‘वर्क फ्रॉम होम’चा काळ संपून ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू झाल्यानंतर अनेक स्त्रिया पुन्हा नोकरीवर रुजूच झालेल्या नाहीत, अशा बातम्या तुम्ही नुकत्याच वाचल्या असतील. या सर्व स्त्रिया उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या आहेत. मग असं नेमकं काय घडलं असेल या स्त्रियांच्या आयुष्यात, ज्यामुळे त्यांना केवळ ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू झाल्यामुळे नोकरीच सोडून द्यावी लागली?…
करोना २०२० मध्ये आला आणि टाळेबंदीच्या पहिल्या तडाख्यानं सर्वजण सैरभैर झाले. इतर कामांप्रमाणेच ऑफिसची कामंही कर्मचाऱ्यांनी घरूनच करावीत असा फतवा आला. ‘वर्क फ्रॉम होम’ची कंपन्यांच्या दृष्टीनं असलेली सोय बहुसंख्य स्त्रियांना सुरूवातीला पसंत पडली नाही. कारण ऑफिसचं आणि टाळेबंदीमुळे हाताशी मदतनीस नसल्यानं घरातलंही काम, त्याबरोबरच घरात बसून बसून ‘बोअर’ होणाऱ्या मुलांच्या (आणि मोठ्यांच्याही) कलानं घेत त्यांना सांभाळणं खूप स्त्रियांना त्रासाचं झालं. पण यात त्यांनी हळूहळू आपलं एक ‘रूटीन’ बसवलं.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घरातल्या मदतनीस स्त्रिया कामावर येऊ लागल्या आणि घरच्या स्त्रीला हायसं वाटलं. आता ऑफिसचं काम घरून पूर्ण क्षमतेनं करणं त्यांना सोपं झालं. शहरांमध्ये प्रचंड ट्रॅफिकमधून लांब लांब असलेल्या ऑफिसेसमध्ये जाण्यायेण्यासाठी लागत असलेला त्यांचा वेळ वाचत असल्यामुळे हाताशी आता मिळालेल्या मोकळ्या वेळाचा त्या स्वत:साठी काही प्रमाणात का होईना, पण उपयोग करायला लागल्या. काहींनी आपल्याच क्षेत्रातले नवीन पार्टटाईम कोर्सेस ऑनलाईन सुरू केले, तर काहींनी राहून गेलेले छंद जोपासायला सुरूवात केली. मात्र आता अनेक कंपन्या ‘वर्क प्रॉम होम’ बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ पूर्ववत करायला सांगत आहेत. खूपशा नोकरदार स्त्रिया यामुळे नाराज आहेत.
पुरूषांना ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू झाल्यानं स्त्रीच्या तुलनेत कमी फरक पडतो. कारण आपल्याकडे बहुतेक घरांमध्ये पुरूषांवर घरातल्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या नसतात. फारच कमी पुरूष या जबाबदाऱ्या स्वत: समजून उमजून वाटून घेतात. हाताशी मदतनीस स्त्रिया असल्या, तरीही त्यांना कामं वाटून देणं, स्वयंपाकात काय हवं-नको ते पाहणं, वाणसामान, भाजीपाला आणणं, मुलांचा अभ्यास घेणं, अनेकदा त्यांना शाळेत, क्रिडांगणात सोडणं आणि आणणं, सासू-सासऱ्यांना व आई-वडिलांना काय हवं-नको पाहणं, अशा अगणित जबाबदाऱ्या आपल्या समाजरचनेत प्रामुख्यानं विवाहित स्त्रियांवर टाकलेल्या आहेत. त्या पार पाडून आपलं करिअर घडवताना, आपल्या क्षेत्रात सतत ‘अपडेटेड’ राहताना त्यांची अक्षरश: दमछाक होते. ती दमछाक ‘वर्क फ्रॉम ऑफिस’मुळे परत सुरू होणार आहे.
या इतर घरगुती जबाबदाऱ्यांचं ओझं अनेकदा इतकं जास्त असतं, की त्यामुळे अनेक जणींना आपल्या करिअरवर पाणी सोडावं लागल्याची उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो. तो ट्रेण्ड पुन्हा काही प्रमाणात दिसू लागला आहे. पुन्हा ऑफिसला जाऊन काम करायला सांगितलेल्या स्त्रिया मोठ्या संख्येनं नोकरीच सोडून देत असल्याची चर्चा सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात रंगली आहे.
तुम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’ संपवून ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ करायला सांगितलंय का? कसा आहे तुमचा वैयक्तिक अनुभव? ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ डोईजड झाल्यानं करिअरवरच गदा येईलसं वाटतंय का? की तशी आलीच आहे?…
मग आम्हाला कळवा. तुमचा स्वत:चा, खराखुरा अनुभव. मराठीत आणि ४०० शब्दांत, lokwomen.online@gmail.com या मेल आयडीवर. मेल करण्याची शेवटची तारीख आहे ७ जुलै.
तुम्हाला इच्छा असेल, तर या अनुभवाबरोबर तुमचा एक फोटोसुद्धा पाठवा. यातील निवडक अनुभव नाव व छायाचित्रासह लोकसत्ताच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.