विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे न्यूझीलंडने श्रीलंकेला नमवले. परंतु भारतीय सट्टेबाजांचे लक्ष लागून राहिलेला भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हाच सध्या सट्टेबाजारात चर्चेचा विषय आहे. या सामन्यासाठी भारतीय सट्टेबाजांप्रमाणे आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांनीही भारतालाच पसंती दिली wc11आहे. पहिली फलंदाजी कोण करील? पहिल्या दहा षटकांत किती धावा होतील? दोन्ही संघांतील सर्व फलंदाज बाद होतील का? तसेच शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल का? आदी विविध टप्प्यांवर सट्टा घेतला गेला आहे. या सामन्यात भारताचा संघ पहिल्यापासूनच वरचढ राहील आणि सामना आरामात खिशात टाकेल, असेही सट्टेबाजांना वाटत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, मिसबाह-उल-हक, शाहिद आफ्रिदी हे अर्धशतक करतील. यासाठी अनुक्रमे ३५ पैसे, ७५ पैसे, ४० पैसे आणि दीड रुपया देऊ करण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारेल, यासाठी पाकिस्तानला ४५ पैसे तर भारतासाठी ३५ पैसे देऊ करण्यात आले आहेत. कोहली ५० पेक्षा अधिक धावा करू शकेल, मात्र शतक करू शकणार नाही, यासाठी ३५ पैसे भाव आहे. विश्वचषक कोण जिंकेल, याबाबत ऑस्ट्रेलियालाच आता पसंती देत भारतीय सट्टेबाजांनी नव्याने भाव जारी केले आहेत. ते असे
ऑस्ट्रेलिया – ३० पैसे, न्यूझीलंड – ४० पैसे, दक्षिण आफ्रिका – ४५ पैसे, इंग्लंड – ५५ पैसे, श्रीलंका – ६५ पैसे, भारत – ७५ पैसे, पाकिस्तान – सव्वा रुपया. हे भाव उपान्त्य फेरीपर्यंत पुन्हा बदलतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
आजचा भाव
भारत : ६० पैसे;  पाकिस्तान : दीड रुपया
निषाद अंधेरीवाला