचं हे एक उग्र प्रदर्शन मानलं जातं.हाका नृत्यामध्ये एका लयीत शरीराची हालचाल,शरीर थरथरवणं, जमिनीवर जोरजोराने पाय आपटणं, जोरात ओरडणं, जीभ बाहेर काढणं, अशा क्रिया समाविष्ट असतात. विविध प्रदेशांमधील जाती/ समुदायांनुसार हाका नृत्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही वेळेस या हाका नृत्यांमधून समुदायाचा इतिहास सांगितला जातो, तर काही वेळेस हाका नृत्य हातात शस्त्रं घेऊनही सादर केला जातो. तर मग हानानं आपल्या पहिल्या संसदीय भाषणात हाका नृत्य का सादर केलं असावं?

हेही वाचा… पत्नी पतीच्या घरात वास्तव्यास असल्याच्या कारणास्तव देखभाल खर्च नाकारता येणार नाही…

यामागे एक खोल अर्थ दडला आहे. आताच्या काळात माओरी समुदायाच्या सन्मानासाठी हाका नृत्य सादर केलं जातं. माओरी समुदायातील तरुण पिढीचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हानानं न्यूझीलंड संसदेतील तिचं पहिलं भाषण सुरु करण्यासाठी हाका नृत्य-गीत सादर केलं.

हाना ही न्यूझीलंडच्या संसदेतील गेल्या १७० वर्षांमधील सर्वांत लहान प्रतिनिधी आहे. संसदेत येण्यापूर्वी आपल्याला ‘इथली कोणतीही गोष्ट वैयक्तिकरित्या मनाला लावून न घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण सरकारनं माझ्या जगावरच जणू हल्ला केला आहे, असं म्हणत तिनं न्यूझीलंड सरकारचा नवा करार आणि माओरी भाषेबाबतच्या धोरणांवर हल्ला चढवला. २००८ पासून सातत्याने निवडून येणाऱ्या नैना महुता यांचा पराभव करत हाना न्यूझीलंडच्या संसदेवर निवडून गेली आहे. माओरी समुदाय, माओरी भाषेच्या रक्षणासाठी ती सातत्यानं लढत आहे. उत्तर न्यूझीलंडमध्ये माओरी समाजाचं जास्त प्राबल्य आहे. मूळ निवासी असलेल्या आपल्या समुदायाला डावललं जात असल्याची भावना हानानं अत्यंत आक्रमकपणे व्यक्त केली.

तिच्या भाषणापूर्वीच्या हाका गान-नृत्याची तर चर्चा झालीच, पण भाषणातल्या तिच्या एका वाक्याचीही सगळीकडे चर्चा सुरु आहे. ‘मी तुमच्यासाठी जीवही देईन, आणि तुमच्यासाठीच जगेन,’ असं हाना म्हणाली आहे. आपली भाषा बोलायला, शिकायला लाज वाटणाऱ्या समुदायातील तरुण मुलांनाही तिनं सुनावलं आहे. जगातील जुन्या लोकशाही देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो. आपल्या देशात, आपल्या जमिनीवर राहण्याचा आपला हक्क अबाधित राहावा यासाठी आपली मूळं न विसरता लढणाऱ्या २१ वर्षांच्या हानाचं म्हणूनच जगभरात कौतुक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokwomen.online@gmail.com