“अंजली, तू दांडिया खेळायला येणार आहेस ना, अगं, बुकिंग सुरू झालं आहे, आम्ही सगळे नाव नोंदवतोय आणि थोडी प्रॅक्टिसही करावी लागेल ना.”

“ नाही गं, या वेळेस मला नाही जमणार, रोहनची दहावी आहे. पियूची परीक्षा तोंडावर आली आहे, ती लहान आहे. स्वतःहून अभ्यास करत नाही. दिलीपची नेमकी ऑफिस टूर आणि सासूबाईंनी नवरात्रीनिमित्त घरात ठेवलेलं कुंकुमार्जन या सगळ्या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत, वेळच नाही मला. तुम्ही सगळ्या गेलात तरी चालेल, माझं नाव नोंदवू नकोस.”

“अगं, पण आपलं ठरलं होतं ना, या नवरात्रीत सर्वांनी मिळून दांडियासाठी जायचं. या सगळ्या गोष्टी याआधीही होत्याच, तरीही तू हो म्हणाली होतीस ना? मला माहिती आहे, काजलने दांडियासाठी नावं नोंदवलं आहे. म्हणून तुला यायचं नाहीये, बाकी सर्व गोष्टी मॅनेज करून तू येऊ शकतेस हे मलाही माहिती आहे.”

“ रेणुका, तुला सर्व माहिती आहे ना, मग मला का विचारतेस? मी तुला काही सांगण्याची गरजच नाहीये, जिथं काजल असेल तिथं मी येणार नाही.”

“अगं, आपला ग्रुप वेगळा आहे, मग काय हरकत आहे?”

“ ती तिथंच असणार आहे आणि मला तिचं तोंड बघण्याचीही इच्छा नाही. तिनं माझा जो अपमान केला आहे तो मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मला अजिबात आग्रह करू नकोस.”

हेही वाचा… महिन्याभरापूर्वी भीक मागायच्या… आता इन्स्टाग्रामवर ६ लाख ८० हजार फॉलोअर्स! वृद्ध ‘मर्लिन टीचर’ची ‘व्हायरल’ गोष्ट

रेणुका अंजलीला मनवण्याचा प्रयत्न करीत होती, पण काजल आणि अंजली यांच्यामध्ये झालेले वाद आणि कटू गोष्टी ती विसरुच शकत नव्हती. त्यावेळेस काजलचा गैरसमज झाला होता, तिचा नवरा प्रदीप आणि अंजली एकाच प्रोजेक्टवर काम करीत होते. अंजली तेव्हा टीम लीडर होती. कामाच्या निमित्ताने तिला प्रदीपला फोन करावे लागायचे, पण काजलने तिच्यावर संशय घेऊन वेगळेच आरोप केले आणि ‘माझ्या नवऱ्याला सारखी का फोन करतेस?’ म्हणून ऑफिसमध्ये येऊन चारचौघांत जाब विचारला होता. खरं तर काजल अंजली आधीपासून मैत्रिणी होत्या. काजल आणि प्रदीपमध्ये काही वाद झाले होते आणि तो सगळा राग अंजलीवर काढला होता. तेव्हापासून अंजलीचे आणि तिचे संबंध अगदीच बिघडले होते. कालांतराने काजलला तिची चूक लक्षात आली, तिनं अंजलीला सॉरी म्हणण्याचा प्रयत्नही केला, पण अंजलीने तिच्याशी बोलण्याची इच्छा दाखवली नाही.

या गोष्टी वारंवार आठवून अंजलीने स्वतःला खूप त्रास करून घेतला होता. काजलबद्दल प्रचंड राग तिच्या मनात धुमसत होता. याचं आइसब्रेकिंग होणं महत्वाचं आहे, असं रेणुकाला वाटतं होतं.

