spt05सोमवारी संध्याकाळी एका मित्राला भेटायला बोलावले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही सामन्यांची तिकिटे त्याला ‘गिफ्ट’ म्हणून मिळाली होती. इतकेच नव्हे, सामना पाहण्यासाठी त्याच्या बॉसने सुट्टीदेखील मंजूर केली होती. काय नशीब होते या पठ्ठय़ाचे. भारताचे विश्वचषकातील दोन महत्त्वाचे सामने आणि या दोन्ही सामन्यांसाठी याला ‘मोफत प्रवेश.’
सोमवारी दुपारी मी ऑफिसात असताना मला याच मित्राचा ‘‘खूप दमलो आहे, आजऐवजी उद्या भेटूया!’’ असा एसएमएस आला. मी फार विचार न करताना परत आपल्या कामाला लागलो. मंगळवारी संध्याकाळी शेवटी त्याला भेटलो. हा मित्र बराच निर्जीव आणि दमल्यासारखा दिसत होता. त्याची अवस्था बघून मी चटकन कडक कॉफी मागवली. ‘‘मॅचसाठी उत्तम मोफत तिकिटे, विमानाने प्रवास, स्टेडियमच्या जवळ उत्तम हॉटेल आणि भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय, मग एवढा दमलास कशामुळे?’’ असे मी त्याला खडसावून विचारले. त्याने हळूच उजव्या डोळ्यांवरची भुवई वर केली, एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, ‘‘व्हॉट अ नाइट!’’ मी त्याला अगदी तशीच डावी भुवई वर करून विचारले, ‘‘व्हॉट डू यू मीन?’’ हे म्हणताच त्याची देहबोली बदलली, हाताची घडी घालून आकाशाकडे बघत तो म्हणाला, ‘‘काय सांगू तुला! मी या दिवसांत जितके अनुभवले आहे. ते मला कधीच शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही!’’ एक छोटा विराम घेत त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली. शनिवारी दुपारी मेलबर्नला पोहोचल्यावर मी संध्याकाळी माझ्या कॉलेजच्या मित्रांना भेटलो, त्यांनी कुठे तरी जायची योजना आखली होती.
काही विचार न करता मी त्याच्यासोबत जायचे ठरवले. आम्ही थेट मेलबर्न शहराच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचलो. गाडीतून उतरल्यावर मी आळस देत मागे वळलो आणि माझे डोळे उघडेच राहिले. ऑस्ट्रेलियात जिकडे सगळी दुकाने ५ वाजता बंद होतात तिकडे चक्क रात्री ८ वाजता सर्व काही उघडे होते. आजूबाजूला नजर मारली आणि जणू सणाचे वातावरण जाणवले. नेहमी मोकळे असणारे रस्ते माणसांच्या गर्दीने गजबजत होते. अत्यंत उत्तम रोषणाई ठिकठिकाणी दिसत होती. प्रत्येक कोपऱ्यावर गर्दी जमली होती व रस्त्यावर बरेच कार्यक्रम चालू होते.
मी हळूच पुढे चालू लागलो आणि विजेच्या खांब्यावर फडकत असलेली ‘व्हाइट नाइट मेलबर्न’ची पताका बघितली आणि माझा विश्वासच नाही बसला. ज्या पर्वाबद्दल मी गेले काही दिवस ऐकले होते, त्यात आज मी चक्क सामील झालो होतो. मेलबर्नमध्ये एक रात्रभर चालणारा कला, संगीत, चित्रपट आणि सांस्कृतिक यांचा तो मेळा होता.
मेलबर्नच्या दक्षिणेकडे स्थित नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरियापासून ते उत्तरेकडील मेलबर्न म्युझियमपर्यंत हा पर्व होता. काही ठिकाणी खाण्या-पिण्याचे स्टॉल, गिटार आणि बॅण्डसहित गाणारे कलाकार, रस्त्याच्या मध्यभागी चित्रपट पाहण्यासाठी लावलेले सोफे, इमारतींवर झळाळणारी रोषणाई आणि हर्षोल्हासात वावरणारी माणसे, हे सारे उत्साही चित्र दिसत होते. अचानक सर्व काही बघण्याची आणि अनुभवण्याची इच्छा झाली, कारण ठाऊक होते की बराच वेळ आपल्याकडे आहे. सकाळी ७ वाजता हे सगळे संपणार होते. गडबडीत मी फक्त चालत राहिलो एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत. एका छोटय़ा मुलाला चॉकलेटच्या दुकानात सोडल्यावर त्याची जशी अवस्था होते, तशीच माझ्यासह साऱ्यांची झाली होती. शंभरापेक्षा अधिक खानपानाच्या जागा, रस्त्यावर असलेले नाचगाणे, ठिकठिकाणी दिसणाऱ्या कलाकृती हे सर्व पाहून मी भारावलो होतो. फिरता-फिरता कधी ७ वाजले पत्ताच नाही लागला आणि हॉटेलवर जायची वेळ झाली. हॉटेलवर गेलो स्नान केले आणि लक्षात आले की काल रात्रीच्या उत्साहात आपण जेवलोदेखील नाही. खाली उतरलो काही तरी खाल्ले आणि स्टेडियमवर निघालो. भारताने उत्कृष्ट खेळी खेळली आणि द. आफ्रिकेविरुद्धचा विश्वचषकातील आपला विजय नोंदवला.
हॉटेलवर जाईपर्यंत मध्यरात्र झाली व लक्षात आले की आपण ६ तास झोपलोच नाही. शरीराने संप पुकारला व मी हॉटेलमध्ये कोसळलो. त्या रात्रीची नशा अजूनही उतरलेली नाही. अजूनही डोळ्यांसमोर ती रोषणाई, ते संगीत मला जाणवतेय. कारण ती एक रात्र मंतरलेली होती.
मिहीर खडकीकर