wclog5इंग्लंडला क्रिकेटचे माहेरघर मानले जाते असे कोणा नवख्यास सांगितले तर त्याला ते आश्चर्यच वाटेल. त्यांच्या क्रिकेटपटूंची सध्याची कामगिरी पाहता ते विश्वविजेतेपदापासून नेहमी दूर का असतात याची खात्री पटते.
इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत देशोदेशाचे खेळाडू विविध क्लबकडून खेळत असतात. तेथील अनुभवाची शिदोरी तसेच आर्थिक पुंजी घेत मायदेशाकडून पुन्हा खेळायला सिद्ध होतात व आपल्या संघास विश्वविजेतेपद मिळवून देतात. वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका आदी अव्वल देशांबरोबरच अन्य देशांमधील कनिष्ठ गटापासून वरिष्ठ गटातील खेळाडूंसह अनेक खेळाडू कौंटीत चमक दाखवितात. तेथील अन्य परदेशी खेळाडूंबरोबर किंवा त्यांच्याविरुद्ध खेळताना हे खेळाडू भावी कारकीर्दीसाठी आपली बाजू बळकट करतात.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेला १९७५पासून प्रारंभ झाला. मात्र आजपर्यंत इंग्लंडला या स्पर्धेत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. चार वेळा संयोजनपद असताना त्यांना घरच्या मैदानावर व वातावरणात खेळण्याचा लाभ घेता आला नाही. तीन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळवूनही विश्वविजेतेपदावर मोहोर नोंदविण्यात ते अपयशी ठरले आहेत. ट्वेन्टी-२०चा विश्वचषक त्यांनी एकदा जिंकला, हीच त्यांची जमेची बाजू ठरली आहे. हा अपवाद वगळता इंग्लंडच्या खेळाडूंना १९९२नंतर एकदाही एकदिवसीय सामन्यांच्या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत भरीव कामगिरी करता आलेली नाही.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही आतापर्यंत त्यांच्या खेळाडूंना अपेक्षेइतके सर्वोत्तम यश मिळालेले नाही. आजपर्यंत चार सामन्यांमध्ये त्यांनी केवळ स्कॉटलंडसारख्या दुय्यम संघावर मात करण्यात समाधान मानले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या पारंपरिक प्रतिस्पध्र्याविरुद्ध त्यांना १११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेच्या सलामीलाच त्यांना एवढा मानहानिकारक पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात त्यांच्या स्टीव्हन फिनने केलेली हॅट्ट्रिक ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरीही त्याला ही हॅट्ट्रिक त्याच्या शैलीपेक्षाही कांगारूंच्या फलंदाजांनी केलेल्या चुकांमुळेच मिळाली. डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर उंच फटके मारताना त्यांनी या विकेट्स गमावल्या होत्या.
आतापर्यंत इंग्लंडच्या संघात एकजिनसीपणा दिसून येत नाही. फलंदाजांनी भक्कम कामगिरी केली तर गोलंदाजांची कामगिरी खराब होते. काही वेळा सर्वच आघाडय़ांवर त्यांची कामगिरी सपेशल निराशाजनक होते असेच चित्र पाहावयास मिळाले आहे. इंग्लंडच्या संघात कागदावरती मातब्बर खेळाडूंची नावे दिसतात. मात्र प्रत्यक्ष मैदानावर त्यांचा सूर हरपलेला आहे असेच सातत्याने दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्यांना सव्वाशे धावाही करता आलेल्या नाहीत. एवढी लाजिरवाणी स्थिती झाल्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी तेथेच पराभव मान्य केला असावा असेच गोलंदाजीच्या वेळी दिसून आले. विजयासाठी १२४ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ १२.२ षटकांत पार करताना इंग्लंडच्या गोलंदाजीचे धिंडवडे उडवले होते.
श्रीलंकेविरुद्ध त्यांनी ३०९ धावांची मजल गाठली होती. या लक्ष्यास साजेशी प्रभावी गोलंदाजी करण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना सपशेल अपयश आले. लंकेने केवळ फलंदाजाच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केले. लंकेच्या लाहिरू थिरीमाने व कुमार संगकारा यांनी नाबाद शतके टोलवितानाच अखंडित द्विशतकी भागीदारी केली, यावरूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा सूर हरपला आहे हे स्पष्ट होते.
क्रिकेटमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ वेगवान गोलंदाजी उपयुक्त नसते. त्याचबरोबर अचूक दिशा, टप्पा व कल्पकता याचीही जोड आवश्यक असते. स्टीव्हन फिन, मोइन अली, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड अशी अनुभवी गोलंदाजांची मांदियाळी इंग्लंडकडे आहे. मात्र या गोलंदाजांकडे अपेक्षेइतकी अचूकता नाही. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज नेहमी कोणत्या चुका करीत बाद होतात याचा अभ्यास करीत गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. मात्र तसा अभ्यास ते करीत नसावेत. फलंदाजीतही त्यांच्याकडे अभ्यासू वृत्तीचा अभाव दिसला.
मैदानावर शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मानसिक तंदुरुस्तीही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र या गोष्टीकडे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने कानाडोळा केला असावा. शांत व संयमी वृत्तीचा अभाव त्यांच्याकडे दिसून आला आहे. क्रिकेटच्या माहेरघरी नैपुण्याला वावडेच आहे, असेच सध्याचे चित्र आहे.
मिलिंद ढमढेरे