संपदा सोवनी

मासिक पाळीत कोणताही त्रास होत नाही अशी स्त्री कदाचित सापडणारच नाही! कारण ओटीपोटात दुखणं, क्रॅम्प्स् येणं, कंबर दुखणं, ब्लोटिंग, भूक कमी होणं, मूड बिघडलेला असणं, थकवा येणं, यातलं काही ना काही (कधी कधी सगळीच!) लक्षणं आणि याशिवयाही आणखी काही लक्षणं स्त्रियांना या चार-पाच दिवसांत जाणवत असतात. मासिक पाळी टाळता येत नसली, तरी ती सुसह्य होण्यासाठी रोजच्या जीवनात पाळण्याजोग्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही लक्षणे कमी होतील असा काही दावा नाही. पण ती तुम्ही सहन करू शकाल इतपत पाळी सुसह्य होण्यासाठी मदत नक्कीच होईल.

पाळीच्या दिवसांत गरम पाण्यानं आंघोळ करा

आंघोळ केल्यामुळे केवळ पाळीच्या दिवसांत ‘इंटिमेट हायजीन’ पाळण्यासाठीच मदत होते असं नाही. शरीराला सुखद वाटेल अशा गरम पाण्यानं आंघोळ केल्यामुळे शरीर ‘रीलॅक्स’ होतं. शरीराबरोबर मनालाही ताजंतवानं वाटतं. इतकंच नव्हे, तर कंबर आणि पाठ दुखत असेल, तर त्यापासून आराम मिळावा यासाठी ही अगदी साधी टिप आहे.

सॅनिटरी पॅड काही तासांनी नक्की बदला

सॅनिटरी पॅड काही तासांनी बदलणं फार आवश्यक आहे. केवळ त्या पॅडची क्षमता संपून ‘लीकेज’चा धोका निर्माण होईल एवढ्यासाठीच नव्हे, तर एकच सॅनिटरी पॅड तासंतास वापरल्यामुळे ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’चा धोका असतो. शिवाय त्या ठिकाणच्या त्वचेवर रॅश येण्याचीही शक्यता निर्माण होते. एक सॅनिटरी पॅड शक्यतो ६ ते ८ तासांपेक्षा अधिक वेळ वापरू नये, असं या विषयातले व्यावसायिक सांगतात. पाळी संपताना जेव्हा ‘हेव्ही ब्लीडिंग’ होत नसतं- उदा. तिसऱ्या, चौथ्या वा पाचव्या दिवशी कमी रक्तस्त्राव होतो, तेव्हाही स्त्रिया काळजी घेण्यासाठी सॅनिटरी पॅड वापरतात. अशा वेळीही ६ ते ८ तासांनी पॅड बदलणं लक्षात ठेवा. जास्त रक्तस्त्राव झालेला नसला तरीही. सॅनिटरी पॅडचं जे मटेरिअल असतं, त्याला योनीस्त्रावामुळे ओलसरपणाची जोड मिळते. अशा वेळी त्यावर जीवाणूंची वाढ होणारच, हे लक्षात घ्या. त्यासाठी पॅड ठरावीक वेळानं बदलणं हा प्रतिबंधक उपाय ठरेल. सॅनिटरी पॅड योग्य वेळी बदलल्यामुळे तुम्हाला पाळीच्या दिवसांत चिंतामुक्त राहायला मदत होईल.

योग्य कपडे निवडा.

पाळीच्या दिवसांत फार घट्ट कपडे घालणं योग्य नाही. खूप घट्ट, ‘लो-वेस्ट’ जीन्स किंवा स्पँडेक्स कापडाच्या घट्ट बसणाऱ्या जाड ट्राउझर्स या दिवसांत तरी नकोच. तुम्हाला ज्यात बांधल्यासारखं वाटणार नाही आणि ‘कंफर्टेबल’ वाटेल असेच कपडे निवडा. शक्यतो कॉटनचे सैलसर कपडे बाहेर व घरात असताना घालायला चांगले. तर अंतर्वस्त्रं होजिअरीच्या कॉटन कापडाची व मापात बसणारी घातलेली उत्तम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दैनंदिनीत सकारात्मक बदल करा.

मासिक पाळीत (आणि खरंतर पाळी सुरू नसतानाही) आरोग्याच्या दृष्टीनं आपली दैनंदिनी चांगली हवी. पुरेशी- म्हणजे ७ ते ८ तासांची शांत झोप घेणं, शक्यतो घरीच बनवलेला, चौरस आहार घेणं, आहारात भाज्या आणि फळांचा समावेश जरूर करणं, लक्षात ठेवून पुरेसं पाणी पिणं आणि स्ट्रेचिंग किंवा चालायला जाण्यासारखे काही साधे व्यायाम तरी जरूर करणं, हे पाळीच्या दिवसांत नक्कीच उपयुक्त ठरेल. दिनक्रम आरोग्यदायी असेल, तर पाळीच्या काळात दिसणारी ओटीपोटात दुखणं, क्रॅम्प्स् , कंबरदुखी, थकवा व निरुत्साह जाणवणं, ब्लोटिंग, अशी लक्षणं कमी व्हायला मदत होईल आणि तुमचा मूड सुधारून पाळीचा काळही इतर दिवसांप्रमाणेच व्यतीत करणं शक्य होईल.