(गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षदिनी श्रीखंडपुरीचे जेवण झाल्यावर घरी निवांत पहुडलेला असताना चंपकच्या स्मार्टफोनवर मेसेज टय़ून वाजते. व्हॉट्स अ‍ॅपवर नव्या नंबरवरून कोणीतरी पिंग केलेले असते. wc04नववर्षांचे संदेश डोक्याला वात आणतात अशा स्वगतासह चंपक नाइलाजाने फोन उचलतो. शुभेच्छा असतातच पण त्याबरोबर प्रश्नही असतो.)
तॅत्स : नववर्षांच्या शुभेच्छा. न्यूझीलंड जिंकलं ना?
चंपक : तुम्हालाही शुभेच्छा. तॅत्स, माझा नंबर कुठून मिळवलात?
तॅत्स : ते फारसं महत्त्वाचं नाही. म्हटलं आज तुम्ही कुठे वाट वाकडी करणार आम्हाला भेटायला..
चंपक : न्यूझीलंड जिंकलं बुवा तुम्ही म्हणालात तसं. वेस्ट इंडिज खरंच स्वान्तसुखाय मंडळी आहेत.
तॅत्स : एकदाही त्यांच्या वावरातून असं जाणवलं नाही की ते वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत खेळत आहेत. जिद्द दूरची गोष्ट, कंटाळल्यासारखे नाईलाज म्हणून खेळणाऱ्या लोकांचा समूह होता तो.
चंपक : पण आले की उपांत्यपूर्व फेरीपर्यंत.
तॅत्स : त्याच्याच गणिताचा वाटा जास्त आहे मेहनतीपेक्षा. गुणी खेळाडू नक्कीच आहेत त्यांच्याकडे पण योग्य व्यक्तींच्या हातात सूत्रं नाहीत. अनफिट माणसांना खेळवल्यावर हेच होणार.
चंपक : अगदी खरं. पण त्यांच्यामुळे एक स्लॉट फुकट गेला. पण आता खरी परीक्षा आहे तुमची.
तॅत्स : अभ्यास करणाऱ्यांना परीक्षेचं भय वाटत नाही. क्लायंट आलेत. भेटू लवकरच. पुन्हा एकवार शुभेच्छा.
चंपक : नक्की भेटतो. बाय