spt07‘से व्ह गाझा’ (गाझा वाचवा) आणि ‘फ्री पॅलेस्टाइन’ (पॅलेस्टाइन मुक्त करा) हे रिस्ट बॅण्ड घालून क्षेत्ररक्षण करणारा तो सहा फुटांचा आणि मानेच्या खालपर्यंत रेंगाळणारी दाढी जोपासणारा इंग्लिश खेळाडू सर्वाचे लक्ष वेधत होता. २८ जुलै २०१४ ही ती तारीख होती. साऊदम्पटनला भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा तो दुसरा दिवस होता. गाझा पट्टीवर सलग तिसऱ्या आठवडय़ात इस्रायलने हवाई हल्ले केले होते. त्यात शेकडो पॅलेस्टिनी ठार झाले होते, तर हजारो बेघर. त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्याने हे धाडसी पाऊल उचलले होते. सामनाधिकारी डेव्हिड बून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदसुद्धा त्याच्या या कृत्याबाबत नाराज होती. ‘सामना चालू असताना राजकीय, धार्मिक किंवा वर्णभेदात्मक कोणताही संदेश देणारा गणवेश अथवा साहित्य परिधान करू नये,’ असे आयसीसीचा नियम सांगतो. स्वाभाविकपणे त्या क्रिकेटपटूला तंबी देण्यात आली. परंतु मोईन अली वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्याच्या कृत्यामुळे समाजमाध्यमात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काहींनी त्याला ‘बिन लादेन’सुद्धा संबोधले.
मोईनने ‘गाझा वाचवा आणि पॅलेस्टाइन मुक्त करा’ हा नारा का दिला होता? तर तिथल्या निष्पाप नागरिकांना खंबीरपणे पाठिंबा देण्यासाठी. उम्माह वेल्फेअर ट्रस्ट ही सामाजिक संस्था गाझामधील बेघर नागरिकांसाठी कार्य करते. त्या दोन रिस्ट बॅण्ड्सच्या लिलावातून ५०० युरोचा निधी या संस्थेला मिळाला. गाझामधील नागरिकांची परिस्थिती पाहून त्याला अतिशय दु:ख झाले होते. मात्र त्यामुळे इतके मोठे वादळ उठेल, याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. परंतु या कठीण कालखंडात इंग्लंड क्रिकेट मंडळ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ‘मोईनने कोणताही गुन्हा केला नाही,’ असे अधिकृतपणे त्यांनी जाहीर केले. याच कसोटीत पुढे ‘हेल्प फॉर हिरोज’ (शूरवीरांच्या मदतीसाठी) अशी वाक्ये रेखाटलेल्या जर्सीज इंग्लिश संघाने परिधान केल्या आणि पहिल्या महायुद्धाच्या शतकपूर्तीनिमित्त दोन्ही संघांनी दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजलीसुद्धा अर्पण केली. कालांतराने मानवतेच्या दृष्टिकोनातून रिस्ट बॅण्ड वापरणाऱ्या मोईनविषयीचे बून आणि आयसीसीचे गैरसमज दूर झाले. मग त्यांनी आपला निर्णय बदलला. अखेरच्या दिवशी भारताचा दुसरा डाव १७८ धावांत कोसळला आणि इंग्लंडने सामना जिंकला. यात मोईन अलीने आपल्या फिरकीच्या बळावर ६ बळी घेत सिंहाचा वाटा उचलला होता.
भारताविरुद्धचे पहिले तीन कसोटी सामने रमझानदरम्यानच आले होते. त्या काळात मोईन पहाटे उठून खायचा आणि पाणी प्यायचा, मग प्रार्थना करून पुन्हा झोपी जायचा. कारण पूर्ण दिवसाचा उपवास तो करायचा. तो दररोज इमाने इतबारे नमाज पढतो. ‘‘मुस्लीम धर्म शांती आणि सद्भावनेचा संदेश देतो. मानवता ही मला अतिशय महत्त्वाची वाटते. फक्त क्रिकेटच्या पलीकडे आयुष्य हे खूप महत्त्वाचे असते,’’ असे मोईनचे विचार आहेत.
मोईनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्याच वर्षी पदार्पण झाले. परंतु तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या बळावर आपले स्थान आता निर्माण केले आहे. भारत आणि श्रीलंकेविरुद्ध त्याची कामगिरी अप्रतिम झाली. काही इंग्लिश क्रिकेटरसिकांना मोईनला पाहिले की महान क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांची आठवण होते.
मोईनचे आजोबा पाकिस्तानी आणि आजी इंग्लंडची. त्यामुळेच अली कुटुंब पाकिस्तानमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. वडील मुनीर आणि काकांचे क्रिकेटवर अतिशय प्रेम. त्यामुळे घराबाहेरील बगिच्याचे लवकरच क्रिकेट नेटमध्ये रूपांतरण झाले. मोईनला दोन भाऊ आणि एक बहीण. याशिवाय काकांनाही दोन मुले. ही सर्व भावंडे मुनीर यांच्या मार्गदर्शनाखाली घडू लागली. मुनीर यांनी मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नोकरीही सोडली. त्यांच्या मेहनतीचे अखेर चीज झाले. आता ही सर्व भावंडे काऊंटी क्रिकेट खेळतात, तर मोईन आंतरराष्ट्रीय क्षितिजावर तळपतो आहे. मुनीरसुद्धा आता बर्मिगहॅम येथे एम. ए. क्रिकेट अकादमी चालवतात.
मोईन ‘स्ट्रिटचान्स’ या क्रिकेट-सामाजिक कार्यात सामील होऊन आठवडय़ातून एकदा इंग्लंडमधील मागास भागात जाऊन मोफत क्रिकेट प्रशिक्षणाचे धडे देतो. क्रिकेट फाऊंडेशन आणि बारक्ले स्पेसेस फॉर स्पोर्ट्स यांच्याकडून हा उपक्रम चालवला जातो. गेल्याच महिन्यात मोईन ‘ऑरफन्स इन नीड’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचा जागतिक सदिच्छादूत झाला आहे. त्यामुळे निधी संकलनाच्या उद्देशाने आपल्या बॅटवर या संस्थेचा लोगोसुद्धा ठेवतो. सामाजिक संवेदना जपणारा आणि धर्माचा अचूक अर्थ समजणारा मोईन त्यामुळेच विरळा वाटतो.
प्रशांत केणी