“अंकित. या गणेशोत्सवासाठी आपण गणपतीसाठी नवीन डेकोरेशन घेऊन येण्यापेक्षा घरीच काहीतरी वेगळं करू. पडदे, मोत्यांच्या माळा आणि फुले मी घेऊन येईन, पण यावेळेस मला थोडी मदत करशील? मला गौरी आगमनाचीही तयारी करायची आहे.”

“नीता, मी तुला किती वेळा सांगितलं, तुला जमेल तेवढं कर. मला जमेस धरू नकोस. मला वेळ नाहीये. माझ्या ऑफिसमध्ये काही महत्वाच्या मिटिंग्स् आहेत. आणि तसंही मला हे सगळं आवडत नाही. हे तुलाही चांगलं माहिती आहे. तुझ्या हौसेखातर आपण घरात गौरी-गणपती सुरू केले आणि दरवर्षी सर्व तूच करतेस. तुला जमत नसेल तर आपण हे सगळं बंद करू.”

हेही वाचा – जिल्ह्यात पहिल्यांदाच मिळवला कुस्तीपटूचा सन्मान अन् झाली ‘कुस्ती किंग’; बिहारमधील प्रीती कुमारी आहे तरी कोण?

“अंकित, अरे घरात असे सण समारंभ असले की उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. मुलांवर चांगले संस्कार होतात. घरातही छान आणि पवित्र वाटतं. ही प्रथा बंद कशाला करायची? मी फक्त तुझी थोडी मदत मागतीये. बाकी मी सगळं करतेच आहे ना?”

“तुला जे करायचं ते कर. सण समारंभ जोपर्यंत जमेल तोपर्यंत कर. माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस. मला माझी कामं आहेत. मी निघालो.” अंकित खरोखरच घरातून बाहेर निघून गेला. नीता फारच नाराज झाली. दरवेळेस हा असाच करतो. तो नास्तिक आहे हे तिला लग्नानंतर लगेचच लक्षात आलं होतं. सण समारंभ साजरे करणे, घराची सजावट करणं, नातेवाईक, मित्रमंडळी यांना घरी बोलावणं हे सर्व करायला तिला खूप आवडायचं, पण घरात काहीही असलं तरी अंकित घरात रस घ्यायचा नाही. पाहुण्यासारखा ऐनवेळी यायचा. सर्वांच्यात मिसळायलाही त्याला आवडायचं नाही.

सुरुवातीला नीताला याचा खूप त्रास झाला. अनेकदा त्यांचं यावरून भांडण झालं, तिने अबोला धरला, पण अंकितमध्ये काहीही बदल झाला नाही. शेवटी तिनं याबाबत बोलणं बंद केलं, पण आता अनिष ८ वर्षांचा झाला. तो बाबाचं अनुकरण करतो हे नीताच्या लक्षात आलं. म्हणूनच त्यानं आतातरी बदलायला हवं असं तिला वाटतं होतं. त्याच्या या अशा वागण्याचं काहीतरी करायलाच हवं म्हणून तिने आज सुषमा काकूंशी बोलायचं ठरवलं. त्या अंकितच्या लांबच्या नातेवाईक होत्या, पण मानसशास्त्राच्या अभ्यासक होत्या. त्यांच्याकडे गेल्यावर तिनं अंकितच्या वागण्याबद्दल सांगितलं आणि विचारलं, “काकू, अंकितने आयुष्याचा आनंद घ्यावा, माझ्यासोबत एन्जॉय करावं, छोट्या छोट्या गोष्टींतून मी जसा आनंद मिळवते तसं त्यानंही मला साथ द्यावी असं मला वाटतं, पण तो तसा वागत नाही. अंकितचा स्वभाव असा का ?”

हेही वाचा – Success Story : मिसेस इंडिया स्पर्धेने बदललं आयुष्य! एकेकाळी विकले चाकू; वाचा अब्जावधीची कंपनी उभारणाऱ्या चिनू कालाची यशोगाथा

सुषमा काकूंनी तिचं सर्व ऐकून घेतलं आणि त्या म्हणाल्या, “नीता, अंकित असा का वागतो? याचं उत्तर शोधायचं असेल तर तुला त्याच्या बालपणात डोकवावं लागेल. त्याचे आई-वडील तो लहान असतानाच एका अपघातात गेले. त्याच्या काका काकूंकडे तो वाढला. त्याला ठेवून घेणं त्याच्या काकूला अजिबातच आवडलं नव्हतं. त्यांची मुलं अंकितपेक्षा लहान होती. काकू त्याला मुलं सांभाळायला लावायची, घरातील कामं त्याच्याकडून करून घ्यायची, थोडंसं काही झालं तरी, “तू मोठा आहेस, तुला कळत नाही का?” असं बोलायची. काही चुकलं तरी त्याला ओरडा बसायचा, मार खावा लागायचा अशा दहशतीखाली त्याचं बालपण हरवून गेलं. तो अकाली प्रौढ झाला. त्यामुळं त्याची मानसिकता तशीच तयार झाली. लहानपणी आपण छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद घेत असतो आणि त्यामुळं मोठं झालं तरी त्या गोष्टी आपल्या मनात कायम राहिलेल्या असतात. लहानपणी हे अनुभव न मिळाल्यानं तो मोठेपणीही व्यवहारी वृत्तीनं वागू लागला. सण समारंभातील आनंद त्यानं कधीच घेतला नाही. पाहुणे आले तरी त्याला कोणत्या तरी कारणानं बोलणी खावीच लागायची, त्यामुळं कोणी घरी आलेलं त्याला मनापासून आवडायचंच नाही. त्याच्या लहान वयात त्यानं खूप गोष्टी सहन केल्या आहेत, म्हणूनच त्याचा स्वभाव असा झाला आहे. तो असा का वागतो, याचं कारण तुला समजलं की, त्याला समजावून घेणं तुला सोपं जाईल. याही परिस्थितीत बदल होईल, पण ही गोष्ट अंकितला वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे, त्यासाठीही आपण निश्चित प्रयत्न करू.”

काकूंशी सर्व काही बोलून झाल्यावर नीताला खूप हलकं वाटलं अंकितवरील राग कमी झालाच, पण स्वतःमध्ये कोणते बदल करायचे हेही तिला समजले.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smita joshi606@gmail.com)