जसिंता केरकेट्टा ही कवयित्री, पत्रकार आणि कार्यकर्ती. अलीकडेच तिच्या कवितासंग्रहाला मिळालेला साहित्य पुरस्कार तिनं नाकारला, त्यास कारण ठरलं मणिपूर… मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी त्याला न दिलेला न्याय आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला कानाडोळा.

‘जंगल छानती,
पहाड लाँघती,
दिन भर भटकती हूँ
सिर्फ सूखी लकडियों के लिए
कहीं काट न दूँ कोई जिंदा पेड…’

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

निसर्गाप्रती इतकी भावनिक जवळीक असलेली आणि त्या भावना आपल्या कवितेतून हळुवारपणे, पण तितक्याच तडफेने मांडणारी कवयित्री आपल्याच समाजातल्या माणसांविषयी, त्यांच्यावरील अन्यायाविषयी न बोलली तर नवलच! कोण आहे ही कवयित्री?… तिचं नाव जसिंता केरकेट्टा. ती पत्रकारिता, कवितालेखन आणि आदिवासींसाठी करत असलेल्या सामाजिक कामांमुळे परिचित आहेच, पण सध्या तिच्या एका गोष्टीनं लोकांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे तिनं तिच्या कविता संग्रहाला मिळालेला एक पुरस्कार नाकारणं.

जसिंताची हा पुरस्कार नाकारण्यामागची भूमिका नीट समजून घेतली, तर या मुलीचं धाडस वाखाणण्याजोगं म्हणावं लागेल. आपल्या पुस्तकांना पुरस्कार मिळावेत यासाठी सरकारची तळी उचलून धरणारे, त्यांचं गुणगाण गाणारे, इतकंच काय, तर सरकारच्या चुकीच्या भूमिकेवरही शब्द गिळून गप्प बसणारे साहित्यिक आपण आजवर पाहिले आहेत. पण जसिंताचं कौतुक यासाठी, की ‘आज तक साहित्य जागृति उदयमान प्रतिभा सम्मान’ तिनं नाकारला. ती म्हणते, ‘जेव्हा मणिपूर जळत होतं, तिथल्या आदिवासींची विटंबना होत होती, त्यांचं अस्तित्वच नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू होत होते, तेव्हा मुख्य प्रवाहातील अनेक प्रसारमाध्यमं मणिपूरची परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरली. खरं तर मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठी ताकद असतानाही त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात उभं ठाकण्याची आपली नैतिकता आणि धैर्य गमावलं आहे. ते आदिवासींना असभ्य आणि विकासविरोधी मानतात. अशा वेळी मी हा पुरस्कार कसा स्वीकारू शकते? माझ्यासारख्या एका संवेदनशील कवयित्रीला आणि माझ्यातील प्रामाणिक पत्रकाराला हा पुरस्कार कसा बरं सुखावून जाईल?’ सत्ताधारी आणि मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी मणिपूरबाबत घेतलेल्या ‘डोळेबंद’ भूमिकेमुळेच आपण ही भूमिका घेतल्याचं तिनं ठामपणे सांगितलं. जसिंताच्या ‘ईश्वर और बाजार’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता.

हेही वाचा… समुपदेशन: ‘स्मार्ट आजी’ व्हायलाच हवं…

जसिंताला बघाल तर एक बारीकशा चणीची मुलगी. तिचा चेहरा पाहिला तर रूढार्थानं ही मुलगी कोणाला आव्हान देईल असे ठोकताळे आपण मांडू शकणार नाही. पण याच मुलीनं प्रस्थापित प्रसारमाध्यमं- विशेष म्हणजे ती याच क्षेत्रात काम करत असतानाही आणि सत्ताधाऱ्यांना आपल्या या पुरस्कार नाकारण्याच्या भूमिकेतून प्रश्न विचारला आहे. केवळ पत्रकारिताच नव्हे तर आदिवासींच्या उत्थानासाठी ती प्रयत्न करते. २०२२ च्या ‘फोर्ब्स’च्या यादीत भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या यादीत तिला स्थान मिळालं होतं. तिला तिच्या कामासाठी अनेक राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. जसिंता हिंदीभाषक पत्रकार, कवी आणि कार्यकर्ती आहे. ती तिची आदिवासी ओळख मिरवते. लपवत नाही. आदिवासी संस्कृती, समाज यांविषयी हिरीरीनं लिखाण करते. भारतातील आदिवासींविरोधात चाललेली दडपशाही, लिंगाधारित हिंसाचार, त्यांचं विस्थापन, यांविषयी ठोसपणे भूमिका मांडते. सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे प्रश्न विचारते.

जसिंताचा जन्म झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यातल्या खुदापोशगावातला. मास कम्युनिकेशनमध्ये तिनं मास्टर डिग्री घेतली. आदिवासींवरील अन्याय बघतच मोठी झालेल्या जसिंतानं आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार बनण्याचं ठरवलं. कारण त्या वेळी स्थानिक पत्रकार या अन्यायाविरोधात आवाज उठवत नव्हते. मग आपणच या आदिवासींचा आवाज बनून त्यांच्या समस्या जगासमोर मांडण्याचं तिनं मनाशी पक्कं केलं. पत्रकारितेबरोबरच ती झारखंडमधील सिमडेगा आणि खुंटी जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या शिक्षणावर काम करतेय.

पत्रकारिता आणि सामाजिक कामाबरोबरच ती खास ओळखली जाते ती तिच्या संवेदनशील कवितांसाठी. तिची कविताही तळागाळातील समाज, त्यांची संस्कृती, भाषा, त्यावर होणारे प्रहार यावर भाष्य करते. तिच्या कवितेतली भावना वाचकाला स्तब्ध करते. वाचकाच्या मनात एक विचारप्रक्रिया सुरू करते. आपण जे कधी पाहिलं नाही, वाचलं नाही अशा कठोर अनुभवांपाशी तिची कविता आपल्याला घेऊन जाते. अनेकदा ती स्थळकाळाच्या बेड्या तोडून आपलीच होऊन जाते.

‘मातृभाषा के मुँह में ही
मातृभाषा को कैद कर दिया गया
और बच्चे
उसकी रिहाई की मांग करते करते
बडे हो गए
मातृभाषा खुद नहीं मरी थी
उसे मारा गया था
पर, माँ यह कभी न जान सकी…’

कोण जाणो कधीतरी आपल्या मातृभाषेवरही ही वेळ यईल आणि आपल्यापासून दूर असलेल्या झारखंडमधल्या जसिंताची व्यथाही आपलीच होऊन जाईल… म्हणून जसिंताच्या पुरस्कार नाकारण्यामागची भूमिका महत्त्वाची ठरते.

lokwomen.online@gmail.com