“अंजली, तुझ्या मनात काजल बद्दलचा जो राग आहे, तो साहजिकच आहे, पण हे ओझं किती दिवस मनात बाळगणाऱ आहेस? तिचं नाव उच्चारलं तरी तुझ्या कपाळावर आठ्या येतात. त्या विचारानेही तुला त्रास होतो. हा स्वतः ला त्रास करून घेण्यापेक्षा एकदा काजलला काय बोलायचंय ते बोलून घे. तिची चूक तिच्या लक्षात आलेली आहे, त्या वेळेस प्रदीप ऑफिसच्या कामात बिझी होता, तिला वेळ देत नव्हता म्हणून त्यांच्यातील वाद होते आणि त्या रागात ती तुझ्याशी बोलली होती. तिची चूक होतीच, पण या सर्व कृत्याचा तिला पश्चाताप होतो आहे. तिलाही तुझ्याशी बोलायचं आहे. एकदा मन मोकळं करून टाक. तुझ्या मनावरील ताणही कमी होईल. असं धुमसत राहिल्याने तुझ्या मनावर आणि शरीरावरही त्याचा परिणाम होतो आहे.”

रेणुका अंजलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती, पण अंजली तिचा हेका सोडण्यास तयार नव्हती.

“ रेणू, अगं एवढं सोपं असतं का हे सगळं विसरणं? ती माझ्या एकटीशी बोलली नव्हती, तर ऑफिसमध्ये सर्वांसमोर बोलली होती.”

“अंजली, या सर्व गोष्टीला चार वर्षं झाली. तू सांग किती जणांच्या हे लक्षात आहे? लोक विसरून जातात, पण तू ती गोष्ट धरून ठेवली आहेस, आणि तेव्हाही सत्य काय आहे, हे सर्वांनाच माहिती होते, ऑफिसमधील सर्वांनीच काजलाचं समज दिली होती. हा तिचा निव्वळ गैरसमज आहे, हे सर्वांच्या लक्षात आलं आणि नंतर तिच्याही लक्षात आलं. अंजली स्पष्ट सांगू का? सर्वांसमोर ती बोलली आणि त्याचा लोकं काय विचार करतील? याचं तुला अधिक वाईट वाटलं आहे. लोकांचा इंटरेस्ट तात्पुरता असतो. लोकांची स्मरणशक्ती फारच अल्प असते. त्यामुळे लोक काय म्हणतील, काय म्हणत असतील याचं आपण उगाचच दडपण घेतो. सोडून दे आता हे सगळं.”

हेही वाचा… पालकत्व: उशिरा होणाऱ्या मुलाचे संगोपन

रेणुका बऱ्याच गोष्टी अंजलीला समजावून सांगत होती आणि अंजलीही याचा काही वेळ विचार करत होती, आपणही उगाचच ताणून धरतोय आणि आपलीच मनस्थिती बिघडून घेतोय, हे तिच्याही लक्षात आलं. नंतर तीच म्हणाली, “खरंय गं तुझं म्हणणं. मी मलाच खूप त्रास करून घेतला आहे, पण आता हा विषय मलाही मनातून काढून टाकायचा आहे.”

रेणुकाला थोडं बरं वाटलं.

“ हो ना? मग या नवरात्रीमध्ये मनानं मुक्त हो, आपण ‘अनादी निर्गुण’ हा जोगवा म्हणतो ना, त्यामध्ये-‘धरीन सद्भाव, अंतरीच्या मित्रा,’ असं एक वाक्य आहे. आपल्या मनातील सर्व अहंभाव द्वेष काढून टाकायचं वरदान देवी मातेकडं मागायचं असतं आणि आपलं मन निर्मळ ठेवायचं. मग आता तुझं ही नाव नोंदवू ना दांडियामध्ये?”

“ हो रेणू चालेल. आपण उद्यापासूनच आपली प्रॅक्टिस सुरू करू.”

आणि दोघींचंही पुढचं प्लॅनिंग सुरू झालं.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smitajoshi606@gmail.com)