तो दिवस होता १४ ऑगस्ट २०१३.. न्यूझीलंडमधल्या कँटरबरी प्रांतातील पर्यावरण लवाद न्यायालयात क्रिकेटशी निगडित मंडळींची वर्दळ होती. न्यायालयासमोर खटला होता न्यूझीलंडमधील सगळ्यात मोठय़ा हेगले पार्कच्या नूतनीकरणाचा. पार्कात होतं क्रिकेटचं साधारण मैदान. स्टेडियम वगैरे नव्हे. ते स्थानिक स्पर्धासाठी वापरलं जायचं. या मैदानाचं रूपांतर व्यावसायिक दर्जाच्या स्टेडियममध्ये करण्याचा घाट कँटरबरी क्रिकेट मंडळानं घातला. पण विकासाइतकंच पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देणाऱ्या न्यूझीलंडमध्ये पार्कमधील जागेचं परिवर्तन इतकं साधं सरळ नव्हतं. हे मैदान पर्यावरणाला मारक ठरेल अशी भूमिका घेत पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली. नंतर हे प्रकरण पर्यावरणविषयक खटले पाहणाऱ्या न्यायालयात गेलं. सगळ्या मुद्दय़ांचा अभ्यास केल्यावर न्यायालयाने निकालाची तारीख निश्चित केली. तोच हा दिवस. जेन बॉर्थविक यांच्या खंडपीठाने हेगले पार्कच्या जागेवरील मैदानाच्या नूतनीकरणाला परवानगी दिली. पण दहाहून अधिक अटींची पूर्तता केल्यानंतरच.

हेगले पार्कची पाश्र्वभूमीच या प्रकरणाकडे प्रकाशझोत टाकणारी आहे. ख्राइस्टचर्च शहराच्या मध्यभागी तब्बल ४०७ एकरांवर पसरलेलं हेगले पार्क हा न्यूझीलंडमधील सर्वात मोठा हरित पट्टा आहे. विविध प्रकारची झाडं, पानं, वेली, तलाव आणि त्यांच्या माध्यमातून वावरणारे पशुपक्षी, तसंच स्थानिक क्रीडा स्पर्धासाठी व्यासपीठ असा हा लोभसवाणा प्रदेश. पार्कची स्थापना १८५५मध्ये झालेली. कायमस्वरूपी जनतेसाठी खुले असे सार्वजनिक उद्यान ही पार्कची सरकारदरबारची ओळख. पार्कची देखभाल ख्राइस्टचर्च शहर परिषदेतर्फे केली जाते.
हेगले पार्कमध्येच व्यावसायिक स्टेडियमची गरज कँटरबरी क्रिकेट मंडळाला जाणवू लागली. ख्राइस्टचर्च शहरात एएमआय स्टेडियम होतं. पण शहरातल्या लोकसंख्येला ते अपुरं होतं आणि कसोटी आयोजनासाठीच्या सोयीसुविधा तिथे नव्हत्या. हेगले पार्कमध्ये तसंही छोटेखानी मैदान आहे, त्याचं रूपांतर कसोटी दर्जाच्या स्टेडियममध्ये करावं, हा प्रस्ताव कँटरबरी मंडळानं मांडला. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०साठी एएमआय स्टेडियमचाच वापर होईल असंही या प्रस्तावात होतं. मंडळानं पर्यावरणाला पोषक नूतनीकरण मसुदाच परिषदेला सादर केला होता. पण पुढे काही होण्याआधी ख्राइस्टचर्चवासीयांवर निसर्गाचं अरिष्ट ओढवलं. ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं ख्राइस्टचर्च हादरलं. १८५ जणांचा बळी घेणाऱ्या या भूकंपानं जीवित आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केलं. खेळ, स्टेडियम राहिलं बाजूला, रोजीरोटीची भ्रांत निर्माण झाली. या धक्क्यातून सावरायला ख्राइस्टचर्चवासीयांना दोन वर्षे लागली. तोपर्यंत विश्वचषक आयोजनाचे पडघम वाजायला सुरुवात झाली होती. भूकंपात एएमआय स्टेडियम उद्ध्वस्त झालं होतं. अखेर विचारविमर्श केल्यानंतर कँटरबरी क्रिकेट मंडळानं हेगले पार्कातील मैदानाचं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये रूपांतरणाचा प्रस्ताव ठेवला. पर्यावरण विनाशाचा धसका घेत पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात धाव घेतली. पर्यावरण न्यायालयाने घातलेल्या अटी कुणालाही विचारप्रवृत्त करणाऱ्या आहेत. मैदान परिसर वगळता कोणत्याही नैसर्गिकतेवर आक्रमण होणार नाही. हेगले पार्कमधील वातावरणातील संतुलितता राहावी, यासाठी स्टेडियमध्ये ग्रास बँकला (प्रेक्षकांना बसण्यासाठी सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या खुच्र्याऐवजी गवतावर बसण्याची सोय) प्राधान्य देण्यात यावे. फक्त सामन्यांच्या दिवशीच प्रेक्षकक्षमता वाढवण्यासाठी तात्पुरत्या स्टँड्सची उभारणी करण्यात यावी, स्टेडियमच्या निर्मितीनंतर वृक्षारोपणाला प्राधान्य देण्यात यावे. जाचक वाटणाऱ्या भरपूर अटींची पूर्तता कँटरबरी क्रिकेट मंडळानं केली. ख्राइस्टचर्च शहर परिषदेनं १४ लाख डॉलर्सची मदत केली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीकडून मिळालेला निधी यातून डोळ्यांना सुखावणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात हेगले ओव्हलची निर्मिती झाली. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या निमित्ताने स्टेडियमवरचा पहिला सामना खेळवण्यात आला. भूकंपासारख्या आपत्तीनंतरही कमीतकमी वेळात आणि निसर्गाचा विनाश करण्याऐवजी निसर्ग फुलवत हेगले ओव्हलचे नूतनीकरण करणाऱ्या ख्राइस्टचर्च रहिवाशांच्या गौरवासाठी विश्वचषकाचा सलामीचा सामना इथे व्हावा अशी विनंती न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आयसीसीला केली. ही विनंती मान्य झाली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. निसर्ग आणि मानवी विकास हे परस्परविरोधी नव्हे, तर परस्परपूरक होऊ शकतं हा धडा हेगले ओव्हलनं दिला आहे. या स्टेडियमला नवं रूप देण्यासाठी कँटरबरी क्रिकेट मंडळातर्फे एक व्यक्ती सातत्याने पाठपुरावा करत होती. न्यायालयीन लढाईतही या व्यक्तीने चिकाटी सोडली नाही. स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे ली जरमाँ. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक. कोटय़वधींचे समालोचन करार किंवा प्रशिक्षणाचे काम सोडून स्टेडियम नूतनीकरणासारख्या ‘लष्कराच्या भाकऱ्या’ भाजणं स्वीकारणाऱ्या जरमाँचं उदाहरण आपल्यासाठी अनोखंच!