विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बाद फेरीतील शेवटचा सामना भारतासाठी तितका महत्त्वाचा नसला तरी भारतीय सट्टेबाजारात मात्र चांगलीच उलाढाल झाली आहे. आर्यलडविरुद्धच्या सामन्यातही सट्टेबाजार तेजीत होता. झिम्बाव्वेबरोबरच्या सामन्याकडे भारत सराव सामना म्हणून पाहत आहे. आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारताकडून हाही सामना जिंकला जाईल, असाच होरा असल्यामुळेच सट्टेबाजांनी भारताला फक्त १० पैसे असा भाव दिला आहे. झिम्बाव्वेविरुद्धच्या सामन्यात यापूर्वीचा भारताचा इतिहास पाहता सट्टेबाजही भारताच्या भावाच्या तुलनेत झिम्बाव्वेला अधिक भाव द्यायला तयार नाहीत. क्रिकेटमध्ये चमत्कार होत असतात, याची जाणीव असलेल्या सट्टेबाजांनी या सामन्यासाठीही जोरदार तयारी केली आहे. भारताने अगोदरच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताचे शिखर धवन, मोहम्मद शमी आता सट्टेबाजांच्या रडारवर आले आहेत. उद्याच्या सामन्यात शिखर, विराट शतके मारतील, अशा दिशेने भाव देण्यात आला आहे. हा सामना भारत सहज खिशात टाकेल, असे आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारालाही वाटत आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला तसा काहीच अर्थ नसला तरी सट्टेबाजारात या सामन्यात इंग्लंडला झुकते माप देण्यात आले आहे.
सामन्याचे भाव
भारत : १० पैसे     झिम्बाव्वे : चार रुपये.
इंग्लंड : ३५ पैसे      अफगाणिस्तान : तीन रुपये.
निषाद अंधेरीवाला