spt10प्रेमाला वय नसतं आणि भयही नसतं; परंतु व्यक्तीला असतं. मात्र प्रेमात कोणताही काटेरी मार्ग पार करण्याची ताकद असते. याचं उदाहरणच द्यायचं झाल्यास शिखर आणि आयेशाच्या प्रेमाचं देता येईल. पीळदार मिशांनिशी रुबाबदार फलंदाजी करणारा शिखर धवन प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर लीलया हुकूमत गाजवतो, तर आयेशा तिच्या टॅटूजसाठी लोकप्रिय आहे. शिखर यंदा तिशी पूर्ण करेल, तर त्याची पत्नी आयेशा चाळिशी गाठेल. त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली त्या वेळी शिखर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता, तर मेलबर्नची आयेशा कौटुंबिक वादळाचा मुकाबला करीत होती.
या एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीची सुरुवातही तितकीच रोचक आहे. ‘फेसबुक’वर हरभजन सिंगच्या ‘मैत्री यादी’त असलेल्या आयेशाची छायाचित्रं पाहून शिखरची ‘छू कर मेरे मन को, किया तुने क्या इशारा..’ अशी अवस्था झाली. फार वेळ न घालवता त्यानं तिला मैत्रीची विनंती पाठवली. तिनंही ती स्वीकारली. मग चॅटिंगद्वारे ही मैत्री आणखी खुलत गेली. त्यानंतर भज्जीने मध्यस्थी करून या मैत्रीचं प्रेमात रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा वाङ्निश्चय २००९ मध्ये झाला, परंतु विवाह मात्र २०१२ मध्ये झाला. कारण शिखर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत विवाह न करण्याचा पण दोघांनी केला होता. अर्थात या वयफरकाच्या विवाहाला दोघांच्या पालकांचा विरोध होता. याशिवाय आयेशा घटस्फोटित होती. परंतु शिखरची आई सुनैना या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि हे प्रेमवीर विवाहबद्ध झाले. त्यांच्या विवाहाला आता दोन वष्रे पूर्ण होतील. त्यांना झोरावर नावाचा एक गोंडस मुलगाही आहे.
शिखरप्रमाणेच आयेशा मुखर्जीलाही खेळात विलक्षण रुची. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर ती खेळली आहे. तिचे वडील भारतीय (बंगाली) आणि आई ब्रिटिश. आयेशाच्या जन्मानंतर तिच्या आई-वडिलांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले आणि तिथेच मग ते स्थायिक झाले. ते दोघेही एकाच फॅक्टरीत नोकरी करायचे. आयेशाचे पदवीपर्यंतचे शिक्षण ऑस्ट्रेलियात झाले. वडिलांमुळे तिला अस्खलित बंगाली भाषा बोलता येते. याशिवाय रुचकर खाद्यपदार्थ बनवण्यात ती माहीर आहे. त्यामुळे विवाहानंतर अल्पावधीत तिनं शिखरच्या कुटुंबातील सर्वाचीच मनं जिंकली. परंतु सध्या इंटरनेटविश्वात तिच्या सौंदर्याची तसेच दंडावरील ‘ओम’ आणि पाठीवर रेखाटलेल्या टॅटूजची मोठी चर्चा आहे. आयेशाचा पहिला विवाह ऑस्ट्रेलियास्थित उद्योगपतीशी झाला. त्यांना अलिया आणि रिया नावाच्या दोन कन्याही होत्या. परंतु दहा वर्षांच्या संसारानंतर या दोघांमधील कलह वाढत गेले आणि अखेर दोघांनी घटस्फोट घेतला.
३० ऑक्टोबर २०१२ मध्ये दिल्लीच्या वसंतकुंज गुरुद्वारामध्ये शीख पद्धतीने शिखर आणि आयेशाचा विवाह झाला. या सोहळ्याला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. विवाहानंतर शिखरची क्रिकेट कारकीर्द खऱ्या अर्थानं बहरली. २०१० मध्ये शिखरने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले, तेव्हा सलामीच्या स्थानांसाठी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर अशा दिग्गजांचे पर्याय उपलब्ध होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोचीच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळणार होती, परंतु पावसामुळे हा सामना वाया गेला. विशाखापट्टणम्च्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपला पहिला चेंडू त्याने जेमतेम खेळून काढला. परंतु दुसऱ्याच चेंडूवर क्लिंट मकायने त्याचा त्रिफळा उडवला. प्रारंभीच्या अपयशानंतर शिखर पुनरागमनासाठी धडपडत असताना भारतीय क्रिकेटचं विश्वचषक अभियान सुरू झालं. तो जिंकल्यावर अनेक दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने कॅरेबियन दौरा केला. या दौऱ्यावर शिखरने एक अर्धशतक झळकावलं. परंतु भारतीय संघात शिखर स्थिरावण्यासाठी २०१३ हे वर्ष उजाडलं. फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सेहवाग व मुरली विजय यांच्यानंतर शिखर हा तिसरा पर्याय होता. परंतु खराब फॉर्ममुळे तिसऱ्या कसोटीसाठी वीरूला वगळण्यात आले आणि मोहालीच्या तिसऱ्या कसोटीसाठी शिखरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या पहिल्याच कसोटीत शिखरने ८५ चेंडूंत शतक साकारून पदार्पणातील वेगवान शतकवीराचा मान संपादन केला. त्याने १८७ धावांची खेळी साकारून या सामन्यात सामनावीर किताब पटकावला. मग जून-जुलैमध्ये आयसीसी चॅम्पियन्स करंडक भारतानं जिंकला. या यशात शिखरचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वाधिक धावांसाठीची सोनेरी बॅट त्याने पटकावली. आता भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघांमध्ये शिखर सलामीवीराची भूमिका यशस्वीपणे बजावत आहे. त्याच्या कारकीर्दीत येणाऱ्या चढ-उतारांवर मात करून तो तावून-सुलाखून आपले अस्तित्व सिद्ध करीत आहे. मेलबर्नला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने आपल्या पहिल्यावहिल्या विश्वचषकातील हे पहिले शतक साकारले. त्याची सासुरवाडी मेलबर्न असल्यामुळे या शतकानिमित्त ही प्रेमाची गोष्टसुद्धा ताजी झाली.
प्रशांत केणी