डॉ. स्वाती अजित गायकवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ
मला कधी कधी पुस्तकांची नावं आठवत नाही, इतकंच काय तर कधी कधी लोकांची नावंही विसरायला होतंय. मी क्षणात आनंदी असते तर पुढचा क्षण माझ्यासाठी चिडचिडीचा असतो. मला झोप येत नाही… मी रात्रभर जागी असते, कधी तर पहाटे तीन वाजता मी उठून बसलेली असते… आणि यामागे आहे मेनोपॉज… रजोनिवृत्ती… माझ्यातील हार्मोनल बदलांचा काळ… अनेकांनी ट्विंकल खन्नाच्या या वक्तव्याची अनेक पुरुषांनी टिंगल टवाळीही केली… पण खरंच बायकांसाठी मनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीचा काळ हा वेदनादायी असतो. आणि घरातल्या प्रत्येकाने विशेषत: पुरुषांनी स्त्रिंयांचा हा काळ समजून घेतला पाहिजे.
रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना करावा लागतो शारीरीक व मानसिक बदलांचा सामना
रजोनिवृत्ती अथवा मेनोपॉज ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. साधारणतः ४० ते ५० या वयात महिलांना या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. महिलांसाठी राजोनिवृत्तीचा टप्पा आव्हानात्मक ठरतो. यात त्यांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तीचा महिलेच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम महिलांच्या भाविनिक व शारीरीक आरोग्यावर होतो.
रजोनिवृत्ती काळात महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येणे, व्हजायनल ड्रायनेस, हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणे, शांत झोप न येणे, सतत मूड स्विंग्ज, वजन वाढणे, मेटाबॉलिजम कमी होणे, वाढती केसगळती, अनियमित हृदयाचे ठोके, डोकेदुखी, चिडचिड होणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे यांसारख्या अशा समस्या आढळून येतात. रजोनिवृत्तीची लक्षणे सर्वांसाठी सारखी नसतात आणि ती व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्ती दरम्यान मूड स्विंग्ज किंवा हॅाट फ्लॅश यासारखी तीव्र लक्षणे जाणवतात, त्यांची तीव्रता बदलू शकते. काही स्त्रियांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
मूड स्विंग्ज – रजोनिवृत्तीमध्ये महिलांना मूड स्विंग्सचे प्रमाण जास्त आहे. यावेळी एखादी स्त्री एका क्षणी अचानक अत्यंत दु:खी तर दुसऱ्या क्षणी आनंदी होऊ शकते. याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हॉट फ्लॅश : रजोनिवृत्ती दरम्यान हॉट फ्लॅश ही सर्वात सामान्य समस्या आहे. यामुळे अचानक उष्णतेची भावना निर्माण होते. जी छाती, मान आणि चेहऱ्यावर सर्वात तीव्र प्रमाणात असते. यालाच हॉट फ्लॅश म्हणतात. यामध्ये शरीराचं तापमानात अचानक वाढतं. त्याचबरोबर अचानक छातीत धडधड वाढते.
मेंदूवर परिणाम : रजोनिवृत्ती दरम्यान केवळ भावनिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. शरीरातील इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडते. यामुळे महिलांना स्मृती संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल झाल्यामुळे विचार करण्याची गती कमी होऊ शकते व त्यामुळे अनेक अडचणींचा समाना करावा लागू शकतो.
रात्रीच्या वेळी जास्त घाम येणे : रजोनिवृत्ती दरम्यान रात्रीच्या वेळी जास्त घाम येतो. अशावेळी शरीर पूर्णपणे घामानं भिजून जातं. यामुळे शांत झोप घेणे कठीण होते. याचा त्या महिलेच्या उर्जापातळीवर आणि मनस्थितीवर विपरीत परिणाम होतो.
रजोनिवृत्तीच्या काळात महिलांत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे नैराश्य आणि चिंता येऊ शकते. शारीरिक बदल जसे की वजन वाढणे किंवा त्वचेतील बदल, यामुळे आत्मविश्वास खालावू शकतो. कुटुंबातील आणि समाजातल्या अपेक्षांमुळे महिलांमध्ये तणाव वाढू शकतो. रजोनिवृत्तीस सुरुवात झाल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात असंख्य बदल होतात. ‘ऑस्टिओपोरोसिस’सह संधिवात, सांधेदुखीची जोखीम वाढते. रजोनिवृत्तीनंतरच्या टप्प्यात या विकारांत अनेक पटींनी वाढ होते.
स्त्रीच्या अंडाशयात निर्माण होणारे संप्रेरक तिच्या हाडांचे आरोग्य निश्चित करते. वयाच्या २५ ते ३० वर्षांपर्यंत स्त्रीशरीरातील हाडांचे आरोग्य उत्तम असते. या काळात तिचे योग्य पोषण झाले नाही ही, तर ही हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते. जेव्हा रजोनिवृत्तीचा टप्पा सुरू होतो, तेव्हा अशा स्त्रियांना उतारवयात ‘ऑस्टिओपोरोसिस’सह इतर अस्थिविकारांना सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन पातळीमध्ये अचानक घट झाल्यामुळे हाडांचे नुकसान होते, हाडांची रचना कमकुवत होते आणि हाडं तुटणे आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांचा धोका समजून घेणे आणि योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
