प्रत्येक गोष्टींमधून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी शिकत असतो. पाकिस्तानविरुद्ध भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला, पण या सामन्यात आपल्याकडून चांगली फलंदाजी झाली नसल्याचे हेरून त्याने संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्याकडून शिकवणी घेतली.
सेंट किल्डाज जंक्शन ओव्हल मैदानावर भारतीय संघ सरावासाठी दाखल झाला होता. त्यामध्ये धोनीही होता. पण नेट्समधला सराव झाल्यावर धोनी स्क्वेअर लेगला बसलेल्या शास्त्री यांच्याकडे गेला आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. काही वेळाने शास्त्री यांनी धोनीला काही हालचाली करून दाखवल्या. ‘पुल’चा फटका मारताना तुमचे शरीर कोणत्या लयीत असायला हवे, तुम्ही तुमच्या वजनावर कसे नियंत्रण ठेवायला हवे, हे सारे शास्त्री धोनीला करून दाखवत होते. शास्त्री यांना ऑस्ट्रेलियाचा चागलाच अनुभव आहे. १९८५ साली झालेल्या बेन्सन आणि हेजेस चषकाचे शास्त्री ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’ ठरले होते. त्याचबरोबर १९९१-९२च्या दौऱ्यात शास्त्री यांनी द्विशतक लगावले होते.
गेल्या १० सामन्यांमध्ये धोनीची कामगिरी बरीच खालावलेली आहे. या दहापैकी दोन सामन्यांमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, तर विंडीजविरुद्ध एकमेव शतक गेल्या दहा सामन्यांमध्ये त्याला झळकावता आले आहे. त्याचबरोबर तिशीच्या पुढे फक्त दोनदा धोनीला पोहोचता आलेले आहे. त्यामुळे गेल्या दहा सामन्यांवर नजर टाकल्यास धोनीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीला मुक्तपणे फलंदाजी करता आली नव्हती. मोठे फटके त्याला मारता आले नव्हते. सुरेश रेना बाद झाल्यावर साऱ्यांच्या नजरा धोनीवर लागलेल्या होत्या, पण त्याने अपेक्षाभंग केला. धोनीचा पुलचा फटका चुकला आणि त्याला माघारी परतावे लागले होते.
नेट्समध्ये धोनीने धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीवर सराव केला. यावेळी धोनीने त्यांना जास्तीत जास्त उसळते चेंडू टाकायला सांगितले, जेणे करून त्याला ‘हुक’ व ‘पुल’च्या फटक्यांचा सराव करता येईल. या फटक्यांचा सराव करताना धोनी काही वेळेला चुकला, तर काही वेळा चेंडू फार लांब गेला नाही, त्यामुळे हे फटके बरोबर लागत आहेत की नाही किंवा ते कसे चोख लागायला हवेत यासाठी नेट्समध्ये सराव झाल्यानंतर धोनीने खास शास्त्री यांच्याकडून शिकवण घेतली.