“रोहिणी, बरं झालं तू आलीस, मी तुझीच वाट बघत होते.” आज संध्यानं नक्की कशासाठी बोलावून घेतलं हे रोहिणीला समजत नव्हतं. भिशीच्या ग्रुपमध्येही सध्या ती येत नव्हती. मध्यंतरी ट्रीपला जाण्याचं ठरवलं तेव्हाही नव्हतीच. स्वतःच्याच विचारात असायची. सतत कशाची तरी चिंता करत राहण्याचा तिचा स्वभावच होता. सर्व मैत्रिणी तिला ‘काळजीवाहू सरकार’ असंच चिडवायच्या. आज कोणत्यातरी तक्रारींचा पाढा वाचायचा असेल असं वाटतंय, असा विचार करीत असतानाच संध्या चहाचा कप आणि त्यांच्या दोघींच्या आवडीच्या कुकीज घेऊन आली आणि म्हणाली, “आपण मस्त वाफाळलेला चहा घेत गप्पा मारू.”

संध्याचा मूड वेगळाच होता, तिच्या वागण्यातील बदल रोहिणीला जाणवत होता. या काळजीवाहकामध्ये एवढा बदल कसा? याचा विचार करत असतानाच संध्यानं तिला आणखी एक आश्चर्याचा धक्काच दिला.

“अगं, परवाच्या ‘फ्रेंडशिप डे’ ला मी डेटिंगला गेले होते त्याची सर्व मज्जा तुला सांगायची आहे.”

आता मात्र रोहिणी उडालीच, ही आणि डेटिंगला? या वयात?” पण संध्या आपल्याच नादात होती.

हेही वाचा… घरातल्या पुरुष माणसाला बोलवा वृत्ती…

ती बोलत होती आणि रोहिणी नुसतंच ऐकत होती, “ तुला खरं सांगू रोहिणी, त्या दिवसानं मला इतका आनंद दिला की, मी तो खरंच विसरू शकणार नाही. त्याच्या आयुष्यात माझी जागा अजूनही आहे, हे मला माहितीच नव्हतं. त्याच्या सहवासात सगळे गिले शिकवे दूर झाले. मी माझी सर्व दुःखं आणि तक्रारी विसरून गेले. दिवसभर तो माझ्याशी बोलत होता, आमच्या सर्व जुन्या आठवणी सांगत होता, मी ही ते सर्व क्षण पुन्हा पुन्हा अनुभवत होते. त्यानं माझा हात हातात घेतला तेव्हा, त्याचा तो आश्वासक स्पर्श त्याच्या आणि माझ्या प्रेमाची खात्री पटवत होता. मला असं वाटतं होतं की, तो मला विसरला आहे, पण, छे गं, तसं नाहीये, माझीच समजूत चुकीची होती. त्याचं अजुनही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. माझी काळजी आहे. माझ्या आवडी-निवडी त्याच्या लक्षात आहेत. त्या दिवशी, मला जे जे आवडतं ते त्यानं सर्व केलं.”

संध्या भरभरून बोलत होती, अन् रोहिणी अवाक होऊन सर्व ऐकत होती. पण तिला राहवेना, “ अगं, पण तुझा तो जवळचा मित्र आहे तरी कोण? ते तरी सांग”

“राहुल”

“काय? राहुल?”

“असं दचकतेस काय? अगं, माझा मुलगा राहुल. त्याची आणि माझी चांगली मैत्री होती, हेच मी विसरले होते. लहान असताना ‘आई’ ‘आई’ करायचा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला आई लागायची. शाळा संपली, कॉलेजमध्ये गेला, तरीही तेथील गमती जमती मला येऊन सांगायचा. मुली कशा बोलतात, कशा वागतात, मित्रांमध्ये काय चालू असतं हे ही सर्व शेअर करायचा. त्याच्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबत तो बाबांशी कमी, पण माझ्याशी जास्त बोलायचा. ‘तू माझी पहिली मैत्रीण आहेस’, असं म्हणायचा. नंतर शिक्षण, नोकरी यात गुंतला. लग्न झालं, त्याचं स्वतःचं असं स्वतंत्र विश्व निर्माण झालं. त्याच्या व्यापात तो गुंतत गेला. त्याच्या बायकोमध्ये आणि मुलांमध्ये तो रमला आणि मला वाटलं, तो मला विसरला. त्याच्या आयुष्यात आता आईसाठी काहीही जागा नाही. मी उगाचंच काळजी करत होते. पण या ‘फ्रेंडशिप डे’ ला त्यानं मला डेटिंगला नेण्याचं ठरवलं. तो दिवस त्यानं पूर्ण माझ्यासाठी दिला होता. जुन्या आठवणींमध्ये आम्ही रमलो. काही कटू-गोड आठवणी, त्यासाठीच्या तडजोडी आणि त्यातून घडत गेलेला तो. मला पुन्हा एकदा उमगला आणि नव्यानं उमगला.”

हेही वाचा… आहारवेद : थंडावा देणारी चिंच

“तुला खरं सांगू रोहिणी, आपण मुलांसाठी केलेली तपश्चर्या आणि आपण मुलांवर केलेले संस्कार कधीच वाया जात नाहीत. तो सध्या माझ्याशी खूप बोलत नसेलही, पण त्याच्या मनात, आईची जागा कायम आहे याची खात्री पटली.”

“खरं तर मुलं मोठी झाल्यानंतर आपणच त्यांच्यापासून ‘डीटॅच’ व्हायला हवं, आपण मनानं त्यांच्यात गुंतून राहतो आणि अपेक्षा ठेवत राहतो आणि आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर निराश होऊन काळजी करत राहतो, मुलांना आपली किंमत नाही, हे ही आपणच ठरवतो. पण वास्तवाचं भान ठेवून आपणही बदलायला हवं, व्यर्थ चिंता सोडून द्यायला हव्यात हे मी ठरवलं आहे.”

संध्या खूप दिवसांनी मोकळेपणाने बोलत होती. रोहिणीलाही तिच्यातली बदल आवडला. ‘फ्रेंडशिप डे’ च्या निमित्ताने तिला तिचा हक्काचा मित्र परत मिळाला होता.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

smitajoshi606@gmail.com