20 September 2020

News Flash

BLOG : डी विलीयर्सला रोखता येऊ शकते

डी विलीयर्सच्या तडाख्याने तमाम क्रिकेटजग थक्क झाले आहे. ब-याच पंडितांनी हे वादळ कुणालाच झेपणारे नाही,

| March 3, 2015 01:01 am

डी विलीयर्सच्या तडाख्याने तमाम क्रिकेटजग थक्क झाले आहे. ब-याच पंडितांनी हे वादळ कुणालाच झेपणारे नाही, याच्या तडाख्यात सापडल्यास फक्त विध्वंस बघायचा, गोलंदाजांनी दुसरी नोकरी धरावी, परमेश्वराने एकाच आत्म्याला एवढी गुणवत्ता देणे हा अन्याय आहे, असा सूर लावला आहे आणि त्यात काहीही चूक नाही. डी विलीयर्सला कोणत्याच मर्यादा नाहीत. सर्वसामथ्र्यशाली आहे असे दिसतेय. त्याला लेंथ लवकर कळते, तो क्रिझच्या अगदी खोलात म्हणजे खूप मागे जाऊन काही अविश्वसनीय फटके मारतो, तो १०० मीटर स्पिंट्र मारणा-या अ‍ॅथलिटसारखा प्रचंड फीट आहे. त्याला सीमारेषा ३० यार्ड सर्कलपाशी वाटते इतक्या सहज तो चेंडू स्टेडियममध्ये भिरकावतो, थर्ड मॅन ते फाइन लेग कुठेही तो सारख्याच कौशल्याने टेक्स्ट बूक फटके आणि काही स्वयंरचित फटके मारू शकतो. सरळ बॅटने तसेच आडव्या बॅटने दोन्हीने तो तितक्याच हुकमतीने बदडतो. केव्हीन पीटरसनने इम्प्रोव्हायजेशनला नवीन परिमाण दिले तर डी विलीयर्सने इम्प्रोव्हायजेशनलाच क्रिकेटची बाराखडी करून टाकली.
आता असा फलंदाज अवतरल्यावर त्याला रोखायचे कसे यावर प्रत्येक संघाच्या व्यवस्थापनामध्ये खलबते सुरू होणार. वास्तविक असे आव्हान क्रिकेटला नवीन नाही. ब्रॅडमनपासून सचिन तेंडुलकपर्यंतच्या काळात असे अनेक थरारक फलंदाज येऊन गेले. सोबर्स, लॉईड, रिचर्ड्स, गिलख्रिस्ट, सेहवाग, जयसूर्या अशा घणाघाती फलंदाजांना काबूत ठेवण्याचे आव्हान विविध संघांनी पेलले. तसेच डी विलीयर्सला थोपवण्याकरिता वेगवेगळे संघ डावपेच आखतील.
गेल्या तीन-चार दशकांत क्रिकेट क्षितिजावर चमकलेले सवरेत्कृष्ट कप्तान म्हणजे ब्रेअर्ली, लॉईड, मार्क टेलर, शेन वॉर्न, नासीर हुसेन हे अत्यंत धूर्त कप्तान होते. यातील कोणत्याही कप्तानाला विचारले तर ते सांगतील की डी विलीयर्ससारख्या साहसी फलंदाजाला रोखायचे असेल तर विरुद्ध संघाचा कर्णधारदेखील तितकाच साहसी असला पाहिजे. थोडय़ा धावा गेल्या तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत पहिल्या अध्र्या तासात त्याला बाद करायचा प्रयत्न करायचा. फलंदाजाच्या तंत्रातील कमकुवतपणावर आणि मानसिकतेवर काम करत राहायचे.
अशा फलंदाजासमोर आपला सर्वोत्तम गोलंदाज ताबडतोब आणायचा. डी विलीयर्सने वेस्ट इंडिजची जी धुलाई केली त्या गोलंदाजांचा वेग १४०च्या आसपास होता. डी विलीयर्सला धक्कातंत्राने बाद करण्याकरिता मिचेल जॉन्सनसारखा वेग आणि स्विंग आवश्यक असतो. पहिल्या काही चेंडूंत अशा फलंदाजाचे अवसान गळून पाडणारी गोलंदाजी व्हायला हवी. चेंडू मारण्याकरिता फलंदाजाने पोझिशन घ्यायच्या आधाच चेंडू बॅटवर येऊन आदळला, दोन-तीन बाऊन्सर्स अंगावर घ्यावे लागले की फलंदाज हलतो. विकेटकडून थोडी स्विंगची साथ मिळाली तर बाऊन्सरनंतर टाकलेल्या बाहेर जाणा-या चेंडूवर फलंदाज सापडू शकतो. काही चमत्कारिक क्षेत्ररक्षणाच्या जागा लावून फलंदाजाला गोंधळून टाकायचे. तुमच्याकडे उत्तम स्पीनर असला तर अशा थरारक फलंदाजाला वेग कमी करून चेंडूची उंची कमीजास्त करून चुका करायला भाग पाडायचे. एकदिवसीय सामना असला तरी स्लीप, फॉरवर्ड शॉर्ट लेग लावून फलंदाजाला सारे कौशल्य आणि संयम पणाला लावू द्यायला प्रवृत्त करायचे.
दुसरे अस्त्र म्हणजे अशा फलंदाजाच्या मानसिकतेवर काम करायचे. अशा झंझावाती फलंदाजांना सर्वात काय आवडते तर त्यांच्या चलनमानाप्रमाणे (मोमिंटम) खेळ होणे, त्यांना जास्त वेळ आऊट ऑफ स्ट्राईक ठेवले तर ते अधीर होतात. म्हणून धूर्त कर्णधार असा कसून प्रयत्न करतात की षटकातील चार-पाच चेंडू दुस-या फलंदाजाला धावच द्यायची नाही. स्ट्राईक जसजसा कमी मिळायला लागतो तसे हे फलंदाज उतावळे होऊन विकेट बहाल करू शकतात. शेन वॉर्नसारखा युक्तिसम्राट गोलंदाज अशा फलंदाजांना गोलंदाजी करताना मुद्दाम दोन चेंडूंमध्ये तीस-चाळीस सेकंदांचा वेळ घालवत असे. उगाचच कर्णधाराशी जाऊन बोल, क्षेत्ररक्षकांना पुढेमागे कर, यष्टिरक्षकाला जवळ बोलावून अतिमहत्त्वाच्या सूचना केल्यासारखे दाखव वगैरे. काहीही करून खेळाचा वेग कमी करायचा आणि फलंदाजाला बोअर करायचे. क्रिकेटला ग्राऊंडवरचे बुद्धिबळ उगाच म्हणत नाहीत.
डी विलीयर्सला रोखायला प्रत्येक संघाचे व्यूहरचनाकार लॅपटॉप उघडून बसले असतील. नवीन प्रमेये अस्तित्वात येतील. नवीन प्रयोग मैदानावर दिसू लागतील आणि अगोदरच सुंदर असलेला खेळ नवीन सौंदर्यछटा घेऊन येईल.
रवि पत्की -sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 1:01 am

Web Title: it is possible to stop ab de villiers
Next Stories
1 बेधुंद संगकाराच्या लाहिरी!
2 पाकिस्तानचा विजयी रियाझ!
3 पॉन्टिंगने सट्टेबाज असे हाताळले!
Just Now!
X