कधी कधी आयुष्यात एखादा जोपासलेला छंद किंवा आवड, परिस्थितीपायी किंवा अन्य कारणांमुळे तुम्हाला सोडून द्यावी लागते. पुढे आयुष्यात आपण इतके गुरफटून जातो की, आपल्याला अशी काही आवड होती हेच विसरून जातो. पण काहींच्या बाबतीत हाच प्रवास उलटा घडतो. कुठेच काही नसताना आयुष्याच्या एका वळणावर आता जगून झालंय असं वाटत असतानाच आयुष्याचं खरं ध्येय सापडतं. ५३ वर्षीय रितू नरसिंघानी यांचा असाच काहीसा प्रवास आहे. सर्वसामान्य गृहिणी पासून ते नृत्यांगनेपर्यतचा.
शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं,असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो. लहानपणी मनात कुठेतरी दडून राहिलेलं स्वप्न, आयुष्याच्या एका अकल्पित वळणावर संधी मिळताच प्रत्यक्षात उतरलं. इतकचं नाही तर स्वत:ची नवी ओळख बनवित आणि एक वेगळेच आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात झाली. ही कहाणी आहे रितू नरसिंघानी या ५३ वर्षीय महिलेची…
आपल्या प्रवासाविषयी सांगताना रितू म्हणतात, ‘‘उल्हासनगर येथील एका सर्वसामान्य सिंधी परिवारात माझा जन्म झाला. आई शाळेत शिक्षिका आणि वडील एका खासगी कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. लहानपणापासून नृत्याची आवड होती. मी शाळेत आणि सोसायटीच्या नृत्याच्या कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होत असे. तिची ही आवड बघून ती आठवीत असताना एका नृत्याच्या क्लासमध्ये प्रवेश घेतलाही होता. पण हा क्लास घरापासून थोडा लांब होता. साधारण ३०-३५ वर्षापूर्वी ने-आण करण्यासाठी आजच्या सारखी प्रगत साधने उपलब्ध नव्हती, त्यामुळे क्लासचा नाद सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले गेले.
पुढे रसायनशास्त्र हा विषय घेऊन बीएसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर एक-दोन वर्ष नोकरी केल्यानंतर १९९४ साली लग्न झाले. मग मुलगा झाला. सासरी एकत्र कुटुंब पद्धतीचे वातावरण असल्यामुळे बराचसा वेळ हा घरकामातच जात असे. बघता-बघता इतर स्त्रियांप्रमाणे मीदेखील एक गृहिणीचे जीवन जगू लागले. काही वर्षानी एकत्र कुटुंबातून निराळे होत आम्ही आमचे आयुष्य जगू लागलो. माझा मुलगा जेव्हा बारावी झाला, त्यानंतर मला बराचसा वेळ मिळू लागला. लहानपणापासून माझा ओढा अध्यात्मिक गोष्टींकडे असल्यामुळे त्या क्षेत्रात काही करावे असे वाटत होते. त्यावेळी नवऱ्याने सहज सुचविले की, नुसतचं देव-देव करण्यापेक्षा नवीन एखादी गोष्ट शिक. जे करताना तुला आनंद मिळेल.
आता इतक्या वर्षानंतर काय नवीन शिकायचं हा प्रश्न होता. खूप विचार केल्यानंतर अचानक मनात विचार आला नृत्य शिकलो तर. मग या बाबतीत बरेच संशोधन करून घराजवळच असलेल्या एका नृत्यालयात प्रवेश घेतला- ते देखील वयाच्या ४४ व्या वर्षी. सुरुवातीला छंद म्हणून नृत्याकडे पाहात होते. पण माझ्या गुरू गिरीजा नायर आणि विमी सचदेव यांनी ज्या पद्धतीने मला प्रशिक्षण दिले, त्यामुळे नृत्य हा विषय माझ्यासाठी छंद म्हणून न राहता एक अभ्यासाचा विषय बनला. त्यामुळे आता भरतनाट्यममध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे असा कौल मनाने दिला. तेव्हा गीता नृत्य विद्यालय, मुलुंड येथे प्रवेश घेतला.
सुरुवातीला नृत्य शिकणं थोडसं आव्हानात्मकच होतं. शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त होते, पण चेहऱ्यावर जाणीवपूर्वक त्या त्या पद्धतीचे भाव आणणं, हे थोडंसं कठीण जात होतं. कोऱ्या पाटीवर एखादी गोष्ट सहजपणे मांडता येते. इतक्या वर्षानंतर ते भाव, मुद्रा साकारताना आजूबाजूच्या मुली हसतील का? आपल्याला ते जमेल का? अशा अनेक शंकाकुशंका मनात येत होत्या. माझी ही अवस्था ओळखून माझ्या दोन्ही गुरूंनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. झोकून नृत्य करायला शिकविले. मनातली ही भीड चेपल्यानंतर नृत्य ही माझ्यासाठी अतिशय सहज गोष्ट झाली. इतकी की नृत्याच्या परीक्षा देताना देखील त्याचा ताण असा कधी जाणविला नाही. किंबहुना यामुळेच मी नृत्याच्या पाचही लेखी परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
आपल्या नृत्य प्रवासाविषयी भरभरून सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘सुरुवातीला पाच वर्षे म्हणजे खूप मोठा काळ वाटत होता. पण जसजसे प्रशिक्षण सुरू झाले तसतसा हा काळ कसा भुर्रकन गेला तेच समजले नाही. यात घरच्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. घरातली सर्व कामे आटपून नृत्याच्या सरावाला जाताना, पाय थिरकायला लागले की सारे कष्ट आपोआप विसरायला होत. एक वेगळीच ऊर्जा मिळायची.’’
याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, ‘‘तुम्हाला पदवी मिळवायची असेल तर रंगमंचावर सादरीकरण हे करावे लागते. यात सलग तीन तासांचा आविष्कार सादर करावयाचा असतो. यानुसार तयारीला सुरुवात झाली होती. पण कायर्क्रमाच्या आठ दिवस आगोदर मी अचानकपणे आजारी पडले. इतकी की रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यावेळी घरचे आणि माझ्या दोन्ही गुरू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि मलाही मानातून असं वाटलं की, तू हे पूर्ण करणार आहेस. आणि जेव्हा प्रत्यक्ष रंगमंच सादरीकरणाचा सलग तीन तासांचा कार्यक्रम सादर केला, तेव्हा तो माझ्या आजवरच्या आयुष्यातला सर्वात सोनेरी असा क्षण होता. इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आल्याचा तो अनुभव होता.शास्त्रीय नृत्य हा असा प्रकार आहे, जेव्हा तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरतात, तेव्हा तुमचं थेट कनेक्शन एका वैश्विक शक्तीशी सहज निर्माण होते. ज्या अध्यात्माच्या मी शोधात होते, ते मला नृत्यातून सापडले. आज या नृत्याने नुसताच आत्मविश्वास दिला नाही तर माझी स्वत;ची अशी एक खास ओळख जगाला करून दिली.suchup@gmail.com