– डॉ. किशोर अतनूरकर

आपलं वजन वाढत असेल तर हे वाढत जाणारं वजन थायरॉइडच्या समस्येमुळे असू शकतं का? या प्रश्नाचं थेट उत्तर, ‘हो’, असू शकतं, किंबहुना वजन वाढणं हे थायरॉईड विकाराचं लक्षण असू शकतं, असं आहे. मात्र याचा अर्थ वजन फक्त थायरॉइडच्या समस्येमुळेचं वाढतं का? या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. ‘हे बघा, तुम्हाला तुमची गुडघेदुखीची समस्या आटोक्यात ठेवायची आहे ना? मग अगोदर तुमचं वजन कमी करा,’ असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एखादी रुग्ण म्हणते, ‘डॉक्टर, मी वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करते, पण मला थायरॉईड आहे ना, त्यामुळे माझं वजन कमी होत नाही.’ रुग्णाच्या या म्हणण्यात किती तथ्य आहे? थायरॉइडच्या समस्येचा आणि वाढत जाणाऱ्या वजनाचा नक्की संबंध कसा आहे हे समजून घेतल्यास मनातील हा गोंधळ कमी होईल.

आहारावर नियंत्रण नसेल आणि व्यायामाचा आभाव असेल तर शरीरात अतिरिक्त चरबी किंवा फॅट जमा झाल्यामुळे वजन वाढत असतं हे सर्वांना माहिती आहे. या कारणांमुळे वाढणारं वजन आणि थायरॉइडची समस्या असल्यामुळे वाढणारं वजन यात फरक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
थायरॉईड नावाची ग्रंथी (Gland) ही प्रत्येकाच्या शरीरात, स्वरयंत्राच्या खाली, मानेच्या पुढच्या बाजूस स्थित असते. या ग्रंथीचं काम म्हणजे Thyroxine हे हॉर्मोन किंवा संप्रेरक तयार करणं. या संप्रेरकाच्या कार्यामुळे शरीरात चयापचय घडून येत असतं. चयापचयाला वैद्यकीय परिभाषेत मेटॅबॉलिझम (metabolism) असं म्हणतात. आपण रोज जे जेवण करतो, त्या अन्नापासून ऊर्जा किंवा energy तयार होत असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, ही तयार झालेली ऊर्जा शरीरातील प्रत्येक पेशीत ‘ढकलून’ त्या पेशींकडून त्यांना नेमून दिलेलं काम करून घेण्याचं काम थायरॉईड हॉर्मोन करत असतं. शरीराच्या चयापचयातून निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग योग्य पद्धतीनं व्हावं याचं नियंत्रण थायरॉईड हॉर्मोनच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. शरीरासाठी दिवसभर लागणारी ऊर्जा नियोजनबद्ध पद्धतीनं वापरून शरीराचं वजन संतुलित ठेवण्याच्या कार्यात मोलाचा सहभाग थायरॉईड हॉर्मोनचा असतो. शरीरात ऊर्जा तयार होते, पण त्याचा उपयोग जर संतुलित प्रमाणात होत नसेल तर वजनावर परिणाम होणारच.

हेही वाचा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नारीशक्ती

एखाद्याला असा अनुभव असेल की गेल्या काही महिन्यांत वजन वाढतंय पण त्याचं नक्की कारण जर स्पष्टपणे सांगता येत नसेल तर रक्तातील थायरॉईड हॉर्मोनच्या पातळीची तपासणी करा कदाचित, थायरॉइडची समस्या असू शकते, असं डॉक्टर सांगतात. या संप्रेरकाची (Thyroid Hormone) निर्मिती नैसर्गिकरित्या सुरळीत चालू असेल तर शरीराचं कार्य व्यवस्थित चालू राहील. काही कारणांमुळे निर्मितीचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होत असल्यास त्या परिस्थितीला Hyperthyroidism आणि कमी प्रमाणात होत असल्यास Hypothyroidism असं म्हणतात. Hyperthyroidism मध्ये ऊर्जा जास्त ‘खर्च’ होत असल्यामुळे वजन कमी होईल, उलट Hypothyroidism मध्ये कमी ऊर्जा उपयोगात येत असल्यामुळे वजन वाढेल.
रक्त तपासणीनंतर Thyroid Stimulating Hormone (TSH) चं प्रमाण वाढलेलं असल्यास त्या रुग्णास Hypothyroidism आहे असं निदान केलं जातं. स्त्रियांचं स्त्रीपण जपणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्सचा आणि थायरॉईड हॉर्मोनचा जवळचा संबंध असल्यामुळे थायरॉईड हॉर्मोनच्या समस्या या स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळतात असंही समजलं जातं.

सर्वसामान्य कारणांमुळे वाढणारं वजन आणि थायरॉइडच्या समस्येमुळे वाढणाऱ्या वजनाच्या प्रक्रियेत फरक आहे. थायरॉइडची समस्या असणाऱ्या रुग्णात वजन दोन प्रमुख कारणांनी वाढत असतं. एक म्हणजे, Hypothyroidism असताना, शरीरात ऊर्जा तयार होत असून देखील तिचा वापर कमी होत असल्यामुळे त्या स्त्रीच्या दैनंदिनीत एक प्रकारची शिथिलता येते. कोणतंही काम करायचं म्हटलं की तिला कंटाळा येत असतो, त्यामुळे तिची चिडचिड होत असते. कार्यक्षमता कमी आणि आहार नेहमीचा त्यामुळे वजन वाढण्यात भर पडते आणि दुसरं म्हणजे, Hypothyroidism असताना, शरीरात अनेक जीवरासायनिक बदल घडत असतात. त्यात शरीरात सोडियम आणि पाणी ‘धरून ठेवणारे’ चिकट, जेलीसारखे पदार्थ दोन पेशींच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म जागेत जमा होतात. यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊन रुग्णाच्या हातापायावर, चेहऱ्यावर सूज येते. वजन वाढण्यासाठी ही जीवरासायनिक प्रक्रिया देखील जबाबदार असते. अशा प्रकारे, थायरॉइडची समस्या असणाऱ्या, विशेषतः Hypothyroid (TSH ची पातळी वाढलेली परिस्थिती) स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचं कारण अतिरिक्त फॅट आणि थायरॉईड संबंधित शरीरातील जीवरासायनिक बदल या दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत असं म्हणता येईल. Hypothyroidism साठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या घेतल्यानंतर निर्माण झालेले हे जीवरसायनिक बदल कमी होऊन वजन काही प्रमाणात कमी होईल, पण अतिरिक्त चरबी जमा होऊन वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीशी संबंधित बदल करावे लागतील.

हेही वाचा – कोण होती पहिली भारतीय ‘स्टंटवूमन?’ का म्हटले जायचे तिला ‘हंटरवाली’? जाणून घ्या ही माहिती

सारांश काय? तर थायरॉइडच्या समस्येमुळे फार तर ४ ते ६ किलो वजन वाढू शकतं. हे वाढलेलं वजन थायरॉईडसाठी केल्या जाणाऱ्या उपचाराने कमी होऊ शकतं. वजन कमी होत नाही याचं खापर प्रत्येक वेळी थायरॉइडच्या डोक्यावर फोडण्याची गरज नाही. थायरॉईडच्या समस्येव्यतिरिक्त देखील लठ्ठपणाची अनेक कारणं असू शकतात. वजन कमी करण्यासाठी, आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायामाला पर्याय नाही, याचा विसर पडू नये.

(लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com

पीएच डी ( समाजशास्त्र )

एम एस ( काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी )

Email: atnurkarkishore@gmail.com