आपण भारतीयांनी कुटुंब व्यवस्थेची संस्कृती छान जपली आहे. जुन्या काळी तर दोन-तीन पिढ्या एकत्र राहायच्या. अर्थात त्यावेळी असा मोठा अघळपघळ एकत्र बारदाना असण्याची वेगळी कारणं होती. आज ते चित्र अभावानेच दिसतं. आज सर्वत्र चौकोनी वा त्रिकोणी विभक्त कुटुंबं असली तरीही मोठ्या प्रमाणात पंचकोनी, षटकोनी परिवारही आहेतच. सासू सासरे, मुलगा-सून, तरुण दोन अपत्य, आणि अनेक कुटुंबांत नात सूनदेखील आलेली असते. आज जी स्त्री साधारण बावन्न ते पंचावन्न ते साठच्या घरात आहे, तिला एव्हाना सून ( किंवा जावई) आलेली असते /किंवा असतो). अशा वेळी जर घरात त्याहीवरची पिढी सोबत राहात असेल तर तिचा त्यांच्यासोबत सत्तावीस, अठ्ठावीस वर्षांचा किंवा जास्त असा प्रदीर्घ सहवास घडलेला असतो. तीन पिढ्या एकत्र नांदताना विचारांच्या तफावतीचं फार मोठं वादळ झेलून तिची प्रचंड मानसिक ताकद खर्ची पडत असते. अशावेळी दोन्ही बाजूने विशेषतः सुनेच्या बाजूने खूप संयम दाखवण्याची गरज असते. अन्यथा एकत्र राहणं कठीण जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)

प्रकाश राव आणि रागिणीताईंचं उदाहरण पाहू.
रागिणीताई स्वतः बँकेत नोकरी करतात. घरात ऐंशी वर्षांचे सासरे आणि पंचाहत्तरीच्या सासूबाई. दोघंही तसे खुटखुटीत असल्याने घरात (नको तितके) सक्रिय. वयानुसार थोडा हेकेखोरपणा, आपलं करून घेण्याची वृत्ती वाढलेली. आपण सुनेच्या संसारातून थोडेसे विरक्त होऊन तिला निर्णयास वाव द्यावा असा विचार कधीच मनात न आल्याने त्यांची बॅटिंग जोरात सुरूच. इतक्या वर्षांत सतत त्यांच्या मताने सगळं करताना कधी आपलं वय झालं, आणि कधी आपल्याला सून आली ते रागिणीताईंना कळलंच नाही. स्वतःची नोकरी, सगळे सणवार, पाहुण्यांची उस्तवार आणि दुखणीखुपणी यात स्वतःसाठी वेळ काढणं राहूनच गेलं होतं. त्यात स्वतःच्या शरीरात वयानुसार होणाऱ्या बदलांमुळे अधूनमधून त्यांची शारीरिक दुखणी डोकं वर काढू लागली होती.

आणखी वाचा : Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

कामावरून घरी पोचत नाही, तर आजोबांच्या अपेक्षांची यादी तयार. औषध संपलं, चहा हवाय, कामवालीबद्दल तक्रार, काहीतरी सांडून ठेवलेलं, टीव्हीवरील चॅनल नीट दिसत नाही. आत्ताच्या आत्ता केबलवाल्याला बोलाव, एक नाही तर असंख्य तक्रारी आणि कामं तयार. शिवाय दिवसभर आजी घरात कंटाळतात म्हणून संध्याकाळी त्यांना मंदिरात नेऊन सोडा, किंवा कुणा ओळखीच्या स्नेह्याकडे घेऊन जा. कितीही थकून आलं तरीही या गोष्टींना पर्याय नसे. रागिणीताई आणि त्यांचे पती दोघांनाही एकमेकांसाठी फार क्वचित निवांतपणा मिळत असे. स्वयंपाक घरातील डबे आणि भांडी यांच्या जागा सतत बदलणे हा आजीचा आवडता कार्यक्रम असल्याने कुठलीच वस्तू पटकन सापडत नसे. तरीही रागिणीताई शांत असत. दात नसल्याने आजोबांना पातळ भाज्या लागत. आजींना अजिबात तिखट चालत नसे, तर प्रकाशराव आणि चिरंजीवांना चमचमीत जेवण लागे. कामवालीच्या मागे सतत किरकिर करणे हा आजींचा आवडता कार्यक्रम असल्याने तिची सतत रागिणीताईकडे तक्रार असायची. गंमत म्हणजे आजोबांना बाहेर कुठेही जाण्याची आवड नसल्याने ते कधीच इतर नातेवाईक किंवा सख्ख्या भावाकडेही जात नसत. त्यामुळे रागिणीताईंना घरात जराही मोकळेपणा मिळत नसे. रागिणीताईंच्या सूनबाईंना म्हणजे कोमलला काही दिवसांतच आपल्या सासूच्या इतक्या वर्षांच्या त्यागाची कल्पना आली होती. “आई, तुम्ही सलग इतकी वर्षं न थकता आजी-आजोबांशी कसं जुळवून घेतलं हो?” कोमलचा प्रश्न. “घरातील ज्येष्ठ मंडळी ना?, आता या वयात ते काही बदलणार नाहीत, आणि त्यामुळे परिस्थितीही बदलणार नाही हे कळतं, मग आपणच मंत्र म्हणायचा, ‘श्री पेशंसाय नमः’. आपला आनंद आणि विरंगुळा आपणच शोधायचा. मन दुसरीकडे गुंतवायचं म्हणजे त्रास होत नाही. आपला पेशन्स संपला, की घरात वादळ झालंच समज.

आणखी वाचा : Gujarat Election : १६२१ उमेदवार; त्यातील महिला फक्त १३९!

एकदा मी मैत्रिणीला इडली खायला बोलावलं. बघते तर काय, आजोबांनी दही समजून इडलीचं पीठ दह्यात मिसळून टाकलं होतं. म्हणाले, ‘दोन-दोन भांड्यांत दही होतं, मी एकत्र केलं.”
“ बापरे! मग?”
“मग काय, पेशंसाय नमः! मैत्रिणीला दुसरा पदार्थ करून खाऊ घातला.”
“ एकदा ‘इअर एण्ड’ची सारी कामं करून मी थकून घरी आले, तर आजींचे चार नातेवाईक घरात हजर! ते येणार आहेत हे आजी मला सांगायचंय विसरल्या होत्या. मावशीबाई आधीच स्वयंपाक करून घरी गेल्या होत्या. मी काय करू चिडून? त्यांनी काही असं जाणूनबुजून केलं नव्हतं. मग काय, फ्रेश झाले, आणि जास्तीचं जेवण बाहेरून मागवलं. ”
कोमलला आपल्या सासूचं खूप कौतुक वाटलं. दोघी बोलत असताना आतून खळ्ळकन आवाज आला. आजींच्या हातून काचेचं भांडं पडून खाली काचांचे तुकडे पसरले होते. रागिणीताईंचा मुलगा आजीवर ओरडणार, इतक्यात कोमल म्हणाली,
“इट्स ओके! मी आवरते. श्री पेशंसाय नमः! ”
adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship family how to handle elders and old persons in home patience required vp
First published on: 06-12-2022 at 07:42 IST