दर काही वर्षांनी फॅशनमध्ये काहीतरी मोठा बदल घडत असतो. मोठा बदल म्हणजे केवळ फॅशन शोच्या ‘रनवे’वर दिसणारा बदल नव्हे, तर तुम्हा-आम्हा सामान्यांच्या रोजच्या ‘लेण्या’त उतरणारा बदल. साधारण १४-१५ वर्षांपूर्वी आपल्याकडे सलवारच्या ऐवजी ‘होजिअरी’सारख्या ताणल्या जाणाऱ्या कापडाची ‘लेगिंग’ वापरली जाऊ लागली- म्हणजे तेव्हापासून सामान्य नागरिकांमध्ये स्त्रिया आवर्जून सलवार आणि चुडिदारऐवजी लेगिंग खरेदी करू लागल्या. अर्थात त्यापूर्वीही ‘स्लॅक्स’ किंवा अँकल लेंग्थ लेगिंग होत्या, मात्र त्याचा वापर रोजच्या कपड्यांमध्ये कुर्त्यावर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत नसे, तो २००७-२००८ मध्ये अगदी सार्वत्रिक झाला.

लेगिंग्ज आल्यानंतर अल्पावधीतच ‘जेगिंग्ज’नीही भारतात सामान्यांच्या फॅशनविश्वात पाय रोवले आणि त्यानंतर आलेल्या त्या- ‘ट्रेगिंग्ज’. या लेखात आपण लेगिंग, जेगिंग आणि ट्रेगिंगमध्ये नेमका फरक काय ते पाहूयाच, शिवाय या प्रत्येकीच्या खरेदीसाठी उपयुक्त ठरतील अशा काही टिप्सही पाहू या.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

लेगिंग 

आता अशी स्त्री शोधावीच लागेल जिच्या वॉर्डरोबमध्ये एकही लेगिंग नाही, इतक्या या ‘कम्फर्टेबल’ आहेत. सुरूवातीला लेगिंग्ज प्रथम फक्त चुडिदार प्रकारच्या म्हणजे स्ट्रेची कापड आणि घोट्यापाशी चुडिदारसारख्या चुण्या असलेल्या होत्या. नंतर त्यात खूपच वेगवेगळे रंग उपलब्ध होऊ लागले. हलक्या शेडचे ‘पेस्टल’ रंगही त्यात मिळू लागले. त्यामुळे कुर्त्याबरोबर ‘मिक्स अँड मॅच’ करणं सोपं होऊ लागलं. अँकल लेंग्थ लेगिंग्जचा वापर मात्र गेल्याच काही वर्षांत वाढला आहे. या दोन्ही प्रकारच्या लेगिंग तुमच्या वॉर्डरोबमध्ये हव्यातच. रोजच्या वापराला अँकल लेंग्थ लेगिंग्ज जास्त सुटसुटीत आणि उपयुक्त ठरतात. चुण्या नसल्यामुळे पावसाळ्यात वापरण्यासाठी अत्युत्तम. चुण्या असलेल्या लेगिंग्ज अनेकदा धुतल्यानंतर चुण्यांच्या जागचं कापड काहीसं विसविशीत होऊन चुण्या खाली ओघळतात आणि लेगिंग बेढब दिसू लागते. अँकल लेंग्थमध्ये ही समस्या येत नाही. (शिवाय अँकल लेंग्थ तुमचं वय काहीसं तरूण भासवते हा अतिरिक्त फायदा!) सणसमारंभांना मात्र चुडिदार लेगिंग अधिक चांगला ‘लूक’ देतात. काही लेगिंग्जना कमरेपाशी सलवारसारखी नाडी बांधायला दिलेली असते. म्हणजे कालांतरानं लेगिंगचं मूळचं इलास्टिक सैल झालं, तरी नाडीचा चांगला आधार असतो. पण नाडीचा आकार कुर्त्याच्या वरून दिसून येत असल्याकारणानं हल्ली बिन-नाडीच्या- फक्त ब्रॉड इलास्टिक असलेल्या लेगिंग लोकप्रिय होत आहेत. त्या वापरायला उत्तम असल्या, तरी इलास्टिक चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं. लेगिंग खरेदी करताना त्याच्या कापडाचा दर्जा तपासणं महत्त्वाचं असतं. कापड नुसतं जाड असून उपयोग नाही. काही वेळा कापड तुलनेनं पातळ दिसतं आणि लेगिंग घातल्यावर ती जास्त ताणलीही जाते, तरीही कापडाचा दर्जा वाईट नसतो. स्ट्रेची कापडाचा दर्जा आणि टिकाऊपणा हा हाताच्या चिमटीत पकडून तपासल्यावर लक्षात येतो आणि थोड्या वेगवेगळ्या लेगिंग्ज तुम्ही अशा तपासल्यात तर तुम्हाला सहज त्यांचा दर्जा ओळखता येऊ शकेल. आपला लेगिंगचा साईज ओळखणं मात्र थोडंसं ट्रिकी आहे. मात्र सर्वसाधारणत: उपयोगी पडणारी टिप अशी – उदा. तुमचा जर पँट, ट्राउझर आणि जीन्सचा साईज ३४ असेल आणि तुम्ही लेगिंगसुद्धा त्याच मापानं घेतलीत, तर ती तुम्हाला किंचित ढगळ होईल, शिवाय २-३ धुण्यांनंतर ती आणखी ढगळ वाटेल. त्यामुळे लेगिंग खरेदी करताना आपल्या ‘वेस्ट साईज’पेक्षा एक साईज आतला घेतला तर अंगाला अधिक चांगला बसतो. लेगिंगचं अतिशय स्ट्रेची मटेरिअल आणि कमरेपाशी इलास्टिक असणं हे याचं कारण. तुम्ही पोट आणि कमरेखालच्या भागात अधिक ‘बल्की’ वा जाड असाल तर मात्र कदाचित तुम्हाला ही टिप लागू पडणार नाही.

