कोणताही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून निवृत्त होताना कीर्तीच्या शिखरावर असतानाच निवृत्त होणे पसंत करीत असतो. कधी कधी अशा निवृत्तीच्या वेळी अपेक्षेइतके यश मिळाले नसल्याची खंत करीत त्याला निवृत्त व्हावे लागते. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रँडन टेलरच्या नशिबी अशीच खंत वाटय़ाला आली. आंतरराष्ट्रीय logo11क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होताना त्याची वैयक्तिक कामगिरी सर्वोत्तम झाली तरीही भारतासारख्या महान संघाविरुद्ध शक्य असलेला विजय साधता आला नाही, हे दु:ख त्याला आयुष्यभर सलत राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द व वैयक्तिक कौटुंबिक जीवन या दोन्ही आघाडय़ांवर अनेक खेळाडूंना कसरतच करावी लागते. अनेक खेळाडूंना या दोन्ही आघाडय़ांवर यश मिळत नाही. आपल्या खेळापेक्षाही कुटुंब हे अधिक महत्त्वाचे असते. कुटुंबाची योग्य साथ असेल तर तो खेळाडू आत्मविश्वासाने खेळू शकतो. टेलरला कुटुंबाची साथ होती तरीही इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यामुळे तेथील आव्हाने मोठी आहेत व ही आव्हाने पेलताना त्याच्या कुटुंबातील सहकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर वेळीच निवृत्त होणे चांगले, असा विचार करीतच टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय विश्वचषक स्पर्धेपूर्वीच घेतला होता.
गेली ११ वर्षे त्याने झिम्बाब्वे संघाकडून खेळताना संघाला अनेक विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. उत्तम दर्जाचा यष्टिरक्षक व अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून त्याने आपल्या शैलीचा ठसा उमटविला आहे. त्याने केलेल्या दिमाखदार खेळीच्या जोरावर झिम्बाब्वे संघास अनेक बलाढय़ संघांविरुद्ध विजय मिळविता आला आहे. क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपाच्या सामन्यांमध्ये प्रभुत्व गाजविण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. २३ कसोटींमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १४९३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने चार शतके व सहा अर्धशतके ठोकली आहेत. १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५,२५९ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने आठ शतके व ३२ अर्धशतके नोंदविली आहेत. झिम्बाब्वेसारख्या संघांमध्ये एकांडा शिलेदारच असतात हे अनेक वेळा दिसून आले आहे. बऱ्याच वेळा त्यांचा एखादाच खेळाडू सातत्याने चमक दाखवीत असतो व संघाची सर्वस्वी मदार त्याच्यावर असते. साहजिकच अशा खेळाडूला सतत किती दडपणाखाली खेळावे लागत असेल हे तोच जाणो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कुटुंबास झुकते माप देण्याच्या हेतूनेच त्याने कीर्तीच्या शिखरावर असताना अलविदा करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटमध्ये तो सहभागी होणार आहे. तेथे प्रशिक्षक म्हणूनही तो काम करू शकेल तसेच हे काम करताना त्याला आपल्या कुटुंबीयांना भरपूर वेळही देता येणार आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट गोड व्हावा, हे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खूप प्रयत्न केले. मात्र त्याच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांकडून अपेक्षेइतकी साथ मिळाली नाही. पाकिस्तान व भारत या दोन्ही संघांविरुद्ध त्याच्या संघास निसटता पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेले शतक म्हणजे सर्वोत्तम फलंदाजीची झलक होती. अडीच तास खेळताना त्याने मैदान दणाणून सोडले. भारताच्या सर्वच गोलंदाजांचा त्याने खरपूस समाचार घेतला. उत्तम पदलालित्य, कव्हर ड्राइव्ह, ऑन ड्राइव्ह, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून स्वीपचे फटके अशी फटकेबाजी करताना त्याने युवा खेळाडूंपुढे आदर्श फलंदाजीचा कित्ताच गिरविला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने संघास विजयाची संधी निर्माण करून दिली होती. विशेषत: भारताच्या चार मातब्बर फलंदाजांना शंभर धावांत तंबूत धाडले तेव्हा भारतीय संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी करीत टेलरचे स्वप्न अपुरेच ठेवले. हा सामना झिम्बाब्वेने गमावला, मात्र टेलरने केलेली शतकी खेळी अविस्मरणीयच राहील. टेलर हा जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही तरीही त्याची शैली सतत स्मरणात राहणार आहे.