इराचं लग्न झालं आणि काही महिन्यांत तिचा मर्चंट नेव्हीमधील नवरा कामावर रुजू झाला. आता पुढील काही महिने त्यांची भेट होणार नव्हती. बऱ्याचदा रेंज नसल्याने फोनवर बोलणंही फारसं होत नव्हतं. तिचं ऑफिस झाल्यावर उरलेला वेळ ती एकटी असायची, मग करमणूक म्हणून सोबतीला होता मोबाइल आणि सोशल मीडिया. सोशल मीडियावर भटकंती करताना तिची एका पुरुषाशी मैत्री झाली. ती मैत्री वाढवण्यात तिला काहीच धोका वाटला नाही. कारण तो दुसऱ्या देशात राहत असल्याने कधीच भेटीची शक्यता नव्हती. त्याच्याशी मैत्री करणं हा तिच्यासाठी फक्त एक विरंगुळा होता.

आधी फक्त मेसेजेस, मग मैत्रीपूर्ण फोनवर बोलणं, त्यानंतर विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. त्याचंही लग्न झालेलं असल्याने दोघं आपापल्या जोडीदारबद्दल बोलू लागले. थोड्याच काळात ते एकमेकांसोबत बोलण्यात एकदम सहज झाले, फोटो शेअर होऊ लागले आणि मग त्यांच्या बोलण्यात लैंगिक विषय यायला सुरुवात झाली. ते एकमेकांना शारीरिक संबंधांवर मेसेज पाठवू लागले. थोडक्यात, त्यांचं ‘sexting’ सुरू झालं. सेक्स्टिंग म्हणजे लैंगिक कृतींवर टेक्स्ट किंवा अश्लील फोटो पाठवणं आणि त्यावरून समोरील व्यक्तीस कामुक बनवत आपण त्या क्रियेत प्रत्यक्ष सहभागी असल्यासारखा आनंद घेणं. काही दिवसांतच त्याने तिच्याकडे न्यूड फोटो पाठवण्याची मागणी केली. इथं मात्र ती सावध झाली. तिनं नकार दिल्यावर तो चिडला. तिला सरळ सरळ धमक्या देणं सुरू केलं.

हेही वाचा… मुस्लिम महिलेला पुनर्विवाहानंतरसुद्धा पहिल्या पतीकडून देखभाल खर्च मिळायचा हक्क

मी तुझे सगळे ‘टेक्स्ट’ व्हायरल करेन, तुझ्या सासरच्या लोकांना दाखवेन, अशी धमकी द्यायला सुरुवात केल्यावर मात्र ती जाम घाबरली. कारण हे सगळं तिनं आपल्या पतीपासून लपवून ठेवलं होतं. आपण काही चुकीचं करतोय असं तिला वाटलं नव्हतं. पण आता मात्र विषय गंभीर झाला होता. त्या व्यक्तीला गप्प करण्यासाठी तिला फार मोठी किंमत चुकवावी लागली. फोनमधील सिम बदललं, सोशल मीडियावरील सगळे अकाऊंट डिलीट करावे लागले आणि त्या व्यक्तीने माझं अकाऊंट हॅक केलं, असा उलट कांगावा करावा लागला. तिला आणि तिच्या नवऱ्याला प्रचंड त्रास झाला. नवरा समजूतदार होता म्हणून निभावलं. इराला तिची चूक समजली. अशी चूक, ज्यामुळे तिचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकलं असतं.

तुलिका ही अशीच एक तरुणी. तिचं म्हणणं असं आहे की, लैंगिक आनंद घेण्याची इच्छा असणं अगदी नैसर्गिक आहे, आणि त्याच्या अनेक पद्धतीदेखील आहेत. ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला प्रेम आहे किंवा शारीरिक आकर्षण आहे, आणि शिवाय गोपनीयता राखली जाण्याबद्दल विश्वास आहे, तिच्याशीच तुम्ही असे संवाद किंवा शेअरिंग करू शकता. अनोळखी व्यक्तीसोबत असे शेअरिंग अजिबातच करू नये. सोबत राहणारे पती-पत्नीदेखील असा आनंद घेऊ शकतात, पण आपला फोन घरातील इतर कुणाच्या हाती जाण्याची शक्यता असेल तर तसं करण्यातही धोका आहे. अनेकांच्या नजरेतून असे टेक्स्ट पाठवणं ही एक विकृती आहे, पण तुलिकाला तसं वाटत नाही. हे तिचं वैयक्तिक मत झालं.

अनेकांच्या मते, लैंगिक सुख हा दोन व्यक्तींमधली अत्यंत खासगी विषय आहे. नाजूक प्रेमाचा संवाद, हळुवार भावना या वैयक्तिक आहेत. तो विषय चव्हाट्यावर आणून त्यातील पावित्र्य आणि आनंद घालवू नये. त्यांच्या मते, इतरांनी तुमच्या खासगी क्षणांची खिल्ली उडवावी अशी कृती करण्याची आवश्यकताच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर आजच्या काळात कुठलाही डेटा सुरक्षित नाही. मग अशा वेळी आपले अत्यंत खासगी संवाद आणि फोटो सुरक्षित कसे राहू शकतील? सोशल मीडियावर आपण अडचणीत येऊ अशी कुठल्याही माहिती शेअर करणं हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच मैत्रिणींनो, सावधान!

\adaparnadeshpande@gmail.com