विदेशी खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंना अपयश येईल, या टीकाकारांच्या मताला दोघांनी चुकीचे ठरवल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले. विश्वचषक स्पध्रेतील आतापर्यंतच्या प्रवासात या दोघांनीही आपली छाप पाडल्याचेही त्याने सांगितले.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रि केविरुद्धच्या विजयात अश्विन आणि जडेजा यांनी मोलाची कामगिरी बजावली, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यांनी मिळून सहा बळी घेतले असून ३६.२ षटकांत त्यांनी ४.८३च्या सरासरीने १७५ धावाच दिल्या आहेत. कोहली म्हणाला, ‘‘इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन करंडक स्पध्रेत या दोघांनी सिंहाचा वाटा उचलला होता. फिरकीपटू आमचे प्रमुख गोलंदाज असतील, असे त्या वेळी कोणाला वाटलेही नव्हते. तेव्हाही या दोघांनी टीकाकारांची तोंडे बंद केली होती व ऑस्ट्रेलियातही ते चांगली कामगिरी करत आहेत.’’
उपकर्णधार कोहलीच्या मते, आक्रमण हेच मुख्य बचाव, ही जुनी म्हण हे दोघे खरी ठरवत आहेत. मात्र, एक खेळाडू आक्रमण करत असेल, तर दुसऱ्याने बचावात्मक खेळ करावा, ही बाब कोहलीला पटण्यासारखी नाही. तो सांगतो, ‘‘सर्वप्रथम बळी मिळवण्याचा प्रयत्न असावा आणि तसा निर्धार करूनच अश्विन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत होता. जडेजा हा नेहमी आक्रमक गोलंदाजी करत आला आहे आणि त्याला खेळपट्टीची योग्य साथ मिळाल्यास तो आणखी घातक ठरू शकतो. चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत त्याची प्रचीती आपल्याला आलीच होती.’’