दिल्लीची रहिवासी असलेल्या प्रज्ञा हिने लिंकडिनवर केलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत ठरली आहे. आणि या निमित्ताने पुन्हा एकदा तरुण नोकरदार स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. तर काय म्हटले आहे तिने या पोस्टमध्ये, ती म्हणते की, एका कंपनीच्या मुख्य मार्केटिंग अधिकारी या पदासाठी तिची सुमारे १४ मिनिटांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये पहिली ११ मिनिटे तिचा परिचय देण्यात गेला आणि उरलेल्या तीन मिनिटांमध्ये तिच्या कामाविषयी फारसे न विचारता, तिच्या वैयक्तिक जीवनावर अधिक प्रश्न विचारण्यात आले.

जसे- तिच्या नवऱ्याचा व्यवसाय कसा सुरू आहे? मुलं किती वर्षांची आणि कोणत्या शाळेत जातात? घरी त्यांना कोण सांभाळतं… यांसारखे प्रश्ने विचारण्यात आली. अर्थात या प्रश्नांवरूनच तिला अंदाज आला होता की, ही नोकरी काही आपल्याला मिळणार नाही. तिने दुसऱ्या दिवशी त्या कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी निव्वळ लहान मुलं आहेत म्हणून ही नोकरी नाकारण्यात येत आहे, असे कारण सांगण्यात आले.

घर चालवायचे असेल तर पती-पत्नी या दोघांनी अर्थार्जन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. लग्नानंतर मुलं झाली की स्त्रीला नोकरी किंवा व्यवसाय करावयाचा असेल तर तिच्या पाठीशी एखादी सपोर्ट सिस्टीम असणं आवश्यक असतं. जसे- एखादे सुसज्ज पाळणाघर अथवा तिच्या अनुपस्थितीत मुलांना शाळेत ने-आण करण्यापासून ते त्यांचे खाणंपिणं, अभ्यास व इतर छंद वर्ग सांभाळणे वगैरे…

बरीचशी जोडपी आपापल्या परिस्थितीनुसार यावर मार्ग काढत असतात. बऱ्याचदा असे आढळून येते की, स्त्रिया पूर्णवेळच्या ऐवजी अर्ध वेळ काम करण्याच्या संधी शोधतात किंवा घर सांभाळून छोटासा व्यवसाय करता येईल असेही बघतात. किंवा शिकवणी घेणे यांसारख्या गोष्टींकडे वळतात.

यात होते असे की, आतापर्यंत नोकरीच्या निमित्ताने एका विशिष्ट स्वरूपाचे काम केलेले असते. तर कधी नवे काम सुरू करण्यासाठी एखादा छोटा-मोठा कोर्स शिकावा लागतो. परिणामी इतकी वर्षे नोकरीच्या निमित्ताने मिळविलेले ज्ञान फुकट गेल्यासारखे वाटते. किंवा मग नव्या गोष्टीत मन रमवून घ्यावे लागते. त्यातच आपले आधीचे सहकारी त्या-त्या क्षेत्रात पुढे गेले की कळत-नकळतपणेदेखील त्याचा ताण मनावर येतो. परिस्थितीमुळे आपल्याला ही संधी मिळाली नाही, ही खंत लागून राहते.

मग आपला लग्न करण्याचा निर्णय किंवा मूल जन्माला घालण्याचा निर्णय घाईचा होता का? अशा हातऱ्हेच्या विचारांनी मन नैराश्यग्रस्त बनते. अशावेळी सभोवताली किंवा घरात समजूतदार माणसं असतील तर या नैराश्यातून सहज बाहेर पडता येते. परंतु तसे नसेल तर मग सगळ्याच गोष्टींवर नकारात्मक विचारांचा परिणाम वाढू लागतो. हळूहळू याचा परिणाम नातेसंबंधावर होतो.

प्रज्ञाने व्हायरल केलेल्या पोस्टमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणविते की, आजही मुलाचं संगोपन ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी समजली जाते. अर्थार्जन करण्यापुरताच पतीचा सहभाग असावा, इतकेच अपेक्षित असते.

खरं तर बदलत्या काळानुसार ही विचारसरणीदेखील बदलणं गरजेचं आहे. उद्या लग्नानंतर मुलं झाली की त्यांची जबाबदारी मग ती त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते शाळा-अभ्यास, इतर छंद जोपासणे या सर्व दोघांनी(पती-पत्नी) उचलणे आवश्यक आहे, हा विचार तरुण वयातच मुलांमध्ये रुजविणं आवश्यक आहे.

आज परदेशात स्थायिक असलेली अनेक भारतीय कुटुंबे किंवा त्यांचे नातेवाईक बऱ्याचदा अभिमानाने या गोष्टी सांगत असतात की, आमचा मुलगा त्याच्या बाळाचे डायपर बदलतो किंवा मुलांसाठी जेवण तयार करून ठेवतो किंवा मुलांना शाळेसाठी तयार करतो वगैरे वगैरे… कारण तिकडे कामासाठी माणसं उपलब्ध नसतात. आणि असली तरी त्यांचा दर परवडण्याजोगा नसतो. हाच स्वावलंबनाचा धडा जर लहानपणापासून आपल्याकडेदेखील कुंटुंबातून रुजवायला सुरुवात केली, तर खूपशा गोष्टींमध्ये फरक पडू शकतो.

मुलं-मुली हे दोन्ही समान आहेत आणि या दोघांना श्रमाची जितकी गरज आहे तितकीच विश्रांतीचीदेखील आहे. पुरुष कमावतोय म्हणजे त्याने घरी येऊन आराम करावा आणि स्त्री कमवीत असली तरी घरकाम ही तिची जबाबदारी, ही विचारसरणी बदलणं गरजेचं आहे. तितकीच ती तळागळापर्यंत रुजणंदेखील महत्त्वाचं आहे.

suchup@gmail.com