जेगिंग 

लेगिंगरूपी जीन्स म्हणजे ‘जेगिंग’. मात्र जेगिंगचं कापड पूर्णत: ‘डेनिम’ नसतं. म्हणजे जीन्सच्या कापडाएवढं जाड नसलं, तरी लेगिंगच्या कापडापेक्षा निश्चित जाडसर असतं. म्हणजेच लेगिंगवर कमी उंचीचे टॉप चांगले दिसत नाहीत, ते या जेगिंगवर घालता येतात. जेगिंगला जीन्सप्रमाणेच खिसेही असतात, जे बऱ्याचशा लेगिंग्जना नसतात. (पण हल्ली खिसेवाल्या लेगिंग्ज नव्यानं लोकप्रिय होत आहेत.) जेगिंगचा किंवा आपण पुढे पाहणार आहोत त्या ट्रेगिंगचाही साईज तुम्ही ज्या साईजची पँट वा ट्राउझर वापरता तोच घ्यावा.

हल्ली अनेक जेगिंग्जना कमरेपाशी बेल्ट (पट्टा) लावायला लूप्स केलेले नसतात. ‘क्लीन लूक’ मिळावा म्हणून नुसतंच जाड इलास्टिक दिलेलं असतं. मात्र आम्ही तुम्हाला सांगू, की जेगिंग्जना बेल्टसाठी लूप असलेले चांगले. याला एक कारण आहे. अनेकदा आपण ऑनलाईन ॲप्सवरून परदेशी ब्रॅण्डस् च्या जेगिंग खरेदी करतो. यातले पुष्कळ ब्रॅण्डस ब्रिटिश वा अमेरिकन असतात. परदेशी आणि भारतीय लोकांच्या शरीराच्या ठेवणीत मूलत: काही फरक आहेत आणि या फरकामुळे आपल्याला पाय आणि मांड्यांवर उत्तम ‘फिट’ होणारी परदेशी ब्रॅण्डस् ची जेगिंग कमरेला ढगळ वाटतेय किंवा सारखी वर ओढावी लागतेय, असा अनुभव अनेकींना येतो. अशा वेळी कमरेवर नुसता बेल्ट लावला तरी काम होतं आणि ‘अल्टरेशन’ टाळता येतं.

ट्रेगिंग 

अनेकींसाठी ‘ट्रेगिंग’ हा शब्द कदाचित नवा असेल. ट्रेगिंग म्हणजे लेगिंगच्या वळणावर जाणारी ट्राऊझर. ऑफिससाठी किंवा कोणत्याही ‘फॉर्मल’ प्रसंगासाठी ट्रेगिंग उत्तम. जेगिंगवर टी-शर्ट, टॉप, क्रॉप-टॉप, कुर्ती वा ट्युनिक खुलून दिसतात, तर ट्रेगिंगवर फॉर्मल शर्ट अतिशय खुलतो. स्ट्रेची, पण जाडसर कापड, कमरेला इलास्टिक आणि अतिशय ‘कम्फर्टेबल’ फिटिंग ही ट्रेगिंगची वैशिष्ट्य. जेगिंग आणि ट्रेगिंग दोन्हीला जीन्स वा ट्राउझरसारखी चेन, बटण नसल्यामुळे अधिक क्लीन लूक मिळतो. ट्रेगिंगचं कापड जेगिंगच्या कापडापेक्षा खूपच वेगळं असतं. ट्रेगिंग खरेदीच्या वेळी त्यात वापरलेल्या कापडात ‘स्पँडेक्स’चं प्रमाण किती आहे, ते जरूर पाहावं. स्पँडेक्सचा धागा म्हणजे ताणला जाणारा धागा. स्पँडेक्स अधिक मिसळलेलं असेल, तर कापड जास्त स्ट्रेची होतं हे साधं सूत्र. त्यानुसार आपल्याला ट्रेगिंगच्या ‘फिटिंग’चा अंदाज घेणं सोपं जातं.

फॅशन नेहमीच ‘रँप वॉक’सारखी- म्हणजे सामान्य माणूस कधीही वापरू शकणार नाही अशी नसते! लेगिंग, जेगिंग आणि ट्रेगिंग हे याचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यामुळे प्रत्येकीच्या कपाटात हे तिन्ही कपडे हवेतच!